कोलमांडले गावाची डिजिटल झेप

सर्वांगीण विकासाचे आदर्श मॉडेल; महिला स्वयंसहाय्यता गटांचे नाविन्यपूर्ण उपक्रम

| श्रीवर्धन | संदेश घोलप |

श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सर्वांगीण विकासाचे प्रभावी उदाहरण घालून दिले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, महिला सक्षमीकरणावर दिलेला भर, गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था आणि पर्यावरणपूरक उपक्रम यांच्या संगमातून गावाने प्रगतीचे नवे पर्व सुरू केले आहे.

कोलमांडले गावातील डिजिटल ग्रामपंचायत कार्यालय हे या परिवर्तनाचे केंद्रबिंदू ठरले आहे. कार्यालयात संगणकीकृत नोंदी, ऑनलाइन सेवा, ई-गव्हर्नन्स प्रणाली आणि डिजिटल व्यवहार यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक झाले आहे. जन्म-मृत्यू दाखले, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला यांसारख्या सेवांसाठी ग्रामस्थांना आता तालुक्याच्या ठिकाणी वारंवार फेऱ्या माराव्या लागत नाहीत. घरबसल्या अर्ज प्रक्रिया आणि तत्काळ सेवा उपलब्ध झाल्याने वेळ आणि खर्चाची बचत होत आहे. तसेच, गावातील महिला स्वयंसहाय्यता गटांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. घरगुती उद्योग, खाद्यपदार्थ निर्मिती, हस्तकला आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. या उपक्रमांमुळे महिलांचे उत्पन्न वाढले असून त्यांच्या सामाजिक स्थानातही सकारात्मक बदल दिसून येत आहे. गावातील विकास प्रक्रियेत महिलांचा सक्रिय सहभाग हीच या गावाची खरी ताकद ठरत आहे.

तसेच, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि सुसज्ज अंगणवाडी केंद्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. आधुनिक शिक्षणसाधने, डिजिटल शिक्षण पद्धती, स्वच्छ परिसर आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे. लहान मुलांच्या पोषण आणि आरोग्यावर विशेष भर देत अंगणवाडी केंद्रातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. गावात राबविण्यात आलेल्या परसबागा (किचन गार्डन) संकल्पनेमुळे प्रत्येक घरात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवला जात आहे. त्यामुळे कुटुंबांच्या आरोग्यात सुधारणा झाली असून बाजारातील अवलंबित्व कमी झाले आहे. गाव परिसर हिरवागार ठेवण्यासाठी वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहिमाही सातत्याने राबविल्या जात आहेत.

आदर्श गावाकडे वाटचाल
कोलमांडले गावाने तंत्रज्ञान, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि पर्यावरण या चार स्तंभांवर विकासाचे मॉडेल उभे केले आहे. स्थानिक नेतृत्व, ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि शासनाच्या योजनांचा प्रभावी वापर यामुळे गावाने समृद्धीकडे भक्कम पाऊल टाकले आहे. हा विकासाचा आदर्श इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण भागातही योग्य नियोजन आणि एकजुटीने मोठे परिवर्तन घडवता येते, हे कोलमांडले गावाने सिद्ध करून दाखवले आहे.
Exit mobile version