उत्तर प्रदेशसह देशातील पाच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सगळीकडे निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे. त्यात सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील घडामोडींकडे औत्सुक्याने पाहिले जात आहे. तेथे सात टप्प्यात निवडणुका होणार असून पहिल्या टप्प्यातील उमेदवार निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिल्लीत दाखल झाले असतानाच तेथील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. योगींच्या सरकारमधील कामगार कल्याणमंत्री व ओबीसी समाजातील प्रबळ नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला. मौर्य यांचे समर्थक व भाजपचे तिंदवारीचे आमदार ब्रजेश प्रजापती यांच्यासह अन्य दोन आमदारांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली़. स्वामी प्रसाद मौर्य यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिलेल्या राजीनामापत्रात नमूद केले आहे की त्यांनी वैचारिक मतभेद आणि प्रतिकूल परिस्थितीतही योगी सरकारमध्ये कामगार कल्याणमंत्री म्हणून जबाबदारीने काम केले. पण दलित, मागासवर्ग, शेतकरी, बेरोजगार तरुण अशा अनेक समाजांच्या मागण्यांकडे योगी सरकार दुर्लक्ष करत आहे. त्याचा निषेध म्हणून ते मंत्रिपदाचा राजीनामा देत आहेत. राजीनाम्यानंतर मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतली. यादव यांनी मौर्य यांचे समाजवादी पक्षात स्वागत केले. आमदार ब्रजेश प्रजापती यांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला़ सामाजिक न्याय व समतेसाठी लढणार्या लोकप्रिय नेत्यांपैकी स्वामी प्रसाद मौर्य असून, त्यांच्याबरोबर समाजवादी पक्षामध्ये येणारे अन्य नेते, कार्यकर्ते, समर्थक यांचे हार्दिक स्वागत आहे, असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अन्य काही नेतेही सपमध्ये जाणार असल्याची चर्चा आह़े आतापर्यंत पाच आमदारांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या मते, 13 आमदार लवकरच समाजवादी पक्षात प्रवेश करतील. येथे शरद पवारांचा मुद्दा लक्षात घेण्याचे महत्वाचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्षाच्या सोबत तेथे निवडणूक लढवत आहे. स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशातील मौर्य व कुशवाह या ओबीसी समाजाचे प्रमुख नेते आहेत. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव ज्या प्रकारे सोशल इंजिनियरिंगद्वारे राज्यातील ओबीसींना एकत्र आणण्याचे प्रयत्न करीत आहेत, त्या दृष्टीने त्यांचे हे मोठे यश मानायला हवे. त्यादृष्टीने त्यांना येत्या विधानसभेत राज्याच्या पूर्व भागातील मतदारसंघात चांगला फायदा होऊ शकतो. मात्र या एका गोष्टीने भाजपला पराभूत करता येईल, असे मानण्याचे कारण नाही. उत्तर प्रदेशात जनतेला बदल हवा आहे. या निवडणुकीत जनता एका धर्माच्या विचारसरणीवर चाललेले सरकार बदलण्यास उत्सुक आहे, असे अनेक राजकीय तज्ज्ञ सांगतात. देशात सर्वधर्म समभावाची भावना अधिक बळकट करायची असेल तर उत्तर प्रदेशातून भाजप सरकारला सत्तेतून बाहेर करणे हाच उपाय आहे, असे शरद पवार यांनीही म्हटले आहे. मात्र तसे तात्विक पातळीवर वाटणे वेगळे आणि प्रत्यक्ष निवडणुका जिंकणे वेगळे. कारण जनतेमध्ये अशी भावना असणे रास्त आहे. या भावनेला मतांत रुपांतर करता येणे हे अधिक महत्वाचे आहे. ते कसे केले जाते हे पाहावे लागेल. कारण, भाजपाने पुन्हा विजय मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. निवडणूक आयोगाने 15 जानेवारीपर्यंत जाहीर प्रचारसभा, पदयात्रा, रोड शो, चौक सभा घेण्यास बंदी घातलेली असली तरी त्याआधीच भाजपाने मोठ्या प्रमाणात सभा आणि विकासकामांचे उद्घाटन करण्याच्या निमित्ताने मतदारांना प्रभावित केले आहे. मोदी यांचेही मोठे दौरे आधीच झालेले आहेत. त्यांच्या मोफत रेशनचा फायदा झालेला आहे. आता गृहमंत्री अमित शाह यांनी कोअर कमिटीची तब्बल 10 तास बैठक घेतल्याचे वृत्त आहे. त्यात भाजपमधून बाहेर पडणार्यांचाही विचार नक्की केला जाईल. कारण, मौर्य यांच्यासारख्या मोठ्या मंत्र्यांने आणि ओबीसी नेत्याने भाजप सोडणे आणि समाजवादी पक्षात येणे यातून महत्वाचा संदेश दिला गेला आहे हे ही तितकेच खरे आहे. त्याचा परिणाम येत्या काही काळात झालेला दिसून येईल. निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात बर्याच घडामोडी दिसून येतील. जनतेमध्ये भाजपच्या अन्यायकारक, विद्वेषकारी राजवटीच्या विरोधात जो रोष आहे, तो मतांत किती परिवर्तीत होतो हे पाहावे लागेल.






