केकेआरची आरसीबीवर मात

| बंगळुरू | वृत्तसंस्था |

आयपीएल 2023 च्या 36 व्या सामन्यात केकेआरने आरसीबीवर 21 धावांनी विजय मिळवला. केकेआरविरुद्धच्या या सामन्यात, आरसीबीने आयपीएलमध्ये 24व्यांदा एका डावात 200 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. यासह, आयपीएल इतिहासात आरसीबी संघ एका डावात 200 किंवा त्याहून अधिक धावा देणारा संघ ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम पंजाब किंग्जच्या नावावर होता.

यापूर्वी, आयपीएलमध्ये एका डावात 200 किंवा त्याहून अधिक धावा देण्याचा विक्रम आरसीबी आणि पंजाब किंग्जच्या नावावर होता. दोन्ही संघांनी संयुक्तपणे 23-23 वेळा असे केले होते. मात्र कोलकाताविरुद्ध बंगळुरूने हा लज्जास्पद विक्रम आपल्या नावावर केला. या 24 पैकी 11 वेळा आरसीबीने घरच्या मैदानावर 200 किंवा त्याहून अधिक धावा दिल्या आहेत. या यादीत सर्वात तळाशी मुंबई इंडियन्सचा संघ आहे, ज्याने केवळ 11 वेळा असे केले आहे आहे.

या सामन्यात बंगळुरूला 21 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. आरसीबीचा या मोसमातील हा चौथा पराभव आहे. विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. जेसन रॉयचे अर्धशतक आणि कर्णधार नितीश राणाच्या 48 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर कोलकाताने 200 धावा फलकावर लावल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहलीने आरसीबीसाठी 37 चेंडूत 54 धावांची खेळी निश्‍चितच खेळली, मात्र इतर कोणत्याही फलंदाजाची साथ न मिळाल्याने तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या मोसमात केकेआरने दुसर्‍यांदा आरसीबीचा पराभव केला आहे.

Exit mobile version