समाजाचा सर्जन लेखक

ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात खर्‍या अर्थाने पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे डॉक्टर असणे, सामाजिक कार्यकर्ते असणे, साहित्यिक असणे किंवा पत्रकार असणे, हे सगळे अपघाती होते. ते प्रशिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर होते, पण त्यांनी एकही दिवस प्रॅक्टिस केली नाही. त्यांचे लेखन पत्रकारांना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करणारे होते पण त्यांनी पत्रकारितेचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही की पारंपरिक व्यावसायिक पत्रकारितेत सामील झाले नाहीत. त्यांचे साहित्य थेट, स्पष्ट, सोपे असे आयाम असलेले होते आणि त्यांनी तसे ठरवून काही साहित्यिक बनण्यासाठी लेखन केले नाही. तथापि, त्यांच्या हातून लोकप्रिय तसेच जनतेचे डोळे उघडणारे साहित्यिक, पत्रकार म्हणून लेखन घडले. त्यांनी डॉक्टर बनूनही रुग्णांना बरे केले नसले तरी समाजातील एरव्ही लपून राहणारी आणि गृहित धरलेली रोगराई समोर आणून दाखवण्याची सर्जरी केली. त्यांनी योगदान दिलेल्या सर्वच क्षेत्रासाठी त्यांच्याकडे असलेले स्पष्ट विचार, त्याबद्दलची अतीव कटिबद्धता आणि स्वत:च्या पलिकडे असलेल्या जगाशी नाते याची सातत्याने जाणीव ठेवणारे जिवंत मन कारणीभूत होते. त्यामुळे बिहारमधील पुर्णियातील वाडीवस्तीतील परिस्थितीपासून पुण्यातील सर्व शोषित वर्गापर्यंतचे विषय त्यांच्या लेखनात आले. या सजग आणि जिवंत मनामुळेच समाजातील व्यसनाधीनतेचे प्रश्‍न त्यांना जाणवले आणि त्यांच्यातील कटिबद्धतेने आणि स्वत:च्या पलिकडील जगाशी असलेल्या बांधिलकीच्या देण्यातून त्यांनी आपली पत्नी डॉ. सुनंदा यांच्या सोबतीने मुक्तांंगण या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे जन्मलेल्या अनिल अवचट यांनी पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस ची पदवी घेतली. या काळात त्यांनी अनेक चळवळींत भाग घेतला. वैद्यकीय दौर्‍यात खेड्यापाड्यांतील पुस्तकात नमूद केलेल्या पलिकडची भीषण परिस्थिती त्यांनी पाहिली आणि ते डॉक्टर बनूनही त्यांनी प्रॅक्टिस न करता समाजसेवा आणि पत्रकारितेद्वारे नेहमीच गरीब, अन्यायग्रस्त व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी काम सुरू केले. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या, हमाल यांच्या प्रश्‍नांविषयी तसेच विविध प्रश्‍नांंवर लढा देणार्‍या व आपले संपूर्ण आयुष्य एखाद्या समस्या निवारणासाठी वेचणार्‍यांवर त्यांनी लेखन केले. त्यातून धागे उभे आडवे, माणसं ही पुस्तके मराठी समाजाला जागे करणारी ठरली. नुकताच पद्मश्री पुरस्कार प्राप्त झालेल्या विंचूदंशासंदर्भात निष्ठेने काम करणार्‍या डॉ. हिंमतराव बावस्करांना अवचट यांनीच अनेक वर्षांपूर्वी जगापुढे आणले होते. आपल्या लेखनातून, पत्रकारितेतून त्यांनी समाजात असलेले परंतु अदृश्य राहिलेले अनेक वर्ग दृश्यमान केलेच, शिवाय ही सगळी जितीजागती माणसे आहेत याची जाणीव त्यांचे भावविश्‍व आपल्यासमोर उलगडून दाखवून दिले. कोणत्याही मोठ्या साधनांची वाट पाहात ते थांबले नाहीत तर जे आहे त्यासरशी चालू पडत. सोय गैरसोय, उन्हाळा-पावसाळा याचा विचार न करता केवळ माणसांना अनुभवण्यासाठी त्यांनी आपल्या परिसरातील तसेच लांबवरच्याही गावे पिंजून काढली आणि त्यांचे जीवन रेखाटले. त्यांचा लोकसंग्रह कमालीचा विपुल होता. कारण ते सातत्याने अनोळखी लोकांमध्ये जात आणि त्यांना जाणून घेत. त्याबद्दल जे आणि जसे अनुभवले ते जशास तसे लिहितही राहिले. आपले अंतरंगही त्यांनी खूप खुले करून दिले. यासंदर्भात त्यांनी ‘स्वत:विषयी’ या पुस्तकात दहावीचे वर्ष, मेडिकलची पाच वर्षे आदी लेखातून आपले आयुष्यही पारदर्शकपणे मांडले. ते अनुभव आजही कोणालाही स्वत:चे आयुष्य रीसेट करण्यास पुरेसे आहेत. तसेच, त्यांनी आपल्या मुक्ता आणि यशोदा या मुलींना ज्या पद्धतीने वाढवलं. संस्कार केले आणि जगाशी जोडून दिले, तेही आजही आदर्श म्हणावे असे का आहे, हेदेखील हे पुस्तक वाचून लक्षात येते. आपल्याला एक आयुष्य लाभते, ते सुंदरपणाने, सहजपणाने, सकसपणे कसे जगावे हेही अवचट नकळतपणे सांगून गेले आहेत. बहुसंख्य समाज आपला उदरनिर्वाह, आपले कुटुंब तसेच आपले आप्त आणि आपली इस्टेट या कोषात गुंतून गेला असताना अवचट नित्यनूतन डोळ्यांनी जगाकडे पाहात राहिले. त्यात त्यांना जे दिसले त्यात आपले कोणतेही रंग न भरता जशास तसे कागदावर उतरवून समाजापुढे ठेवले. ते करत असताना हरेक क्षण आनंदमय करत, त्यात आपल्या चित्रकला, शिल्पकला, बासुरीवादन आदींने सफल आयुष्याचा रंगही भरला आणि मंत्रही दिला. त्यांना विनम्र आदरांजली!  

Exit mobile version