कारस्थान आणि कीव

अडीच वर्षांपूर्वी अजित पवार काही काळासाठी परांगदा झाले. फडणवीसांसोबत त्यांनी पहाटेचे सरकार बनवलं. पण नंतर शरद पवारांनी सूत्रं हाती घेऊन त्यांना एकटे पाडले. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचा कोणीही आमदार जाणार नाही अशी व्यवस्था केली. याउलट, एकनाथ शिंदे यांच्या बंडाला 48 तास उलटून गेल्यावर सेनेचा प्रतिसाद बावचळलेला किंवा थंड आहे. त्यामुळे हे बंड उद्धव ठाकरे यांच्या इच्छेनेच घडून आले की काय अशी शंका समाजमाध्यमांवर व्यक्त केली गेली. राजकारण्यांच्या कोणत्याच वागण्या-बोलण्यावर लोकांचा कसा विश्‍वास उरलेला नाही याचे हे निदर्शक आहे. आता सेनेच्या गुवाहाटीत गेलेल्या आमदारांनी परत येऊन ठाकरे यांच्यासमोर आपली भूमिका मांडल्यास सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. म्हणजे शिंदे यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यात गैर काहीच नाही असे सेना नेतृत्वाला वाटत आहे असा निष्कर्ष त्यातून निघतो. तशीच वेळ आली तर बंडखोरांसमोर झुकायला ठाकरे तयार आहेत असाही याचा अर्थ होतो. एकाच वेळी बंड केलेले आमदार म्हणजे खरी शिवसेना नव्हे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यांनी परत यावे असे आवाहन करायचे हा सेना नेतृत्वाच्या डावपेचांचा भाग असेल. पण त्यातून जाणारा संदेश हाच आहे की ठाकरे यांनादेखील न जुमानणारा एक मोठा गट आता पक्षात तयार झाला आहे. ठाकरे यांनी काल वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडताना रस्त्यावरचे शिवसैनिक आपल्या बाजूला आहेत असे दाखवायचा प्रयत्न केला. पण विधिमंडळातली लढाई ही आकड्यांची असेल. तिथे या शक्तिप्रदर्शनाचा शून्य उपयोग असेल. हे बंड कोणत्या दिशेने जाईल हे येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होईल. काल शरद पवार आणि आज जयंत पाटील यांनी विरोधी पक्षात बसण्याला आपण तयार आहोत असे सांगून काय होईल याचे संकेत दिले आहेतच. महाराष्ट्रातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते वेडेपिसे झाले आहेत. आजवर आघाडी सरकार पाडण्याचे बरेच प्रयत्न त्यांनी केले. पण ते यशस्वी झाले नाहीत. यावेळचा डाव मात्र तडीला नेतील असे दिसते. एकनाथ शिंदे यांचे बंड हे भाजपचे कारस्थान आहे असे  राऊत म्हणतात. ते पूर्ण खरे आहे. यातील अनेक आमदारांना इडी किंवा अन्य संस्थांच्या कारवायांची भीती घालून भाजपने शिंदे यांच्यासोबत जायला भाग पाडले आहे यात शंका नाही. शिवाय जिथे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे पोलिस सहजासहजी पोचू शकणार नाहीत अशा सुदूर आसामध्ये या सर्वांना नेऊन ठेवणे हेदेखील भाजपच्या अमित शहांसारख्यांचे डोके असले पाहिजे. अलिकडेच गुजरातेतील दलित आमदार जिग्नेश मेवानी यांना नरेंद्र मोदींविरुध्द ट्विट केले म्हणून आसामचे पोलीस उचलून घेऊन गेले होते. नंतर गुवाहाटी न्यायालयाने अतिशय कडक ताशेरे मारून हे प्रकरण रद्द केले. त्यामुळे सध्या इतरत्र उत्पात करण्यासाठी आसाम ही भाजपसाठी भरवशाची भूमी दिसते. त्यातही कालपर्यंत ज्यांना तुरुंगात टाकण्यासाठी धडपड केली त्या प्रताप सरनाईक किंवा यामिनी जाधव यांच्यासारख्यांना पावन करून घेताना कोणतीही लाज-शरम वाटू नये हे तर या नव्या भाजपचे वैशिष्ट्यच आहे. कोणत्याही किमतीवर सत्ता मिळवणे हेच भाजपचे ध्येय झाले आहे. देवेंद्र फडणवीस सध्या पडद्याआडून सूत्रे हलवत आहेत आणि बंडखोरांना कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचायला लावले जात आहे. खुद्द शिंदे यांनी 2019 मध्ये भाजपसोबत संबंध तोडा असे आवाहन करून उद्धव यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ते आता देवेंद्रांच्या नेतृत्वातील सरकारच हवे असे म्हणत आहेत. गेल्या दोन वर्षात शिवसेनेची गळचेपी झाली असे त्यांचे ट्विट किंवा उद्धव यांचे वर्षाचे दरवाजे आम्हाला कधीच खुले नव्हते असे संजय शिरसाट यांनी लिहिलेले पत्र आणि थेट सेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर दावा करणे या सर्व भाजपने करवून घेतलेल्या गोष्टी आहेत. पण या सर्व कारस्थानाला तोंड देण्यात सेना पुरी पडली नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि, राजकारणात अशा दुर्बलांची केवळ कीवच केली जाते.

Exit mobile version