हवामानातील बदलांमुळे मुंबई शहर आणि त्याच्या आसपासच्या भागात रविवारी सकाळी एखाद्या विज्ञान चित्रपटात आढळणारे अनपेक्षित दृश्य पाहायला मिळाले. शहरातील काही भागांतील अनेक वाहनांवर सकाळच्या वेळेत पांढरट रंगाचा थर पसरल्याचे दिसून आले आणि आसपासचे दृश्यही अस्पष्ट दिसत असल्याचा अनुभव आला. हा थर नेमका कसला आणि अशी परिस्थिती कशामुळे निर्माण झालेली असावी, असा प्रश्न सुरुवातीला नागरिकांना पडला होता. त्यानंतर याविषयीची माहिती येत गेली आणि या विलक्षण प्रकाराचे रहस्य उलगडत गेले. गुजरात आणि राजस्थानकडून आलेल्या धुळीच्या वादळामुळे हवामानात बदल दिसत असून, त्याचा स्रोत पाकिस्तानात आहे. तसेच, मध्य पूर्वेतील इराण आदी भागातील वाळू आणि धुलीकण नैसर्गिक शक्तींच्या कार्यामुळे मुंबई आणि परिसरात पसरले असे लक्षात आले. त्याच बरोबर, मुंबई शहराला लागून असलेल्या रायगड तसेच कोकणातील अनेक भागांमध्ये या काळातच अवकाळी पावसाचे सावट निर्माण झाले. मुंबई, नवी मुंबईतील काही भागांत पावसाचा शिडकावा पडला तर अलिबागमध्ये त्याच्या अल्पकाळात सरींवर सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत रात्री हलका पाऊस झाला. त्यासोबतच महाबळेश्वर, खेड आणि चिपळूणमध्येही मध्यरात्री पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. आंबोलीसारख्या काही पर्यटनस्थळी या पावसामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. कारण तेथे एरव्ही पडत असलेले धुके पावसामुळे अधिक रोमांचित करणारे बनले. या जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील अनेक भाग आंबा, काजू या नगदी पिकांनी भरलेले आणि हे दिवसही या फळांचे, बियांचे उत्पादन ठरवणारे. त्यामुळे या दिवसांतील अशा जोरदार अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत न पडले असते तरच नवल! कारण अशा अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून जाण्याचा किंवा त्याला कीड लागण्याचा धोका असतो. महाराष्ट्रात अन्य काही ठिकाणीही पाऊस झाला. तेथे शेतकर्यांचे थेट नुकसान झाले नसले तरी पावसाने लावलेल्या या अवेळी हजेरीने आजारपणांना वाव मिळतो, या कारणास्तव लोकांना चिंता वाटते. पुण्यामध्ये काही ठिकाणी पावसाने आपले अस्तित्व दाखवून दिले तर पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावमध्येही पावसाने हजेरी लावली. त्यातील संभाव्य नुकसानीचे तपशील कालांतराने हाती येतीलच. मात्र पाऊस हा ओळखीचा शत्रू आहे. धुळीचे थर आणि वाळूचे वादळ हे प्रकार नवे आहेत. पाकिस्तानच्या कराची भागात नुकतेच धुळीचे वादळ आले होते, असे वृत्त आहे. तेच वादळ पुढे राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने सरकले असे दिसते. या अचानकपणे वातावरणात अनुभवायला आलेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. कारण सध्या करोनाची तिसरी लाट सुरू आहे आणि त्या विषाणूला असे वातावरण बदल मोठ्या प्रमाणात पसरण्यासाठी अनुकूल ठरू शकतात. कारण, या बदलामुळे रविवारी तसेच सोमवारी तापमानातही मोठी घट अचानकपणे अनुभवायला आली. थंडीचे दिवस हळूहळू सर्वसामान्य तापमानात बदलत असल्याचा अनुभव गेल्या आठवड्यात येत असताना गेले दोन दिवस अतीव थंडीने धक्का दिला. कोरोनाची तिसरी लाट सौम्य वाटत असली तरी सर्दी खोकला आणि ताप याचा प्रसार खूप आहे आणि त्यात हे बदल परिस्थिती अधिक गंभीर बनवू शकतात. तथापि, व्यापकपणे या गोष्टीकडे पाहणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने याबाबत तज्ज्ञांनी काय सांगितले आहे, हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. सदर धुळीचे स्रोत मध्य पूर्वेतील प्रदेश आणि पाकिस्तानमधील रखरखीत भाग हे आहेत. तथापि, मध्यपूर्वेत अशा घटना सर्वसामान्य आणि तेथील रहिवाशांसाठी नित्याच्या असल्या तरी तसे प्रकार केवळ वसंत ऋतू आणि उन्हाळ्याच्या हंगामात अधिक वारंवार होताना दिसतात. कारण, जेव्हा तापमान उच्च पातळीवर जाते तेव्हा वातावरणातील स्थिरता बदलते. त्याच्या जोडीला जोरदार वारे असल्यास या सर्व घटकांतून धुळीच्या वादळांना चालना मिळते. जून आणि जुलैमध्ये अशा प्रकारांसाठी आदर्श परिस्थिती निर्माण होत असली तरी त्या धुळीच्या वादळांचा भारतीतील मान्सूनच्या जोरामुळे मुंबई आदी शहरांवर परिणाम होत नाही, म्हणून दिसतही नाही. म्हणजे ऋतूचक्राचा हिशेब निसर्गाकडून चुकत आहे. ठराविक काळातच स्थानिक पातळीवरील असे निसर्ग प्रकोप हवामान बदलामुळे आणि निसर्गाचे चक्र बिघडल्यामुळे व्यापक होत आहेत. यामुळे वेळीच सावरणे महत्वाचे आहे.
निसर्गाचे इशारे

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
by
Santosh Raul
July 22, 2024