| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील आंबेपूर-पेझारी येथील किशोर गोरखनाथ पाटील यांचे गुरुवार, दि. 19 डिसेंबर अल्पशा आजाराने निधन झाले. निधनसमयी ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली.
कोएसो. ना.ना पाटील हायस्कूल पेझारी येथून ते सेवानिवृत्त झाले होते. इंग्रजीवर प्रभुत्त्व असणारे एक बहुआयामी व्यक्तिमत्व, माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले. केवळ शिक्षण देणे इतकेच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे कार्यदेखील त्यांनी केले. खचलेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी मनोबल वाढविले, तर इंग्रजीची भीती असलेल्या बहुसंख्य मुलांच्या मनातून ती भीती नाहीशी करून इंग्रजीची आवड निर्माण केली. हसत खेळत जीवन जगणारे आणि जगायला लावणारे एक सौज्ज्वळ, मितभाषी व्यक्तिमत्व आणि म्हणूनच सर्व विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक म्हणून त्यांची एक आगळीवेगळी ओळख होती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कोएसो.ना.ना.पाटील हायस्कूल पेझारी येथे 30 वर्षांहून अधिक कालावधीसाठी इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून सेवा केली. स्व. किशोर गोरखनाथ पाटील यांचे जन्मगाव धाकटे शहापूर हे आहे; परंतु नोकरीच्या निमित्ताने ते पेझारी आंबेपूर-दारभाई तलाव येथे वास्तव्यास होते. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी त्यांच्या राहत्या घरात विनामोबदला मुलांना विद्यादान करण्याचे कार्य केले. तसेच अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी म्हणून पद भूषविले आणि सामाजिक कार्यातही आपली पकड मजबूत केली.
सेवाश्रम सामाजिक विकास सेवा संस्था वाघ्रण रायगडचे संस्थापक सदस्य, शहापूर शेतकरी संघर्ष सेवा संस्थेचे सचिव, आनंददायी शिक्षक मित्र मंडळ पेझारी हायस्कूलचे सभासद, रायगड मित्र दिवाळी अंकाचे संस्थापक जिल्हा प्रतिनिधी, तेजस्विनी फाऊंडेशनचे विश्वस्त पदाधिकारी, मनस्वी मानव सेवा संस्था भाकरवड अलिबागचे विश्वस्त पदाधिकारी अशा विविध संस्था तसेच मंडळाशी संलग्न सक्रिय कार्यकर्ते होते. अनेक प्रसंगी त्यांनी सढळ हस्ते कित्येक गरजूंना मदत केली असून, कोरोना कालावधीतील कार्यदेखील स्तुत्य आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी ललिता पाटील, दोन विवाहित मुली (एक डॉक्टर, दुसरी सी.ए), जावई, तर मुलगा (लंडन येथे एम.एस.चे शिक्षण घेत आहे.) असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी रविवार, दि. 29 डिसेंबर रोजी तर तेरावा 1 जानेवारी 2025 रोजी पेझारी आंबेपूर दारभाई तलाव येथील निवासस्थानी होणार आहे.






