मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे पत्नीसह तिघांवर चाकूने हल्ला करण्यात आला. जखमींना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी (दि.01) दुपारी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चेतन कोळी असे या मारेकर्याचे नाव आहे. त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. त्याचे आणि पत्नीचे सतत भांडण होत असतं. त्यामुळे कोळी यांची पत्नी वर्षभरापासून माहेरी आहे. रविवारी दुपारी बोडणी येथील माहेरी असताना चेतन दारु पिऊन आला. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ शाब्दीक वाद झाला. अखेर रागाच्या भरात चेतनने त्याची पत्नी अचल यांच्या मानेवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर अचल यांचा भाऊ प्रितम, आई देवयांनी यांच्यावरही चाकूने वार केले. त्यामध्ये तिघेही जखमी झाले आहेत.
आवास येथे मागील पंधरा दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या वादामध्ये चाकू, तलवारीने वार झाला होता. या घटनेनंतर पुन्हा मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोडणी येथे पत्नीसह तिघांवर नवर्याने हल्ला केला. चाकू, तलवारीने वार करण्याच्या घटना वाढत असल्याने नागरी सुरक्षेचा प्रश्न व कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा धोका अधिक वाढल्याची चर्चा जोरात सुरु आहे.