बळ दे झुंजायाला!

गेल्या दोन वर्षांपासून संकटांचा फेराच समस्त विश्‍वाच्या मागे लागला आहे. दीड वर्षापासून सुरु झालेली कोरोनाची साथ अद्यापही सुरु आहे. जरा कुठे, शिथिलता आली असं वाटतं होतं. तोपर्यंत कोरोनाने ओमिक्रॉनच्या रुपानं नवा अवतार घेतला आणि अवघं जग पुन्हा एकदा भीतीच्या सावटाखाली वावरू लागलं. अजून त्या ओमिक्रॉनचे स्वरुप स्पष्ट व्हायचं आहे. तोपर्यंतच जो काही गोंगाट झालाय.त्या गोंगाटानेच अवघ जग हादरुन गेलंय. याबाबत जे मत व्यक्त करत आहेत त्यांच्यात सुद्धा एकवाक्यता दिसून येत नाही. काहीजणांच्या मते हा ओमिक्रॉन धोक्याचा आहे. तर अनेकांना वाटतो तो तसा घातक नाही. यावरुनही मतभिन्नता दिसून येते. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय क्षेत्राचे एकमत होत नाही तोपर्यंत उगीच घाबरण्यातही काही अर्थ नाही. कारण घाबरुनच आपण निम्मे हवालदिल झालेलो आहोत. यासाठी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. सरकारी पातळीवर देखील याबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे जाणवत आहेत. सरकारने लसीकरण आणखी वाढविण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी  जे लस घेणार नाहीत त्यांच्यावर आता कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.लसीकरण झाले तर निदान ओमिक्रॉन सारख्या साथीला तोंड देणे शक्य होणार आहे, यासाठी लसीकरण हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याने सरकारने लसीकरण आता सक्तीचे केलेले आहे. नागरिकांनीही आपले आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. पहिल्या दोन लाटेत मला काय झाले नाही, आता हा ओमिक्रॉन काय करणार अशा भ्रमात राहून उगीच आपला सोन्यासारखा जीव संकटात ढकलू नका. कारण हा ओमिक्रॉन कोणत्याही क्षणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओमिक्रॉनचे हे संकट डोक्यावर असतानाच निसर्गानेही आपलं रुप पालटलंय. सध्या एकाच वेळी उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा याचा अनुभव आपण सारे घेत आहोत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या नैसर्गिक बदलावामुळे ऐन कडाक्याच्या थंडीतच पावसाने जोरकस हजेरी लावली आणि होत्याचे नव्हते करुन टाकलंय. बळीराजा यातून सावरणार कसा हाच मोठा प्रश्‍न यानिमित्ताने उभा राहतोय. कारण अजूनही पाऊस कधी थांबेल हे कुणालाच सांगता येणे अशक्य झालेले आहे.या अवकाळी पावसाने शेतातून कापून आलेले पीक भिजून लगदा झाले आहे.वर्षभर कष्ट करुन कमावलेले धान्यच या अवकाळी पावसाने पूर्णपणे नष्ट करुन टाकल्याने खायचे काय याचीच चिंता आता सर्वसामान्यांना लागली आहे. आधीच गेल्या दोन वर्षात विविध नैसर्गिक संकटांनी बळीराजाचे कंबरडेच मोडले आहे.त्यावर मात करीत काबाडकष्ट करीत बळीराजाने शिवारात धान्य पिकविले खरे, पण तेच पिकविलेले धान्य भिजवून टाकण्याचे काम निसर्गाने अवकाळीच्या रुपाने केलेले आहे. संकटांची ही मालिका संपणार तरी कधी असा सवाल यानिमित्ताने मनात उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. निसर्गाचा होत असलेला हा बदल मानवाला घातकच ठरु लागलाय हे कुणीही नाकारु शकत नाही. निसर्गाचे हे बदलतं रुपं भावीकाळात असंच बदलतं राहिले तर त्याचे वाईट परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. संकटाचा फेरा म्हणतात तो हाच आहे. अर्थात याला आपणही तितकेच जबाबदार आहोत हे कुणीही नाकारु शकत नाही.निसर्गाचा असमतोल का झालाय याचा आता गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. विकासाच्या नावाखाली सुरु असलेली निसर्गाची अवहेलना, पर्यावरणाचा ढासळत चाललेला आलेख याचा विपरित परिणाच निसर्गावर होत असल्याने तो अशी संकटे मागोमाग पाठवित आहे.त्यातून कसे सावरायचे याचा विचार आता सर्वांनी करणे गरजेचे आहे. अवकाळी पावसाने धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा परिणाम खुल्या मार्केटमध्येही मोठ्या प्रमाणात झाला आहे. आधीच महागाईने होरपळून गेलेल्या सर्वसामान्यांना आता तर त्याहीपेक्षा जास्त पटीने महागाईला सामोरे जावे लागत आहे. बळीराजाच्या भिजलेल्या धान्याचा भाव कमी झाला असला तरी बाजारात जे काही बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे त्या जीवनाश्यक वस्तूंचे दर गगनाला गवसणी घालू लागलेले आहेत. उत्पन्नाचे मार्ग कमी झाले असले तरी जगण्यासाठी धडपड ही करावी लागत आहे.ती नैमित्तिक गरज भागविताना जीव मेटाकुटीस आल्याशिवाय रहात नाही. हे सारे संकट पेलण्यासाठी सर्वांनाच गरज आहे ती झुंजण्याची. ती झूंज अशीच चालू ठेवण्यासाठी बळ दे झुंजायला, अशी आर्त विनवणी करण्याची वेळ सर्वांवर आली आहे हे नक्की.

Exit mobile version