पावसळ्यापूर्वी घराची दुरुस्ती करण्याची लगबग
| पाताळगंगा | वार्ताहर |
पावसाचे आगमन होण्याच्या आधी खेडेगावात वेध लागायचे ते आपले घरावरती असलेले छपर व्यवस्थित करण्याचे. यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असायची. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे असल्यामुळे ती कौले सारखी करण्यासाठी प्रत्येकाची लगबग असायची. परंतु, बदलत्या काळात कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने प्रत्येक व्यक्ती घर बांधताना कौले न वापरता सिमेंटच्या पत्र्याचा उपयोग करीत आहे. यामुळे मातीची कौल इतिहासजमा होत चालली आहे.
आज शहरासह खेडेगावही बदलत चालले आहे. सिमेंटच्या जंगलांनी घरे व्यापली जात आहेत. खेड्यातील कौलारू घरासह इतरही अनेक बदल होताना आज आपणास पहावयास मिळत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच कौलारू घरांची डागडुगी करणे गरजेचे असे. यालाच घर फेरणे असे म्हणतात.
आज घर फेरणारे कारागीरही दुर्मिळ झाले आहे. कौलारू घर उन्हाळ्यातही गरम होत नाही. यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असायची. मातीची कौल ही उन्हाचा जाळ स्वत: शोषूण ते आपल्या शरीरापर्यंत नैसर्गिक गारवा पोहोचवत असते. ए.सी. किंवा कुलरची हवा नैसर्गिक नसल्याने एका मर्यादेनंतर त्यांचे दुष्परिणाम शरीरावर निश्चितच होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.