वडखळचा एल्गार 

या देशातील प्रादेशिक पक्ष संपण्याच्या मार्गावर असल्याचे भाकित भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमवारी केले. शिवसेनेची सध्याची हालत पाहून भाजपचा आत्मविश्‍वास भलताच वाढलेला दिसतो. या देशात भाजपखेरीज कोणत्याही शक्ती शिल्लक राहू नयेत ही त्या पक्षाच्या नेत्यांची मनिषा लपून राहिलेली नाही. नड्डांचे वक्तव्य तिचाच आविष्कार आहे. पण या देशातले विविध विचार आणि विविध छटांचे पक्ष हे पावसाळ्यात उगवणारी भूछत्रे नव्हेत. ठिकठिकाणच्या मातीमध्ये त्यांची मुळे भक्कमपणे रुजलेली आहेत आणि त्यांची ताकद कमी-अधिक झाली तरी ती नष्ट होणारी नाहीत. शेतकरी कामगार पक्षाच्या मंगळवारी वडखळला झालेल्या अमृतमहोत्सवी अधिवेशनाला जमलेली विशाल गर्दी हादेखील याचाच पुरावा म्हणावा लागेल. ही गर्दी पैसे देऊन आणलेल्या भाड्याच्या लोकांची नव्हती. तर लाल बावट्यावरची निष्ठा व बांधिलकी दाखवणारी होती. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या पाच दशकांमध्ये काँग्रेसनेही एकतंत्री अमलाची भरपूर स्वप्ने पाहिली. त्यासाठी विरोधकांवर बुलडोझर चालवला. पण शेकापसारख्या चिवट आणि झुंजार पक्षांनी त्यांना दाद दिली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि नंतर मित्र म्हणवणार्‍यांनीच दगा दिला आणि पक्षाला फटका बसला. रायगडमधून पक्षाचा एकही आमदार निवडून गेला नाही. शेकाप आता संपला असंही काही जण म्हणू लागले. या सर्वांना मंगळवारच्या सभेनं जबरदस्त चपराक दिली आहे. पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते यांनी तयारीसाठी घेतलेल्या प्रचंड मेहनत घेतली. सामान्य लोकांचं पक्षावरचं प्रेम आजही अबाधित आहे हे दिसून आलं. यातही तरुण व महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. आजचा तरुण डाव्या विचारापासून दुरावला आहे हे म्हणणे पूर्णतः खोटं पाडणारा हा एक अत्यंत दिमाखदार कार्यक्रम होता. नड्डा यांच्या भाषणाचा थेट उल्लेख कोणीही केला नाही तरी या अधिवेशनातील भाषणांमध्ये एकाधिकारशाहीला टक्कर देण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज सर्वांनी व्यक्त केली. राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात चळवळींमधून उभे राहिलेल्या शेकापसारख्या पक्षांवरच लोकांचा केवळ विश्‍वास उरला आहे असं सांगितलं. या पक्षांना वाचवलं नाही तर सामान्य माणसाचे हाल कुत्राही खाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. शेट्टी यांच्यासारख्या सर्व पक्षांच्या राजकारणाचा अनुभव घेतलेल्या कर्त्या शेतकरी नेत्यांनी केलेल्या या विश्‍लेषणावर सामान्य मतदारांनी गांभीर्याने विचार करायला हवा. प्रमुख पाहुणे व आम आदमी पक्षाचे दिल्लीतील कॅबिनेट मंत्री गोपाल राय देशातील केंद्र सरकारच्या विरोधकांना चिरडून टाकण्याच्या धोरणांचा उल्लेख केला. अशा वातावरणात देशात पुन्हा एकवार स्वातंत्र्यासारखं राष्ट्रीय आंदोलन उभारावं लागेल असं म्हणून यात सहभागी होण्याची त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना हाक दिली. भाई जयंत पाटील यांनीही हा मुद्दा आपल्या भाषणात जोडून घेऊन राजकारणाची नवीन समीकरणं मांडावी लागतील असं स्पष्ट केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन काही घडण्याची आशा जागवणारे हे सूतोवाच आहे. भूतकाळात केलेल्या चुकांबाबत पक्षनेता खुलेपणाने कबुली देतो आहे हे केवळ शेकापमध्येच दिसू शकणारे दृश्य यावेळी पुन्हा एकवार दिसले. ज्यांनी विश्‍वासघात केला त्या पक्षांना धडा शिकवण्याचा सर्वांच्या मनात असलेला निर्धारही त्यांनी प्रकटपणे बोलून दाखवला. त्यामुळे शेकाप कार्यकर्ते येत्या काळात पुन्हा पूर्वीच्या इर्षेने आगामी निवडणुकीच्या मैदानात उतरतील यात शंका नाही. जेएसडब्ल्यूच्या परिसरातच अधिवेशन होत असल्याने बेकायदा जमीन अधिग्रहणाच्या प्रकरणाबाबत आंदोलनाची घोषणा होईल हे अपेक्षित होतेच. त्यानुसार येत्या महिन्याभरात कंपनी प्रशासन व सरकार यांनी आपला वाकडेपणा सोडला नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा भाईंनी दिला आहे. यापूर्वी रिलायन्सचा सेझ प्रकल्पाविरोधात शेकापने असाच एल्गार पुकारला होता. अशा प्रकल्पांना विरोध करणार्‍या डाव्या पक्षांवर कायम नकारात्मक राजकारणाचा आरोप केला जातो. पण भाईंनी त्यांनाही स्पष्ट उत्तर दिले. संपत्ती निर्माण करण्याशी किंवा करणार्‍यांशी शेकापचे शत्रुत्व नाही. पर्यटन व इतर व्यवसायातून रायगड जिल्ह्यात शेकापचे अनेक कार्यकर्ते प्रामाणिकपणे व्यवसाय करीत आहेत हे त्यांनी नमूद केले. त्यामुळे शेकापच्या वडखळ एल्गाराला नव्या युगातील डोळस विधायकपणाचीही जोड आहे हे स्पष्ट झाले. 

Exit mobile version