शेतकऱ्याची निर्घृण हत्या

अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल

। महाड । प्रतिनिधी ।

धारदार हत्याराने वार करून एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी (दि. 24) महाड तालुक्यातीळ चांढवे बुद्रुक येथे घडली आहे. याबाबत महाड एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड औद्योगिक पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या महाड तालुक्यातील मौजे चांढवे बुद्रुक येथील जनावरांच्या गोठ्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर त्याच गावातील अर्जुन भाऊ शेडगे या शेतकऱ्याचा मृतदेह गुरूवारी (दि. 24) आढळून आला. अर्जुन शेडगे हे आपल्या गुरांच्या गोठ्याकडे गेले होते अशी प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. मृत व्यक्तीच्या डोक्यावर, कानावर कोणत्यातरी धारदार हत्याराने गंभीर वार केले असल्याचे दिसून येत आहे. ही हत्या दुपारी 3.30 ते संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली असून ही हत्या कोणी व का केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Exit mobile version