नरेंद्र मोदी हे किती हरफन मौला आहेत हे त्यांना हजारों वेशभूषेत पाहिलेल्या सर्वांना माहिती झालेले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातही त्यांच्या व्यतिरिक्त कोणी दिसत नाही इतके ते सगळीकडे असतात. त्यांनी नुकतेच संसदेत केलेले भाषण पाहून अनेकांना त्यांनी पक्षप्रवक्तेपदही स्वत:कडे घेतले की काय, असे वाटल्यावाचून राहिले नाही. त्यांचा अजेंडा म्हणजे काहीही करून निवडणुकीशी संबंधित राज्यांत राजकीय कलह घडवून आणणे आणि ज्या ठिकाणी सत्तेची द्राक्षे आंबट ठरली त्या आंबटपणामुळे होणारी हृदयाची जळजळ त्या राज्यातील सरकारला कोणत्याही प्रकारे बदनाम करीत व्यक्त करणे. त्यासाठी त्यांना वास्तव, सत्य आदी गोष्टींची काहीही गरज नसते. ते अरेबियन नाईट्च्या लेखकालाही लाजवेल अशा सुरस आणि चमत्कारीक कथा लीलया आपल्या विलक्षण कल्पनाशक्तीने जुळवू शकतात. केवळ कथाच नव्हे तर ते अनेक वैज्ञानिक शोधही जन्माला घालू शकतात आणि गणिती प्रमेयही सादर करू शकतात. त्यांनी गटारातून निघणार्या गॅसने चहा बनवलेला आहे आणि स्टेशनवर चहा विकत, भीक मागून जगत असताना ते एनसीसी कॅडेटही बनलेले आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राने कोरोना देशभर पसरवला ही सूरस कथा रचली आणि वाद निर्माण करून दिला. कारण उत्तर प्रदेशातील निवडणुका महत्त्वाच्या आणि तेथील योगी सरकारने कोरोना काळात केलेल्या अकार्यक्षम व्यवस्थेमुळे संपूर्ण गंगेकाठी तरंगणारे आणि किनार्यावरच पुरले गेलेले हजारो मृतदेह जगाने पाहिले आहेत. तसेच मृतदेह अंतिम संस्कारांसाठी स्मशानात दोन दोन दिवस रांगेत ठेवलेले आणि त्यासाठी हजारो रुपयांची लूटमार करणारे प्रशासन पाहिले आहे. आता या प्रतिमा तेथे गुरुवारपासून सुरू होत असलेल्या मतदानात छळणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यावर पडदा टाकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याची जबाबदारी दुसर्यांवर टाकणे. महाराष्ट्र हे उत्तम राज्य आहे त्यासाठी. गुजरात म्हटले तर आपलीच लाज जाणार. तसेच, त्यांनी काही कारण नसताना आपल्या बादरायण संबंध लावण्याच्या सवयीनुसार हृदयनाथ मंगेशकर यांना त्यांनी सावरकरांच्या प्राण तळमळला या गाण्याला चाल लावल्याबद्दल आकाशवाणीवरून नोकरीतून काढून टाकले असे सांगितले आणि ते मूळचे गोव्याचे असा मुद्दामहून उल्लेख केला. गोव्यात सोमवारी मतदान आहे आणि तेथे गेली दहा वर्षे भाजपाचे सरकार असून ताज्या मतदारांच्या कौलानुसार काँग्रेस पूर्ण बहुमताने निवडून येण्याची शक्यता आहे. असो. तर नुकत्याच निधन पावलेल्या भारतरत्न लता मंगेशकर यांचे बंधू असलेल्या हृदयनाथांना काँग्रेस सरकारने पहा कसे वागवले असा संदेश देण्याचा हा प्रकार आहे. त्याबद्दल खुद्द हृदयनाथ मंगेशकर यांनी काही पुराव्यांसह खुलासा केला तर सत्य कळू शकते. सध्या तरी त्याबद्दलची वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे दिसून येते. याबद्दल मुंबई आकाशवाणी केंद्रावर दीर्घकाळ वरिष्ठ पदावर काम करणारे मराठीतील प्रख्यात साहित्यिक महेश केळुस्कर यांनी फेसबुक पोस्टवरून माहिती दिली आहे. सावरकरांचे गाणे गायले म्हणून ह्रदयनाथ मंगेशकर यांना नोकरी गमवावी लागली या माहितीबद्दल त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांच्या मते आकाशवाणीत नोकरी मिळवण्यासाठी रीतसर परीक्षा वगैरे देऊन नंतर नेमणूक होते आणि तसेच कोणाला वाटले म्हणून असे सरसकट काढून टाकले जात नाही. त्याचीही दीर्घ प्रक्रिया असते. त्यांच्या मते पंडित हृदयनाथांचे कोणतेही सर्व्हिस रेकॉर्ड आकाशवाणीकडे नाही. करार पद्धतीने लोक आकाशवाणीवर संगीतकार, गायक म्हणून काम करतात. परंतु अशावेळी जर असा प्रकार घडलेला असेल तर ज्या कारणास्तव कलाकारावर बंदी घातली जाते, तीच संगीतरचना आकाशवाणी आपल्या केंद्रावरून प्रसारीत करणार नाही, हे तार्किक आहे. आज पन्नाशीत, साठीत असलेल्या पिढीलाही त्यांना कळायला लागल्यापासून ‘सागरा प्राण तळमळला’ हे गाणे आकाशवाणीवरुनच ऐकलेले आहे. केळुस्कर म्हणतात त्याप्रमाणे हे गाणे लोकप्रिय करण्याचे काम आकाशवाणीनेच केले आहे. कारण ते हजारो वेळा केंद्रावरून वाजले. या सगळ्या वास्तवाचा मोदी यांना काही फरक पडत नाही. माणसाने किती खोटे बोलावे, याचे निकष त्यांनी कधीच पार केलेले आहेत. शिवाय, घटनात्मक पदावरील व्यक्तीचा निदान संसदेत खोटे बोलताना प्राण तळमळायला हवा. परंतु, तोही संसदेत खोटे बोलण्याचा संकेत त्यांनी धुळीस मिळवला आहे. संसदेत पहिल्यांदा प्रवेश करताना त्यांनी डोके टेकून व्यक्त केलेला भक्तीभाव किती खोटा आणि दिखावू होता, हेही या निमित्ताने देशाला कळले आहे.






