कृषीवलच्या दणक्याने पंचायत समितीला जाग कर्मचार्‍यांना बजावल्या नोटीसा

| पेण | प्रतिनिधी |

पेण पंचायत समितीमधील कर्मचार्‍यांची कामावर उशिरा येण्याची पोलखोल दैनिक कृषीवलने केली होती. या वृत्ताची दखल घेत पेणच्या गटविकास अधिकारी लता मोहिते यांनी पंचायत समितीमध्ये सर्व कर्मचार्‍यांची एकत्रित बैठक बोलवली. या बैठकीत त्यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचार्‍यांची चांगलीच कान उघडणी करत एकूण 15 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

यामध्ये राजाराम मोरे सहा.प्र.अधिकारी, सुनिल गायकवाड क्र.प्र.अधिकारी, विक्रांती अशोक तांडेल वि.अ.पंचायत समिती, स्मिता निलकंठ म्हात्रे क.अभियंता, महेंद्र पाटील व.साहाय्यक लिपीक, सुधा दिलीप पाटील क.सहाय्यक लिपीक, सेजल विनोद केतकर क.सहाय्यक लिपीक, ओमकार टालकुटे क.सहाय्यक लिपीक, सुर्यकांत परब स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, करूणा महेंद्र भोईर विषय साधनव्यक्ती, मंगल भिसे विषय साधनव्यक्ती, श्‍वेता हनुमंत सरगर विशेष शिक्षक, ज्योती रामचंद्र म्हात्रे एमआयएस को. ऑर्डीनेटर, रोहीण दामाजी म्हात्रे डाटा ऐट्री ऑपरेटर, प्रिती पु.म्हात्रे शालेय पोषण आहार ऑपरेटर या सर्वांविरूध्द महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम 1967 च्या कलम 3 अन्वये कारणे दाखवा नोटीस दिली असून येत्या चार दिवसात या 15 कर्मचार्‍यांकडून योग्य तो खुलासा मागितला आहे. योग्य तो खुलासा न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करून त्या दिवसाचे वेतन कपात केले जाईल. अशा प्रकारची लेखी नोटीस गट विकास अधिकारी लता मोहिते यांनी या सर्व 15 कर्मचार्‍यांना दिली आहे.

सर्व कर्मचार्‍यांची एकत्र बैठक घेऊन आमच्या प्रतिनिधींना गट विकास अधिकार्‍यांनी शब्द दिला आहे की, मी असे पर्यंत कोणत्याच कर्मचार्‍यांची उशिरा येण्याची सबब ऐकून घेणार नाही असे सांगितले. व आमच्या प्रतिनिधीला सांगितले की कार्यालयीन कामकाज वेळेनुसार चालेल यासाठी मी पुरेपुर प्रयत्न करीन. तसे ही माझ्याकडे अतिरीक्त भार पेण पंचायत समितीचा आहे.

Exit mobile version