एक अडलेला सिनेमा

एकेकाळी या देशात कोणत्याही चव्हाट्यावर तीन गोष्टींविषयी अगदी खुलेआम चर्चा होऊ शकत असे. चर्चेत भाग घेणार्‍या प्रत्येकाला स्वतःचं असं आग्रही मत असे. हे तीन विषय होते – राजकारण, क्रिकेट आणि हिंदी सिनेमा. नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर सार्वजनिक ठिकाणी राजकारणाची चर्चा काहीशी एकसुरी झाली आहे. बहुतेकदा चर्चेमध्ये मोदीभक्त इतका आक्रमकपणा सुरू करतात की विरोधक आपली मते मांडायला कचरतात. आयपीएलच्या आगमनानंतर क्रिकेटच्या चर्चेचे स्वरुप आता हंगामी झाले आहे. शिवाय लोक आता एकेकटा खेळाडू किंवा संघाचे भक्त झाले आहेत. चोवीस तास सिनेमा दाखवणार्‍या असंख्य टीव्ही वाहिन्या निर्माण झाल्यापासून हिंदी सिनेमाचे आकर्षणही आता कमी झाले आहे. एखाद्या सिनेमाची निव्वळ हवा तयार करण्यासाठी निर्मात्यांना जाहिरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. इतके होऊनही सिनेमा दोन-चार आठवड्यांच्या वर थिएटरमध्ये टिकत नाही. अर्थात, तो तितका टिकला तरी त्याला सुपरहिट म्हटले जाते. सध्या हिंदी सिनेमाला वाईट दिवस आल्याची चर्चा चालू असतानाच दक्षिणेकडच्या सिनेमांनी बाजी मारली आहे. गेल्या वर्षी हिंदी सिनेमांनी फक्त थिएटरमधील तिकिटविक्रीतून 450 कोटी रुपये कमावले होते. टीव्ही मिडिया हक्क, संगीताचे हक्क, जाहिराती इत्यादी इतर गोष्टी यात धरलेल्या नाहीत. यंदा हा आकडा पावणेचारशे कोटींच्या वर जाणार नाही असा अंदाज आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सलमान, आमीर, अक्षयकुमार या बड्या कलाकारांचे सिनेमे दणकून आपटले आहेत. त्यामुळे इतर छोट्या बजेटवाल्या सिनेमांचे काय होणार याची चिंता निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात बाहुबली, पुष्पा, आरआरआर किंवा कमल हसनचा विक्रम यांनी तुफान धंदा केला असून ओटीटी क्षेत्रातील प्रेक्षकांनीही दक्षिणेच्या सिनेमांना अलिकडे मोठी पसंती दिली आहे. काश्मीर फाईल्स हा तद्दन राजकीय आणि भुलभुलैय्या अशासारखे अपवाद वगळता हिंदी सिनेमांकडे लोक पाठ फिरवू लागले आहेत. याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे तिकिटांचे दर. एका कुटुंबाने थिएटरमध्ये सिनेमा पाहायचे ठरवले तर आज तीन-चार हजार रुपये खर्च होऊ शकतात. गरिबांची तर गोष्टच सोडा, हे मध्यमवर्गालाही परवडणारे नाही. यात कोविडचाही मोठा हात आहे. कोविडकाळापूर्वी देशात वर्षभरात एकूण सुमारे दोनशे कोटी सिनेमा तिकिटे विकली जात असत. 2021 मध्ये म्हणजे कोविडनंतरच्या काळात ही संख्या केवळ 37 कोटीवर आली आहे. थिएटरला पर्याय असणारे अमेझॉन किंवा नेटफ्लिक्ससारखे प्लॅटफॉर्म आता अधिक लोकप्रिय होऊ लागले आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत नव्या सिनेमाचे हक्क मिळवण्यासाठी स्टार किंवा झी सिनेमा यांच्यात स्पर्धा असे. आता ती संपली. याचे कारणही हेच प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे हिंदी सिनेमाचे अर्थकारण आणि स्वरुप पूर्ण बदलून गेले आहे. याच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. यामुळे, एकीकडे, लहान लहान कलाकारांचे व उत्तम कथा असलेले अनेक चांगले चित्रपट प्रसिध्द होऊ लागले आहेत. लोक ते उचलूनही धरत आहेत. मात्र दुसरीकडे प्रेक्षक खेचण्यापायी या प्लॅटफॉर्मवरून हिंसा व सेक्स भरलेले सिनेमे दणादण प्रसारित होत आहेत. दक्षिणेचे सामर्थ्य त्यांच्या भव्य कल्पना, उत्तम निर्मिती आणि आक्रमक ग्राफिक्समध्ये आहे. बाहुबली आणि पुष्पा हे त्याचे नमुने आहेत. मात्र त्यांच्या चांगल्या कथाकल्पनांची मांडणीही अजून खूप ढोबळपणे केली जाते. जय भीम हे त्याचे उदाहरण म्हणून सांगता येईल. विषयांच्या वैविध्यामध्ये देखील त्यांना बरीच मजल गाठायची आहे. पानसिंग तोमर, नील बटे सन्नाटा किंवा वेल डन अब्बासारखी विविधता दक्षिणेतून आलेली नाही. तरीही लोकांना दक्षिणेचे सिनेमे आवडत असतील व त्यामुळे हिंदीत इर्षेने अधिक चांगला आशय येत असेल तर ते स्वागतार्हच आहे. सिनेमा ही भारताची एक ताकद आहे. जगात इतर देशांमध्ये अमेरिकी हॉलिवूड सिनेमाने स्थानिक सिनेमांना खाऊन टाकले आहे. भारतात तसे होऊ शकलेले नाही. उलट आशिया व आफ्रिकेमध्ये हॉलिवूडला टक्कर देण्याची क्षमता भारतीय सिनेमाने दाखवले आहे. दंगलसारख्या सिनेमांनी चीनमध्ये कहर केला होता. त्यामुळे सध्याच्या तात्पुरत्या पीछेहाटीतून हिंदी सिनेमा नक्कीच उसळी मारेल.

Exit mobile version