| खोपोली | वार्ताहर |
खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या के.एम.सी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख हा गौरवास्पद आहे. महाविद्यालयाने आजपर्यंत केलेली प्रगती उल्लेखनीय असून भविष्यकाळात एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून त्याची वाटचाल होत राहील, असे गौरवोद्गार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त प्रादेशिक अधिकारी डॉ. अनंत हर्षवर्धन यांनी काढले.
महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी विद्यासागर किल्लेदार, संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील,जेष्ठ सदस्य दत्ताजी मसुरकर, राजेश आभाणी, पोलीस उपनिरीक्षक हरीश काळसेकर, दिलीप पोरवाल, आबु जळगावकर, भास्कर लांडगे, चंद्रकांत केदारी, यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन प्रिया कोल्लारा यांच्या हस्ते संपन्न झाले. सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. उत्तम गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक महोत्सवात वक्तृत्व, काव्यवाचन, निबंध लेखन, कथाकथन, चित्रकला, रांगोळी, मेहंदी, नृत्य, नाट्य, अभिनय, गायन व प्रश्नमंजुषा अशा विविध कला प्रकारांमध्ये स्पर्धात्मक स्वरूपात हा महोत्सव संपन्न झाला.
प्राचार्य डॉ. प्रताप पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष राजेश अभाणी यांच्या हस्ते मान्यवर पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यवाह किशोर पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. जिमखाना अहवाल प्रा.जी पी मुळीक यांनी यावेळी सादर केला. यावेळी संस्थेच्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. प्रा. प्रमिला भिलारे व प्रा. मीनाक्षी ओसवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. भाऊसाहेब नन्नवरे यांनी सूत्रसंचालन केले. जिमखाना चेअरमन प्रा.एस.आर.चौरे यांनी आभार मानले.