बळ-राजकीय आणि स्व

सध्या महाराष्ट्रातील काही नेते स्वबळ आणि राजकीय बळ या भोवतीच्या चर्चा आणि अफवांद्वारे राज्याबरोबर देशाच्या पातळीवरही आपली हवा करून आहेत. एकीकडे गेले अनेक दिवस काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाना प्रकारे चर्चा आपल्याभोवती निर्माण केली आहे आणि राज्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पंतप्रधान आणि राष्ट्रपती या पदांना धरून चर्चेत आहेत. अर्थात तेथेही खुलासा आणि स्पष्टीकरणाचा सिलसिला सुरूच आहे. नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांत स्वबळावरून इतक्या घिरक्या घेतल्या की तो आता विनोद होऊ लागला आहे. त्यांना विविध प्रकारे समजावून देखील त्यांच्या विधानात आलटून पालटून कोणात्या ना कोणत्या प्रकारे स्वबळ बाहेर पडतेच. त्यावरून विविध नेते आपापली मते व्यक्त करतात. ते खुलासे करतात आणि पुन्हा स्वबळाचा राग आळवतात. आता त्यांनी 2014 सालच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेचा संदर्भ देत आपण सावधगिरी म्हणून स्वबळाची तयारी करीत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या आघाडी सरकार अस्थिर करण्याचे भाजपा करीत असलेले काम आघाडीतील घटक पक्षाकडूनच होत असल्याचे वाटल्यामुळे या कामात अहोरात्र गुंतलेल्या भाजपा नेत्यांनाही आराम मिळालेला आहे. शिवसेनेने नाना पटोलेंच्या वक्तव्यांना विनोदी रंग देऊन त्याला महत्व येणार नाही असे पाहिले. नाना हा विदर्भाच्या मातीतला रांगडा गडी आहे, मनास येईल ते बोलतो. भाजपचे चंद्रकांत पाटील वगैरे पुढारीही मनास येईल ते बोलत असतात, पण पटोले हे निरागसतेचे लेणे आहे. ते एक निष्पाप बालक आहेत. त्यांच्या हसण्या-बागडण्याचे कौतुक करायला हवे, अशा भाषेत यातील तणावाची हवा निघून जाईल अशी व्यवस्था केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही जलभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात, बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाची भीती न बाळगता आम्हाला जेवण्यासाठी बोलवावं, आम्ही तुमच्याकडे येऊन स्वबळावर जेवू, असा विनोद केला. त्यांच्या वक्तव्यामुळे आघाडीतील आत्मविश्‍वास ढळमळीत झाल्याचे वाटू नये त्यासाठी हे असावे. गेल्या सरकारच्या वेळी भाजपा आणि शिवसेना सत्तेत असताना सत्ता भाजपाची आहे आणि शिवसेना विरोधी पक्ष आहे असे भासत होते. त्यामुळे नेहमी चर्चा या दोघांतील संघर्षाची व्हायची आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना राजकीय चर्चेत शिरकाव करण्यासाठी जागाही उरायची नाही. जणू विरोधी पक्ष असलेले दोन मोठे पक्ष नाहीतच असे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे आता राजकीय चर्चेतून भाजपाला बाजूला काढून राजकीय चर्चेचा सगळा भवताल आपणच भरून काढायचा, हा जुना डाव इथे पुन्हा मांडला गेला नाही ना, असे वाटण्यास खूप जागा आहे. मात्र हा विषय उत्क्रांत होत दिल्लीपर्यंत म्हणजे देशाच्या पातळीवर पोचल्याने या चर्चेत राष्ट्रवादी शिवसेना निकट येत असल्याच्या भितीपोटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसपासून लांब जाण्याच्या भयाने हा प्रकार होत असावा, असेही मानायला जागा आहे. कारण, या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असताना पटोले यांनी, येत्या सार्वत्रिक निवडणुका राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील असे जाहीर केले. याच्या मागे असलेल्या कारणांची फोड करताना त्यांनी आज देशात भाजपाला पर्याय फक्त काँग्रेस आहे, असे सांगितले. त्याच वेळी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या विरोधात योग्य उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा चेहरा नसल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुका जिंकण्याची शक्यता कमी आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले. जर देशातील विरोधी पक्ष बळकट करायचे असतील तर शरद पवारांसारख्या नेत्याला युपीएचा प्रमुख बनवायला हवे आणि त्यांचे नेतृत्व सर्वांना मान्य आहे, असेही राऊत म्हणाले. त्यावर कोणताही खुलासा अद्याप आला नाही. दरम्यान प्रशांत किशोर यांनी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेतल्यानंतर सुरू झालेल्या तर्कवितर्कात शरद पवार हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचे वृत्त आले. त्याचा पवार यांनी इन्कार केला. भाजपाकडे बहुमत असल्याने ही निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे आधी वक्तव्य करणे, ती नंतर मागे घेणे, त्यानंतर त्यावर खुलासे येणे आणि पुन्हा नव्याने तेच विषय चर्चेत येणे याने सध्याचे राजकीय वातावरण भरले आहे. त्यातून हाती केवळ करमणूक लागते आणि महत्त्वाचे विषय मागे पडतात.

Exit mobile version