तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांनी नुकतेच खाजगीकरण केलेल्या एअर इंडियाच्या प्रमुखपदाची नियुक्ती नाकारल्याचे जाहीर करून उद्योग जगात एक नवीन वादाला तोंड फोडले आहे. कारण, आता टाटा सन्स लिमिटेड या खाजगी कंपनीकडे या माजी सरकारी विमानसेवेचा ताबा गेल्यानंतरही त्यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांच्या निष्ठेबाबत प्रश्न उपस्थित करून प्रसारमाध्यमांतून त्याची चर्चा घडवून आणल्याची पार्श्वभूमी त्याला आहे. त्यावर एका निवेदनातून त्यांनी या राजकीय विवादांचा उल्लेख करत आपल्या नवीन मालकाला आपण एअरलाईनच्या आधी मान्य केलेल्या पदाचा स्वीकार करू शकत नसल्याचे कळविले आहे. त्यामुळे टाटांच्या पुढे केवळ नवीन प्रमुखाचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले नाही तर आरएसएस आता कोणत्या पातळीवर जाऊन कोणी कोणाला कुठे नेमावे यात हस्तक्षेप करत आहे, याचेही गंभीर रुप दिसून येत आहे. इल्कर आयसी यांनी 2015 पासून सहा वर्षांहून अधिक काळ तुर्की एअरलाइन्सचे नेतृत्व केले होते. ते एक एप्रिलपासून एअर इंडियाचा कार्यभार स्वीकारणार होते. तथापि, नियुक्ती नियामक मंजुरीसाठी प्रलंबित असली तरी ती एक औपचारिकता होती. त्यांची नियुक्ती करण्याची घोषणा 14 फेब्रुवारी रोजी टाटा सन्सने केली होती. इल्कर आयसी यांच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे त्यांच्या निवडीच्या वृत्ताने एअर इंडियाच्या हजारो कर्मचार्यांसाठी मोठा आशेचा किरण निर्माण झाला होताच, शिवाय प्रवाशांमध्येही नवा उत्साह निर्माण होण्यास ही घोषणा कारणीभूत ठरली होती. कारण, ते टर्नअराउंड तज्ज्ञ म्हणून ओळखले जात असून टाटा सन्सला त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीत ताबा घेतलेल्या जर्जर एअर इंडियाला सुदृढ बनवण्यासाठी इल्कर आयसी सारख्या नेतृत्वाची गरज होती. त्यामुळे फारसा विलंब न लावता पुढच्याच महिन्यात त्यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली होती. कामगार संघटनांच्या माध्यमांतून उपस्थित अनेक गुंतागुंतीच्या समस्या, कालबाह्य विमानांचा ताफा, आणि वाढते कर्ज याच्याशी दीर्घकाळ झगडत असलेल्या या विमानसेवेच्या खाजगीकरणानंतर त्याच्या जलदरित्या टर्नअराउंडच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु त्यांची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर अवघ्या पंधरवड्यातच इल्कर आयसी यांनी मंगळवारी हे पद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे एअर इंडियाचे भवितव्य नव्या पातळीवर घडविण्याच्या टाटांच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसला आहे हे निश्चित. त्याचा प्रतिस्पर्धी विमानसेवांनी बळकावलेला बाजारपेठेतील हिस्सा परत मिळवण्याच्या अपेक्षाही दुरावल्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. इल्कर आयसी यांनी तुर्की विमानसेवेचे प्रमुख म्हणून काम करण्याच्या काळात त्यांचा भारताच्या शत्रूंच्या कथित शंकास्पद संस्थांशी संबंध असल्याच्या कारणास्तव आरएसएसकडून त्यांच्या नियुक्तीला विरोध झाला. भारतीय जनता पक्षाच्या निकटच्या उजव्या विचारसरणीच्या गटाकडून तुर्कस्तानातील इल्कर आयसी यांच्या पूर्वीच्या राजकीय संबंधांचा हवाला देऊन सरकारला त्यांची नियुक्ती रोखण्यास सांगितले गेले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आर्थिक शाखेने इल्कर आयसी यांनी एअर इंडियाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांची पाश्वर्र्भूमी तपासण्याची मागणी केली. कारण आयसी तुर्की एअरलाइन्समध्ये काम करण्यापूर्वी ते तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्दोजन 1990 च्या काळात इस्तंबूलचे महापौर असताना आयसी त्यांचे सल्लागार म्हणून काम करत होते. एर्दोजन हे पाकिस्तानचे जवळचे मित्र असून त्यांनी यापूर्वी संयुक्त राष्ट्रांमध्ये जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. अर्थात त्याला भारत सरकारकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला होता. अशी चर्चा सुरू असलेल्या वातावरणात हे पद स्वीकारणे व्यवहार्य किंवा सन्माननीय निर्णय ठरणार नाही, असे त्यांनी निवेदन जारी केले. एअर इंडियाला आपले जुने वैभव प्राप्त करून देण्यासाठी व अन्य अनेक खाजगी विमानसेवांशी स्पर्धा करत बाजारपेठेतील गमावलेला हिस्सा पुन्हा मिळवण्याचे स्वप्न पाहणार्या टाटा समूहाला अशा अव्यावसायिक आणि अतार्किक मुद्द्यांवरून एल्कर आयसी यांच्यासारख्या व्यावसायिकाला गमावणे हे योग्य नाही. सरकारलाही ही बाब शोभणारी नाही. कारण यातून या देशातील संस्कृती प्रतिबिंबीत होत असते आणि आता ती जगभर प्रतिगामी म्हणून झालेली आहे. कोरोनाच्या प्रारंभिक उद्रेकात तुर्की एअरलाइन्सने जागतिक लॉकडाऊनला तोंड देण्यासाठी त्वरीत कर्मचार्यांचा खर्च कमी करून आणि हवाई मालवाहतूक व्यवसायाचा फायदा घेत एल्कर आयसी यांनी तुर्की एअरलाइन्सला त्वरीत सावरले होते. त्यांनी एअर इंडियालाही अभिमानास्पद स्थान मिळवून दिले असते. आता ते संघाच्या कोत्या दृष्टीकोनामुळे राहिले.
Attachments area






