आयपीएलच्या पहिल्या वर्षात 2008 मध्ये 39 वर्षीय शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने विजय मिळवून एक इतिहास घडवला होता. नवोदित असो वा अनुभवी, गुणवत्ता असणारा कोणीही या स्पर्धेत बाजी मारू शकेल हे त्यावेळी दिसून आले. 2022 च्या आयपीएलच्या संपूर्ण मोसमात त्याचे प्रत्यंतर आले. अखेरीला, स्पर्धेत पहिल्यांदाच दाखल झालेला गुजरात टायटन्स विजेता ठरला. स्पर्धेत प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ तोच होता. कर्णधार हार्दिक पांड्याने तर आघाडीवर राहून नेतृत्व केले. त्याच्या संघात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज आहे. शिवाय भारतासाठी महत्वाचे म्हणजे तो पुन्हा गोलंदाजी करू लागला आहे. पहिल्या विश्वचषक विजयानंतर क्रिकेटचे केंद्र मुंबई-दिल्लीसारख्या शहरांपासून दूरची शहरे व खेड्यांमध्ये सरकले असल्याचे म्हटले गेले होते. यंदाच्या आयपीएलमुळे गुजरात हे क्रिकेटचे नवीन केंद्र होईल अशी लक्षणे दिसतात.आजवर सातत्याने उत्तम कामगिरी करणारे मुंबई आणि चेन्नई हे संघ या स्पर्धेत पूर्णपणे ढेपाळलेले आढळले. खेळाडूंचा यंदा नव्याने लिलाव झाल्याने त्यांची घडी विस्कटली असावी. मुंबईचा संघ तर इतक्या दारूण रीतीने सलग पराभूत झाला की, मोदी-शहांच्या गुजरात संघाला यश मिळावे म्हणून अंबानींच्या मुंबईने स्वतःहून माघार घेणे चालवले आहे काय असे गमतीगमतीत बोलले गेले. भारताच्या दृष्टीने रोहित शर्माचे फलंदाज व कर्णधार या दोन्ही आघाड्यांवरचे अपयश आगामी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढवणारे आहे. महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघातून निवृत्त झाला असला तरी कर्णधार म्हणून आपली जादू कायम आहे हे गेल्या आयपीएलमध्ये त्याने दाखवले होते. पण यंदा मात्र तो निष्प्रभ ठरला. बंगलोरचा कर्णधार विराट कोहली पुन्हा एकवार कमनशिबी ठरला. प्लेऑफपर्यंत पोचूनही शेवटच्या सामन्यात त्याला व त्याच्या संघाला आपली कामगिरी उंचावण्यात अपयश आले. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात समोर येणारे नवनवीन तरुण खेळाडू ही या स्पर्धेची खरी उपलब्धी आहे. यंदा मूळचा जम्मू-काश्मीरचा असलेल्या उमरान मलिक हा गोलंदाजीतील स्टार ठरला. त्याचा वेग आणि अचूकता यांची सुनील गावसकर, लारा इत्यादी अनेकांनी तारीफ केली आहे. पंजाबचा अर्शदीप सिंग यानेही लक्ष वेधून घेतले. पाकिस्तानात जितके होतात तितके डावखुरे जलदगती गोलंदाज भारतात तयार होत नाहीत. अर्शदीपला हा फायदा आहे. फलंदाजीमध्ये राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा यांनी छाप पाडली. विशेषतः वर्माचे तंत्र उत्कृष्ट असल्याने तो कसोटीतही खेळू शकेल असे अनेकांचे म्हणणे आहे. बंगलोरचा रजत पाटीदार हा तर त्याच्या एकाच खेळीने रातोरात स्टार झाला. एक गडी बाद चार अशी स्थिती असताना आणि बदली खेळाडू म्हणून ऐनवेळी संघात समावेश झालेला असताना पाटीदारने शतक झळकवून कमाल केली. टिच्चून गोलंदाजी करणारा मोहसिन खान किंवा लॉकी फर्ग्युसनला चार षटकार मारणारा शशांक सिंग हे तरुण म्हणजे कसलंच दडपण न घेणार्या तरुणाईचे प्रतीक आहे. दिनेश कार्तिकसारख्या जुन्या-जाणत्या खेळाडूंनीही कमाल केली. अनुभव आणि फिटनेस यांच्या जोरावर काय करता येतं याचं दर्शन घडवलं. यामुळेच इशान किशन, रिशभ पंत हे यष्टिरक्षक असूनही कार्तिकची आफ्रिकेविरुध्दच्या संघात निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्दची पाच ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांची ही मालिका जूनमध्ये भारतातच होणार आहे आणि या वर्षअखेरीस ऑस्ट्रेलियातील विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. आयपीएलमुळे भारतीय संघाला नवनवे गुणवान खेळाडू उपलब्ध होत असले तरी त्यातील अनेकांच्या कामगिरीत सातत्य राहत नाही ही मात्र चिंतेची बाब आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी स्टार ठरलेले अनेक खेळाडू आज कोठे आहेत हे शोधावे लागते. दुसरे म्हणजे या स्पर्धा भारतातच आणि ठराविक खेळपट्ट्यांवर होत असल्याने यापैकी अनेक खेळाडू परदेशातील खेळपट्ट्यांवर टिकू शकत नाहीत. त्यामुळे आगामी काळात आयपीएल स्पर्धा परदेशी मैदानांवर भरवल्यास आपल्या खेळाडूंना अधिक फायदा होऊ शकेल. त्यात वैविध्यही येईल. या स्पर्धेचा कालावधीही कमी करायला हवा. अन्यथा हळूहळू त्यातली गंमत कमी होईल.
गुणवत्ता झिंदाबाद

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025
भारताचे मिशन ‘मेडल्स’
by
Santosh Raul
July 22, 2024