नवी आशा,नवी दिशा…

अनेक कटु आठवणींना सोबत घेत मावळत्या वर्षाने या धरतीचा निरोप घेतला आणि नव्या वर्षाचा सूर्य नवी आशा, नवी दिशा घेऊन दिमाखात दाखल झाला. नवीन वर्षात पदार्पण करताना मागे वळून बघावे,असे नेहमी बोलले जाते. काय कमावले, काय गमावले, नवीन काय करायचं याचा सारासार विचार आपण सर्वांनी करणे अगत्याचे वाटते.कारण नवीन वर्षात पदार्पण करताना जुन्या वर्षात केलेले संकल्प पूर्ण झाले का, ते पूर्ण झाले असतील, होणार असतील तर त्याचा मनाला होणारा आनंद काही औरच असतो. तर एखादी गोष्ट साध्यच झाली नाही तर त्याची वाटणारी हुरुहूर देखील तितकीच मनाला वेदना देणारी ठरते. त्यासाठी सिंहावलोकन अवश्य करावे.जेणेकरुन राहिलेल्या अपुर्‍या गोष्टी पूर्ण करणे नवीन वर्षात शक्य होते. गेली दोन वर्षे विश्‍वातील सार्‍या मानवाला अतिशय त्रासाची,वेदना देऊन जाणारी गेली आहेत.त्यातून आता जरा कुठं आपण सावरु लागलोय.पण अजूनही धोका टळलेला नाही.त्यामुळे नवीन वर्षात देखील प्रवेश करताना आवश्यक ती सावधानता बाळगणे क्रमप्राप्त ठरणार आहे.कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमीक्रॉनच्या रुपाने दाखल झाला आहे. त्याची व्याप्ती वाढू दिवसेंदिवस वाढू लागलेली आहे. जागतिक आरोग्य संघनटनेने देखील योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिलेले आहेत.भारत सरकारनेही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत.सर्वच महाराष्ट्रासह आठ राज्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पहिल्या दोन लाटेपेक्षा संभाव्य लाटेला तोंड देण्यास देशाची आणि राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे हे नाकारुन चालणार नाही. कोरोनाच्या साथीमुळे राज्याचे, देशाचे रुतलेले अर्थचक्र आता कुठे गतीमान होत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होऊ लागल्याने लॉकडाऊन लागते की काय,याबाबत सर्वांच्या मनात भीती निर्माण होऊ लागलेली आहे.हे चक्र रुतू न देता त्याला आगामी वर्षात आणखी गतीमान करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांसह आपल्या सर्वांवर आहे याचे भान सर्वांनीच ठेवणे गरजेचे आहे. कारण अर्थचक्र गतीमान झाले तर आपल्या जीवनाचा पर्यायाने देशाचा गाडा सुरळीत चालणार आहे.दीड वर्षानंतर राज्यातील ज्ञानमंदिरे उघडून पुन्हा नव्या जोमाने सुरु झालेली आहेत. ती ज्ञानमंदिरे पुन्हा बंद होणार नाहीत याची काळजी आपल्या सर्वांना नवीन वर्षात घ्यायची आहे.कारण दीड वर्षात आपल्याच अपत्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान आपण डोळ्यांनी पहात आलोय.तसा प्रसंग भविष्यात येऊन आपल्या पाल्याचे शिक्षण थांबता कामा नये याचा निर्धारही आपल्या सर्वांना करावा लागणार आहे.कोरोनाची साथ ही कायमस्वरुपी जाईल असं कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.त्यामुळे आता भविष्यात कोरोना संगेच जीवन जगावे लागणार आहे.यासाठी आवश्यक ती खबरदारी घेणे हे आता प्रत्येकाचे कर्तव्यच बनलेले आहे.मावळत्या वर्षात अनेक दुर्घटनांना सामोरे जावे लागले.त्यात नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात कोसळल्या.त्या आपत्तींतून बाहेर पडण्यासाठी सर्वस्तरातून मदतीचा हात पुढे करण्यात आला. संकटसमयी परस्परांना सहाय्य करण्याची वृत्ती मावळत्या वर्षात सर्वत्र दिसून आली.तीच वृत्ती नवीन वर्षातही कायम राहिली पाहिजे याची दक्षता सर्वांनीच घ्यावी लागणार आहे.कारण संकट हे सांगून येत नाही.कुणावरही ते कधीही कुठल्याही स्वरुपात येऊ शकते.त्या संकटसमयी आपल्याला देखील अशीच मदत मिळाली पाहिजे याचे भान ठेऊन नवीन वर्षात पदार्पण करताना मदतीची भावना कायम ठेवणे आवश्यक आहे.सुदैवाने संकटसमयी आवश्यक ती मदत करण्याचे वरदान परमेश्‍वराने या भूमीला दिलेले आहे.नवीन वर्षात नवीन संकल्प निश्‍चित करुया.जेणे करुन आपल्याला भविष्याचा वेध घेणे शक्य होणार आहे.अजून बराच पल्ला गाठायचा आहे.त्यासाठी निश्‍चित असा मार्ग निवडता आला पाहिजे.त्या निवडलेल्या मार्गावरुन वाटचालही सुरळीत झाली पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकणार आहोत.निवडलेल्या मार्गावरुन चालताना काहीही संकटे आली तरी त्या संकटांवर मात करण्याची धारिष्ट्य आपल्या अंगी असले पाहिजे तरच इप्सित साध्य करणे शक्य होणार आहे.निवडलेल्या मार्गावरुन परत मागे न फिरण्याचा निश्‍चयही आपल्याला करावयाचा आहे. त्यापेक्षा पुढे,पुढे चालत रहा, संकटांवर मात करुन ध्येयापर्यंत पोहोचा.त्यावेळी होणारा आनंद आपोआपच तुमच्या चेहर्‍यावर उमटलेला दिसेल.हा आनंदच तुमच्या कर्तृत्वाला साजेसा असाच असणार आहे.नवीन वर्षात आपल्याला हे सारे कमवायचे आहे.

Exit mobile version