। नेरळ । वार्ताहर ।
सुवर्णमहोत्सवी नेरळ विद्यामंदिर, नेरळ शाळेतील शिक्षक कृष्णा हाबळे व जयवंत पारधी यांना मनुष्यबळ अकादमीचे राष्ट्रस्तरीय भारतज्योती गुरू सन्मान पुरस्काराने शिक्षकदिनी सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतातील विविध राज्यांतील 150हुन अधिक गुणी शिक्षक, प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात मलेशियातील काही शिक्षकरत्नाचा देखील गौरव करण्यात आला.
विद्यामंदिर मंडळ माहीम संचालित नेरळ विद्यामंदिर नेरळ शाळेत सहाय्यक शिक्षकपदी कार्यरत असलेले कृष्णा हाबळे यांना यंदाचा राष्ट्रस्तरीय भारतज्योती शिक्षक प्रतिभा सन्मान पुरस्कार तर याच शाळेतील क्रीडा शिक्षक जयवंत कमळू पारधी यांना राष्ट्रस्तरीय भारत ज्योती विद्यारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. जयवंत पारधी हे क्रीडाप्रशिक्षक व स्काऊट शिक्षक असून गेली 20 वर्षे नेरळ विद्यामंदिर शाळेत कार्यरत आहेत.
या दोन्ही शिक्षकांना मनुष्यबळ विकास अकादमीच्या ऑनलाईन कार्यक्रमात शिक्षकदिनाचे औचत्य साधून पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह, अॅड.कृष्णाजी जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरवण्यात आले. विद्यामंदिर माहीम संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.