आजि अमृताचा दिनु

सहाहून अधिक धर्म, तीन हजारांहून अधिक जाती, 28 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेश आणि डझनावारी आर्थिक स्तर यामध्ये वाटले गेलेले 140 कोटी लोक चारशेहून अधिक बोलीभाषांमध्ये एका सुरात आणि एका भावनेने काहीही बोलण्याचे प्रसंग या देशात क्वचितच येतात. स्वातंत्र्य मिळाल्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आज भारतभरातून ‘जय हिंद’ असा नारा गुंजेल तो असाच अद्भूत आणि दुर्मीळ प्रसंग असेल. हिंदुस्थान नावाच्या या प्रदेशाला हजारो वर्षांचा इतिहास असला तरी भारत नावाच्या आधुनिक देशाला अस्तित्वात येऊन 75 वर्षेच झाली आहेत. त्या अस्तित्वात येण्याचा वाढदिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. हजारो कार्यकर्ते, नेते व क्रांतिकारकांनी सुमारे शंभर वर्षे ब्रिटिशांशी लढा दिला आणि स्वातंत्र्य जिंकून घेतले. त्यांचे मार्ग वेगवेगळे होते, विचार अलग होते, पण सर्वांचा नारा एकच होता – ‘आमच्या देशात आमचं सरकार’. त्यामुळे 15 ऑगस्ट 1947 ला दिल्लीत आलेल्या सरकारला आणि पंडित जवाहरलाल नेहरू या पंतप्रधानांना सर्वांनी आपलं मानलं. (स्वातंत्र्यासाठी जे कधीच लढले नाहीत असेही काही कपाळकरंटे लोक होते. त्यांनी या स्वातंत्र्याला, सरकारला, आपल्या तिरंगा झेंड्याला आणि नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. पण आजच्या दिवशी त्या नतद्रष्टपणाची आठवण नको.) एकदा आपलं सरकार स्थापन झाल्यावर मग लोक पुन्हा आपापल्या मार्गाने निघाले. समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट, सर्वोदयवादी इत्यादी काँग्रेसपासून लांब गेले. काळाच्या ओघात त्यांनी नेहरुंवर, त्यांच्या सरकारवर प्रखर टीका केली. त्यांच्याविरुद्ध उग्र आंदोलने केली. पहिल्या निवडणुकांनंतर डावे हेच प्रमुख विरोधी पक्ष होते. पण नेहरू म्हणजे परके ब्रिटीश नव्हेत हे त्यांनी सदैव लक्षात ठेवलं. नेहरूंनीही काँग्रेसला निर्विवाद बहुमत असूनसुध्दा पहिल्या मंत्रिमंडळात आपल्या दिग्गज विरोधकांचा समावेश केला होता. त्यात एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. शिवाय, पंडितजींनी आपल्या सोळा वर्षांच्या कारकीर्दीत ‘लाल बावटामुक्त’ मुक्त भारत असली घोषणा कधी दिली नाही. एकेकाळी आपण सहप्रवासी होतो याचे भान दोन्ही बाजूंनी राखलं. त्यानंतर गेली 75 वर्षे देशातील सर्व नागरिकांना एकसारखी गेली नाहीत. काही मूठभर अंबानी-अदानी झाले. इतर असंख्य पेण-पालीमध्ये वीटभट्ट्यांवर काम करणारे कातकरी किंवा पंजाबात गव्हाच्या शेतात काम करणारे बिहारी मजदूरच राहिले. याचा अर्थ समाजात काहीच बदल झाले नाहीत असे नव्हे. 1947 साली देशाचं सरासरी मृत्यूवय अवघं 32 होतं. ते आज सत्तर म्हणजे दुपटीहूनही अधिक झालं आहे. हॉटेलात दलितांसाठी चहाचे कप वेगळे ठेवणे हा दखलपात्र गुन्हा आहे हे तेव्हा वारंवार बजावावं लागत होतं. आज उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या मागासतम राज्यात पूर्वी अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींचे नेते (त्यातील एक तर महिला) मुख्यमंत्री होऊ शकले आहेत. केवळ गुरेच खाऊ शकतील असा गहू एकेकाळी अमेरिका आपल्याकडे पाठवत होती व ते उपकार मानले जात होते. आज युक्रेन युध्दाच्या काळात आपण गव्हाची निर्यात रद्द केली तर जगाच्या कमॉडिटी मार्केटला हादरे बसत आहेत. कोणालाही घरी टेलिफोन घेता येईल अशी स्थिती आपल्याकडे अमेरिकेनंतर 50 वर्षांनी आली. पण आज, 2022 मध्ये, फाईव्ह जी किंवा बॅटरीवरच्या कारचं तंत्रज्ञान इथं जगाच्या बरोबरीनं हजर आहे. हे सर्व एका रात्रीत घडलेले नाही. स्वातंत्र्यानंतर तंत्रक्रांतीचा जो पाया घातला गेला त्याची ही फळे आहेत. हे श्रेय नेहरूंचं आहे तितकंच त्यांना सकारात्मक विरोध करणार्‍यांचं आहे. हे विरोधक कष्टकरी, शेतकरी, गरीब यांच्या उत्कर्षासाठी लढले. मंदिर-मशीद, गोमूत्र-गोमांस असले निव्वळ विद्वेष पसरवणारे प्रश्‍न राजकारणात येऊ दिले नाहीत. उलट आपली विद्यापीठे व आयआयटीसारख्या संस्था यांना त्यांनी प्रागतिक विचारांची केंद्रे बनवली. त्यामुळेच आज जगातील वेगाने वाढणार्‍या पहिल्या पाच  अर्थव्यवस्थांमध्ये आपली गणना होते. हेही खरेच की, ही प्रगती म्हणजे भारताचे संपूर्ण चित्र नव्हे. एक वेळ उपाशी झोपणारे करोडो लोक, आत्महत्या करावे लागणारे शेतकरी, शाळा सोडून लहान वयात कामाला लागणारी लाखो मुलं हीदेखील या देशातलीच वस्तुस्थिती आहे. पण ती बदलण्याची साधनं आपल्याला 1947 आणि 1950 मध्ये मिळाली आहेत. त्यांचा कुशलपणे व निर्भयपणे वापर करणे आपल्याच हातात आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जग अमेरिका आणि रशिया या दोन ध्रुवांमध्ये विभागलं जात होतं. आपण त्यात आपला स्वतंत्र रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. आज या दोन्ही ध्रुवांची सरमिसळ झाली आहे. रशिया व चीन या कम्युनिस्ट मानल्या जाणार्‍या देशांना ओढणारं इंजिन हे शंभर टक्के भांडवली अर्थव्यवस्थेचं आहे. तर दुसरीकडे अमेरिकेमध्ये वित्तीय भांडवलाला वेसण घालण्यासाठी तरुण मंडळी ‘ऑक्युपाय वॉलस्ट्रीट’सारखी आंदोलनं करत आहेत. अशा वेळी भारताला पुन्हा एकवार स्वतःचा मार्ग शोधावा लागणार आहे. आज पाश्‍चात्य देशांचा रोष पत्करूनही आपण रशियाकडून अधिकाधिक तेल आयात करीत आहोत. आपल्या पूर्वीच्या मैत्रीच्या इतिहासामुळेच हे शक्य झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतही पूर्वीचा मध्यममार्गच आपल्या कामी येईल. आपली बाजारपेठ इतकी मोठी आहे की तिच्या ताकदीवर आपण बड्या वित्तीय भांडवलाला वेसण घालू शकतो. कदाचित भारताचा हा शोध पूर्ण जगालाही उपयोगी पडू शकेल. मात्र हा शोध घेताना देशाचा संदर्भबिंदू 1947 हाच असावा लागेल. इसवी सनापूर्वीचे शतक वगैरे नव्हे. आजच्या ‘अमृताच्या दिना’निमित्त हे ध्यानात घेतले तरच आपण स्वतंत्र भारताचा शंभरावा वाढदिवस अधिक दिमाखाने साजरा करू शकू.

Exit mobile version