बस्स झालं…

खरं तर मला नांदायचं आहे पण समोरच्यामुळे घटस्फोटाची वेळ आली आहे. कौटुंबिक न्यायालयांमधल्या अनेक खटल्यात पती आणि पत्नी या दोन्ही बाजूंचं हेच म्हणणं असतं. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट या दोघांचंही भांडण याच पातळीवर उतरलं आहे. एकीकडे, शिंदे आणि या बंडखोरांची चाल वाईट वळणाला चाललेली आम्हाला दिसतच होती असं म्हणतानाच हे बंडखोर अजूनही आमच्या संपर्कात कसे आहेत याचे दावे शिवसेना नेते करीत आहेत. तर दुसरीकडे आपण अजूनही शिवसेनेचंच कुंकू लावलेलं आहे असं आवर्जून सांगणारे शिंदे आणि बंडखोर आपल्याला भाजपशीच पाट लावायचा आहे हे उघडपणे मान्य करायला तयार नाहीत. कौटुंबिक न्यायालयांमधली अशी प्रकरणं वर्षानुवर्ष चालत राहतात. हे प्रकरणही न्यायालये, विधानसभा उपाध्यक्ष आणि निवडणूक आयोग इत्यादींसमोर बरेच दिवस रखडणार असल्याचं दिसत आहे. यात राज्याचा कारभार ठप्प होणार असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. राज्याच्या अनेक भागात नीट पाऊस झालेला नाही. आतापर्यंत नेहमीच्या सरासरीच्या केवळ 41 टक्के पाऊस झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 33 टक्के कमी पेरण्या झाल्या आहेत. खते, बियाणी कमालीची महागली आहेत. दहावीचा निकाल लागून आठवडा झाला तरी अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सुरू झालेले नाहीत. अनेक ठिकाणचे सक्षम अधिकारी गायब असल्याने विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत. याखेरीज ओबीसी आरक्षणासारखे प्रश्‍न रेंगाळत पडले आहेत. महागाई आणि बेकारीचे प्रमाण वाढत आहे. आधीच उद्धव ठाकरे यांचे सरकार हे फार धडाक्याने वगैरे चाललेले नव्हतेच. खुद्द उद्धव हे तर टेलिमेडिसिन सेवा देणार्‍या डॉक्टरप्रमाणे पडद्यामार्फतच सर्व कारभार करत होते. आता तर बंडाचे निमित्त होऊन सरकार नावाचा दट्ट्याच नाहीसा झाला आहे. ही सर्व स्थिती निर्माण होण्यास भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. या पक्षाचे नेते आपला या बंडाशी काहीही संबंध नाही असं सांगतात. मराठी सिनेमे वा नाटकांमधील अनेक प्रसंगांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे स्वतःच वेगळा आवाज काढून नंतर कोण बोललं हे असं म्हणून विनोदनिर्मिती करीत. भाजप नेत्यांचा हा दावा म्हणजे या विनोदासारखा आहे. पण हा सामान्य लोकांना रडवणारा क्रूर विनोद आहे. तो आता बस्स झाला. कदाचित भाजप आणि शिंदे यांना अपेक्षित अशा रीतीने हा खेळ गेलेला नसेल. कायद्यानुसार दोनतृतियांश बहुमत असले तरीही बंडखोरांना स्वतंत्र गट म्हणून राहता येत नाही तर दुसर्‍या कोणत्या तरी पक्षात विलीन व्हावे लागते. भाजप आणि बच्चू कडू यांचा प्रहार हा पक्ष हेच दोन पर्याय शिंदे यांच्यासमोर शिल्लक राहतात. भाजपमध्ये विलीन होणे हे दोन्ही बाजूंना गैरसोयीचे आहे. भाजपसाठी हे आमदार आपल्याकडे दाखल करून घेणे म्हणजे घाऊक प्रमाणात भावी असंतुष्टांना प्रवेश देण्यासारखे आहे. शिवाय, यातून शिवसेना खच्ची होण्याऐवजी ती पेटून उठण्याचा धोका वाढेल. गद्दार ही बंडखोरांची ओळख पक्की होईल ते वेगळेच. आपल्या गटाला शिवसेना ही मान्यता मिळवणे हे तर त्यांच्यासाठी त्याहूनही कठीण आहे. अर्थात, बंड करण्यापूर्वीच शिंदे व भाजप यांनी या सगळ्याचा विचार केला असणार. ते काहीही असो, आता या सर्वांनी हे प्रकरण आवरते घ्यायला हवे. आपल्याकडे जरुरीपेक्षा जास्तच संख्याबळ आहे असे शिंदे पुन्हापुन्हा सांगत आहेत. आपणच खरी शिवसेना आहोत असा त्यांचा दावा आहे. तसे असेल तर ते गुवाहाटीत कशासाठी थांबलेले आहेत? दीपक केसरकर म्हणतात राज्यातील स्थिती योग्य नाही. शिवसैनिकांच्या रागाची या बंडखोर आमदारांना भीती वाटत असेल तर मग हे लोकांचे खरे प्रतिनिधीच नव्हेत. त्यांनी तोंड काळे केलेलेच बरे. शिंदे पुढे येत नसतील तर शिवसेनेनंही नुसत्या वल्गना करण्याऐवजी विधानसभा अधिवेशन बोलवायला हवं. एवीतेवी या सर्वांचा फैसला तिथेच होणार आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे तर हे लवकरात लवकर व्हायला हवं. या बंडांमुळे कित्येक आठवडे राज्यकारभार अधांतरी राहणार असेल तर ते सामान्य माणसाला परवडणारे नाही.

Exit mobile version