यंत्रणेला सलाम

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे वाजतगाजत अमाप उत्साहात घरोघरी जल्लोषात स्वागत झालेले आहे. दीड दिवसांच्या गणरायालाही गणेशभक्तांनी गुरुवारी मोठ्या भक्तिभावाने निरोपही दिलेला आहे.आता पुढील दहा दिवस  अवघा महाराष्ट्र गणेशमय होऊन जाणार आहे.दोन वर्षे कोरोनाच्या साथीमुळे खबरदारी म्हणून सरकारने गणेशोत्सवासह अन्य धार्मिक सण, उत्सव सार्वजनिक स्वरुपात साजरे करायला निर्बंध आणले होते. पण यावेळी सर्व सण निर्बंधमुक्त करण्यात आल्याने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणीत झाल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आलेले आहे.कोकणवासियांसाठी गणेशोत्सव हा अत्यंत महत्वाचा सण असल्याने लाखो चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त निर्विघ्नपणे आपापल्या घरी दाखल झालेले आहेत.त्यांचा हा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पोलीस, महसूल, परिवहन, आरोग्य विभाागाच्या यंत्रणानी जी काही यंत्रणा राबविली त्याबद्दल त्या यंत्रणेला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.कोणतीही योजना यशस्वी करायची असा निर्धार जर सरकारी यंत्रणेने प्रामाणिकपणे केला तर ती निश्‍चित यशस्वी होते हे यानिमित्तान दिसून आले. कारण गणेशभक्तांचा प्रवास विना अडथळा सुखरुप व्हावा,यासाठी गेल्या चार दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणा महामार्गावर डोळ्यात तेल घालून अहोरात्रपणे काम करत आहे. त्यामुळे चाकरमानी आपापल्या गावी योग्यवेळी  पोहोचू शकले.त्यातून दुर्दैवाने पोलादपूर येथे झालेला शिवशाही बस आणि खाजगी वाहन यांचा अपघात वगळता अन्यत्र कुठेही अशी दुर्दैवी घटना घडली नाही.पोलादपूर येथे झालेली घटना सार्‍या यंत्रणेच्या मेहनतीला डाग लावून गेली हेही नाकारु शकत नाही. मात्र त्यात यंत्रणेची काहीच चूक नव्हती.वाहनचालकांच्या अतिवेगाने मध्येच घुसण्याचा घिसाडघाईने तो अपघात घडला. हा अपवाद सोडला अन्यत्र कुठेही अशी दुर्दैवी घटना घडली.अथवा कुठेही वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले नाही.त्याचे सारे श्रेय  महामार्गावर जागते रहोचा नारा देत उभ्या असलेल्या पोलीस, आरोग्य, महसूल आणि परिवहन यंत्रणेला द्यावेच लागेल.आता पुढील दहा दिवस यंत्रणेचा पहारा महामार्गावर असाच राहणार असल्याने गणेशभक्तांचा परतीचा प्रवास देखील सुखकर झाल्याशिवाय राहणार नाही.या सणाच्या निमित्ताने बाप्पाने एसटी महामंडळावरही कृपावृष्टी केलेली आहे.तीन हजार एसटी बसेस मधून दीड ते दोन लाख गणेशभक्त कोकणात दाखल झालेले आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात धावणार्‍या लालपरीला यानिमित्ताने सुगीचे दिवस आलेत असेच आनंदाने म्हणावे लागेल.कारण कोरोना काळातील निर्बंध,त्यानंतर एसटी कर्मचार्‍यांनी केलेला बेमुदत संप. यामुुळे एसटी महामंडळाचे अपरिमित असे नुकसान झालेले आहे.त्यातून सावरायचे कसे याचीच चिंता महामंडळाला होती. पण निर्बंध उठले, संपही मिटला आणि लाखो प्रवाशांना घेऊन लालपरी पुन्हा वेगाने धावू लागली.आधी आषाढी एकादशी आणि आता गणेशोत्सव यामुळे महामंडळाची घसरेली आर्थिक गाडी काहीप्रमाणात रुळावर येताना दिसत आहे. तिची ही घोडदौड यापुढेही अशीच वेगाने होत राहणार आहे. गणेशोत्सवानिमित्त महामार्गाची तात्पुरती नेहमीप्रमाणे डागडुजी करण्यात आलेली आहे. दरवर्षी हाच सोपस्कार केला जातोय. तो महामार्ग पूर्ण कधी होणार आणि आमच्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर तसेच सुसाट कधी होणार हे त्या बाप्पालाच ठाऊक. त्या विघ्नहर्त्याने निदान आता राज्यात सत्तारुढ झालेल्या शिंदे, फडणवीस सरकारला सुबुद्धी द्यावी.आता केंद्रात आणि राज्यात एकाच विचारांचे सरकार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता राज्यकर्त्यांनी गेली एक तप रेंगाळलेला आणि कोकणच्या विकासाला चालना देणारा हा महामार्ग पूर्ण करावा.विद्यमान सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत हा महामार्ग पूर्णत्वास जाईल,असे आश्‍वासित केलेेले आहे.म्हणजे पुढील वर्षीचा गणेशोत्सवही असाच खड्ड्यातून जात साजरा करावा लागणार आहे. निदान जो तयार झालेला महामार्ग आहे तो तरी प्रवासासाठी लायक असा केला तरी कोकणी जनता विद्यमान राज्यकर्ते काहीतरी करत आहेत असे समजून जाऊन मार्गक्रमण करत राहतील.

Exit mobile version