पत्रकारांवर सूड

वृत्तपत्र स्वातंत्र्य अबाधित राखण्याच्या आंतरराष्ट्रीय सहमतीपत्रावर पंतप्रधान मोदी जर्मनीमध्ये सही करीत असतानाच इकडे दिल्ली पोलीस ऑल्टन्यूजचे सहसंस्थापक पत्रकार महंमद झुबेर यांना अटक करीत होते. मोबाईल व इंटरनेटवरून प्रसारित होणार्‍या बातम्यांमध्ये खोट्या बातम्या किंवा फेकन्यूजचा प्रचंड प्रसार झाला आहे. भाजप आणि मोदींचे भक्त अशा बातम्या फार वेगाने पसरवत असतात हे वेळोवेळी दिसून आले आहे. नव्या दोन हजाराच्या नोटेमध्ये चीप किंवा युक्रेनमधील युद्ध भारताच्या विनंतीवरून रशियाने काही काळासाठी थांबवले अशासारख्या बातम्या ही त्याची काही उदाहरणे आहेत. अशा खोट्या बातम्या व विशेषतः त्यातील बनावट व्हिडिओ यांचा पर्दाफाश करण्याचे करण्याबद्दल ऑल्टन्यूज ही जगभरात नावाजली गेलेली संस्था आहे. कोणताही पूर्वग्रह न ठेवता तिचे पत्रकार हे काम करीत असतात. त्यामुळे भाजपच नव्हे तर काँग्रेस, तृणमूल व इतर विरोधी पक्षांतर्फे होणार्‍या खोट्या प्रचारालाही काही प्रमाणात चाप बसत असतो. झुबेर आणि प्रतीक सिन्हा या संस्थापकांनी आजच्या काळात खरोखरच हे अत्यंत मोलाचे काम केले आहे. भाजपच्या भक्तांचा भर खोट्यानाट्या, वाटेल त्या प्रचारावर असल्याने त्यांचा ऑल्टन्यूजवर पूर्वापार राग आहे. जेएनयू आंदोलनाच्या काळात आझादीच्या घोषणा दिल्या गेल्या किंवा शाहीनबाग वा शेतकरी आंदोलनात देशद्रोही झेंडे फडकावले गेले अशासारख्या खोट्या प्रचाराचे बिंग ऑल्टन्यूजनेच फोडले होते. अगदी अलिकडे भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर महंमद यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याकडे झुबेर यांच्या ट्विटमुळेच सर्व जगाचे लक्ष वेधले गेले होते. त्यानंतर कतार इत्यादी देशांनी डोळे वटारले व भारत सरकारला माफी मागावी लागली. त्यांना अटक करण्यासाठी तेव्हापासूनच केंद्र सरकार संधी शोधत असले पाहिजे. पण त्यांच्यावर जे आरोप ठेवले गेले आहेत ते पाहता दिल्ली पोलीस आणि त्यांचे बॉस असलेले केंद्रीय गृहखाते यांनी निव्वळ सूडबुध्दीने ही कारवाई केली आहे हे स्पष्ट दिसते. मुळात त्यांना 2020 मधील एका प्रकरणाच्या चौकशीच्या बहाण्याने पोलिसांनी बोलावून घेतले. काही वेळानंतर 2018 च्या दुसर्‍याच एका प्रकरणात त्यांना अटक करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. कहर म्हणजे एका इसमाच्या ट्विटवरील तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे. या इसमाने आजतागायत केवळ एकमात्र ट्विट केले आहे ते फक्त या तक्रारीचे आहे. 2018 मधील झुबेर यांचे ट्विट हे धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे सदर इसमाने म्हटले आहे. अन्य कोणीही याबाबत तक्रार केलेली नाही. विशेष म्हणजे झुबेर यांनी केलेले ट्विट म्हणजे ‘किसी से ना कहना’ या हृषिकेश मुखर्जींच्या हिंदी सिनेमातील एका दृश्यावर आधारित होता. हनिमून हॉटेल हा नावाचा बोर्ड हटवून हनुमान हॉटेल असे केल्याचे या दृश्यात दिसते. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचा अजब दावा तक्रारकर्त्याने केला व पोलिसांना तो ग्राह्य वाटला. हा सिनेमा असंख्य वेळा टीव्हीवरून दाखवला गेला असेल वा इतरत्रही सहज उपलब्ध असेल. याच दृश्याच्या आधारे इतर वृत्तपत्रांनीही काही विनोदी कॉमेंट्स छापल्या होत्या. शिवाय, हा सर्व प्रकार चार वर्षांपूर्वीचा आहे. त्यावेळी याबाबत कोणीही तक्रार केली नव्हती. किंवा या प्रकरणावरून समाजात कुठे तणाव निर्माण झाला असेही घडले नव्हते. 2018 सालापासून केंद्रात व इतरत्र भाजपचीच सरकारे आहेत. असे असूनही त्यांच्याविरुध्द चार वर्षांनी होणारी ही कारवाई म्हणजे हिटलरशाहीचा नमुना आहे. पत्रकारांच्या संघटनांनी तिचा निषेध केला आहे व तो रास्तच आहे. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना अलिकडेच करण्यात आलेली अटक हेदेखील राज्यकर्त्यांच्या द्वेषबुध्दीचे उदाहरण आहे. गुजरातमध्ये 2002 च्या दंगलीमध्ये काँग्रेसच्या माजी खासदाराची जाळून मारून झालेल्या हत्येचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत लावून धरण्याबद्दल त्यांना शिक्षा दिली जात आहे. मोदी सरकार एरवी मोठमोठ्या गप्पा मारत असले तरी प्रत्यक्षात त्याला कोणतीही टीका सहन होत नाही हे अनेकवेळा दिसले आहे. पण राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे या लोकमान्यांच्या वचनाची त्यांनी आठवणठेवायला हवी. 

Exit mobile version