। रसायनी । वार्ताहर ।
नवीन पोसरी येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून लबाडीने ग्राहकांचे पैसे चोरणार्या दोन भामट्यांना रसायनी पोलिसांनी अटक केली आहे.
रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश मोहन पाटील (वडघर-पनवेल) हे पैसे काढण्यासाठी मोहोपाडा-नवीन पोसरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गेले होते. त्यांनी पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकले; परंतु, पैसे बाहेर आले नाही. मात्र, त्यांचे पैसे कट झाल्याचा मेसेज मोबाइलमध्ये आला. त्यांनी बँकेत हा प्रकार सांगितला असता बँकेच्या अधिकार्यांनी सीसीटीव्ही चेक केला. त्यात महेश पाटील एटीएममधून बाहेर पडताच दोन अज्ञात इसमांनी एटीएम मशीन केबीनमध्ये शिरून पैसे काढल्याचे दिसून आले.
त्याबाबत रसायनी पोलिसांना कळविले असता रसायनी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी एटीएमच्या काही अंतरावर पाळत ठेवली. काही वेळाने दोन अज्ञात इसम एटीएममध्ये शिरले त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर आणि त्यांची पोलीस टीम एटीएमच्या केबीनमध्ये शिरले. त्या दोन इसमांच्या हातात प्लेट होती. त्यांना ताब्यात घेताच त्यांनी आपणच एटीएममधून महेश पाटील यांचे पैसे चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी अरुण बबलू यादव (21) व अंकुश ओमप्रकाश मोरया (24) (दोघेही राहणार उत्तरप्रदेश) यांना रसायनी पोलिसांनी अटक केली आहे.