महाराष्ट्राची कर्नाटकवर मात
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्राच्या मुलींना ’33व्या राष्ट्रीय किशोरी गट कबड्डी’ स्पर्धेतील ‘फ’ गटात उत्तरांचल बरोबर 68-68 अशा बरोबरीत समाधान मानावे लागले. पटणा बिहार येथील पाटली पुत्र क्रीडा संकुलात सुरू झालेल्या किशोरी गटाच्या सामन्यात महाराष्ट्राला सुरुवातीपासून कडवा संघर्ष करावा लागला. क्षणा क्षणाला उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात गुणफलक सतत दोलायमान स्थितीत पुढे सरकत होता. पण पहिला लोण देत उत्तरांचलने 17-15 अशी आघाडी घेतली. पुन्हा आणखी एक लोण देत उत्तरांचलने आपली आघाडी 27-19 अशी वाढविली. विश्रांतीला 44-33 अशी उत्तरांचलकडे आघाडी होती. विश्रांतीनंतर सामन्यातील रंगत आणखी वाढत गेली. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना महाराष्ट्राच्या मोनिका पवारने उत्तरांचलला पहिला झटका दिला. तिने उत्तरांचलचे बोनस सह 3 गडी टिपत पहिला लोण देत महाराष्ट्राची पिछाडी 64-65 अशी कमी केली. पण त्याचे विजयात रुपांतर करणे त्यांना जमले नाही. शेवटी महाराष्ट्राला बरोबरीत समाधान मानावे लागले.
मोनिकाला चढाईत बिंदिसा सोनार हिने उत्तम साथ दिली. पण महाराष्ट्राचा बचाव अगदीच ढिसाळ ठरला. रात्री उशीरा झालेल्या दुसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने कर्नाटकचे आव्हान 41-29 असे परतवून लावत बाद फेरीतील आपला प्रवेश जवळपास निश्चित केला. पहिल्या डावात 24-12 अशी आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात सावध खेळ करीत विजय आपल्या हातून निसटून दिला नाही. मोनिका पवार, बिंदिसा सोनार यांनी चढाईत गुण घेण्याचा आपला सपाटा दुसऱ्या सामन्यात देखील चालूच ठेवला. पण बचावात पुन्हा एकदा त्यांना अपयश आले. पण या विजयाने महाराष्ट्राचा बाद फेरीतील मार्ग मात्र मोकळा होईल असे वाटते. कारण आता त्यांचा सामना दुबळ्या ओरिसा संघाशी होणार आहे.







