दगडाने ठेचून एकाची हत्या

पुरावा नष्ट करण्यासाठी जाळून टाकले शव

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील वहुर गावात एका बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने या मयत व्यक्तीचे शवदेखील जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवार, (दि. 10) रोजी रात्री ते सोमवारी (दि. 11) मार्चच्या सकाळी 9.13 वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. आरोपीला अटक करण्यात आले आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वहूर गावच्या उगवती वाडीमध्ये एका खासगी जागेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होते. या ठिकाणी काम करणारे कामगार समोर असलेल्या हनिफ प्लाझा या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी राहात होते. सोमवारी या इमारतीसमोर जळालेल्या अवस्थेत एक शव सापडला. माहिती मिळताच महाड तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. त्याचप्रमाणे अलिबाग इथून श्वानपथकदेखील पाचारण करण्यात आले. तापसादरम्यान हा शव या ठिकाणी काम करणाऱ्या कामगाराचा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी छगन शामराव मोहिते (36) रा. मलकापूर जालना, सध्या रा. हनिफ प्लाझा बिल्डिंग समोर मोकळ्या जागेत आणि मयत लखन बाबा राव चव्हाण (22) जाफराबाद जालना, सध्या रा. हनिफ प्लाझा बिल्डिंग समोर मोकळ्या जागेत या दोघांमध्ये ठेकेदारीवरून नेहमी होणारा वाद विकोपाला गेला आणि आरोपी छगन मोहिते यांनी लखन चव्हाण याची दगडाने ठेचून हत्या केली. मयत व्यक्तीला या इमारतीच्या मोकळ्या जागेमधून बाहेर खेचत आणून समोरील नाल्यात टाकून जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. सध्या आरोपी हा महाड शहर पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Exit mobile version