‘जय भीम’चे अभिनंदन!

हम आह भी भरते है तो हो जाते है बदनाम
वो कत्ल भी करते है तो चर्चा नही होता.
(आम्ही नुसते उसासे टाकले तरी बदनाम होतो; त्यांनी खून केला तरी त्याची चर्चा होत नाही)
सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी शायर अकबर इलाहाबादी यांचा हा प्रसिद्ध शेर आठवण्याचे कारण म्हणजे अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जय भीम’ या चित्रपटाच्या निमित्ताने देशभरात निर्माण झालेला धुरळा. प्रदर्शित होताच या तमिळ चित्रपटाने केवळ रसिकांची आणि समीक्षकांची मने जिंकलेली नाहीत तर नवे राजकीय वादळही निर्माण केलेले आहे. एका बाजूला हा चित्रपट माध्यम आशयाच्या मांडणीविषयी देशातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे नवा अजेंडा मांडत आहे तर त्याच वेळी समाजातील विषमतेच्या भीषण परिस्थितीवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट राजकारणाच्या खोटे मुखवटे उघडे पाडू लागलेला आहे. आपल्या देशातील परिस्थितीवर ज्याची नजर आहे, त्याला पोलीस कोठडीत पोलिसांच्या अमानुष अत्याचारात मृत्यू पावण्याच्या प्रकारांबद्दल माहिती असेलच. नुकतीच अशी एक केस उत्तर प्रदेशात घडली, जेथे अल्ताफ नावाच्या 22 वर्षांच्या मुलाला पोलीस कोठडीत मृत्यू आला. अशी अगणित प्रकरणे आपल्या देशात आहेत. सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार 2018 ते 2020 या दोन वर्षांत सुमारे साडेतीनशे जण पोलिसांच्या छळाला बळी पडले. गुन्हा कबुल करावा म्हणून पोलीस आरोपीवर अनन्वित शारिरीक छळ करतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रातील एक गाजलेले उदाहरण म्हणजे ख्वाजा युनुस प्रकरण. या तरुणाला बाँबस्फोटाच्या आरोपाखाली पकडले गेले आणि आता खुद्द कोठडीत असलेल्या सचिन वाजे यांनी त्याचा अमानुष छळ केला. त्यात त्याला मृत्यू आल्यानंतर त्याचे प्रेत परस्पर जाळून नष्ट केल्यानंतर सदर आरोपी दुसरीकडे नेला जात असताना पळून गेला आणि फरारी आहे असे फाईलमध्ये नोंदवून ठेवले. त्याचे नाव अजूनही पळून गेला असेच आहे, प्रत्यक्षात त्याचे प्रेत जाळून नष्ट करण्यात आले. अशाच एका रसकण्णू या विवाहित आदिवासी तरुणाला 25 वर्षांपूर्वी एका चोरीच्या आरोपाखाली अटक करून त्याचा अनेक दिवस छळ केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मृतदेह लांब राज्याच्या सीमेवर टाकून तो पळून जात असताना गाडीने ठोकर दिल्याने मरण पावला असे भासवले. त्याची गरोदर पत्नी पार्वतीने आपल्या नवरा नेमका कशाने मेला यासाठी दिलेला लढा आणि त्याला पुढे मुख्य न्यायाधीश बनलेल्या वकिल के. चंद्रू यांनी दिलेली साथ यावर हा ‘जय भीम’चित्रपट आधारित आहे. जवळपास तीन दशकांपूर्वीच्या एका लढ्याच्या पार्श्‍वभूमीवर ही कथा घडत असली तरी देशाला स्वातंत्र्य मिळून पाऊणशे वर्षे झाली तरी समाजातील विषमता नष्ट होण्याचे तर दूरच, या समाजातील सर्वाधिक कमकुवत वर्गाचा छळ आणि अन्याय यात काहीही फरक पडलेला नाही, अशी विषण्ण करून देणारी जाणीव हा चित्रपट करून देतो. त्याचबरोबर अशा स्वत:ला सुशिक्षित समजणार्‍या समाजाला जी चर्चा नकोशी वाटते, त्याला व्यावसायिक चित्रपटाच्या मुख्य प्रवाहात आणून आरशात पाहण्यास भाग पाडता येते आणि त्याचा समाज संवेदनशीलतेने स्वीकारही करतो, अशी सकारात्मकताही या चित्रपटाने निर्माण केली आहे. मात्र आपल्या समाजात तेही आहेत जे अशा विषमतेवर जगतात. त्यांना समता आणि वैश्‍विक मानवतेची मूल्ये मान्य नसतात. त्यांनी या चित्रपटाच्या विरोधात आवाज उठवला आणि यातील जातीय विषमतेचा उल्लेख केला, जातीचे नाव घेतले, अशा निमित्ताने न्यायमूर्ती चंद्रू यांचे पात्र पडद्यावर साकारलेल्या अभिनेता सुरीया याच्यावर हल्ला करणार्‍यांना एक लाखाचे बक्षिस जाहीर केले. म्हणजे समाजात तुडवण्यासाठी, शोषणासाठी एक वर्ग अस्तित्वात राहिला पाहिजे, मात्र त्याबद्दल बोलले तर तो गुन्हा, असा एक वर्ग सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणात डोके वर काढून द्वेष आणि जातीपातीच्या भिंती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याला चपराक या चित्रपटाच्या चाहत्यांनी दिली आहे. सुरीयाचे चाहतेही मोठ्या प्रमाणात त्याच्या बाजूने उभे राहिले. अन्य मोठे कलाकार उभे राहिले. आणि अर्थात पोलीस संरक्षण त्यांना दिले गेले आहे. सुरीया स्वत: अनेक वर्षे दानशूर म्हणून प्रख्यात आहे. त्याने आणि जय भीमच्या चमूने दाखवलेल्या धाडसामुळे एक महत्त्वाचा विषय चर्चेत आला आहे. त्याबद्दल ते सगळे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले सगळे अभिनंदनास पात्र आहेत.  

Exit mobile version