म्हातारीचे मरण

शिवसेनेच्या बाजूने उभे असलेल्या असंख्य लोकांनी एकेकाळी सेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांची राडा-संस्कृती, मुस्लिमविरोध यावर कोरडे ओढले आहेत. भारतीय जनता पक्षाने सर्व यंत्रणांना नोकराप्रमाणे वापरून घेऊन सेनेला संपवण्याचे जे खुनशी राजकारण चालवले आहे त्यामुळे आजपर्यंत विरोधक असलेले सेनेला पाठिंबा देत आहेत. देशात आता प्रादेशिक पक्ष उरणार नाहीत असे जे.पी. नड्डा यांनी सांगणे, अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेनेला संपवायचे आहे असे म्हणणे आणि देवेंद्र फडणवीसांनी ‘जी हुकूम’ म्हणून ही निवडणूक शेवटची समजून लढा असा संदेश कार्यकर्त्यांना देणे हे सर्व लोकशाहीची शिकार करण्यासाठीचे हाकारे होते. शिंदे गटाच्या अपात्रतेची सुनावणी न घेणे ही या हाकार्‍यांना झालेली न्यायालयीन मदत होती. आता निवडणूक आयोगाकडून कुमक आली आली आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीपर्यंत म्हणजे सुमारे महिनाभरासाठी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय आला आहे. याखेरीज पक्षाचे नाव वापरायलाही काहीशी बंदी करण्यात आली आहे. आता ठाकरे वा शिंदे गटाला आपल्या पक्षाचे नाव निव्वळ शिवसेना असे सांगता येणार नाही. त्यांना बाळासाहेब किंवा आनंद असे एखादे विशेषण जोडूनच शिवसेनेचे आडनाव वापरता येऊ शकेल. त्यातही या पक्षांनी आपले नवे चिन्ह आणि नवीन नाव याबाबत तीन पर्याय आयोगाला द्यायचे आहेत. त्यातील कोणता पर्याय मान्य करायचा हा अधिकार आयोगाचा असेल. म्हणजेच, पुन्हा त्याही वेळी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाईल यात शंका नाही. तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर काँग्रेस, जनता पार्टी, जनसंघ, तेलुगू देसम किंवा अलिकडे रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष यांच्याबाबत पूर्वी अशाच प्रकारे चिन्ह गोठवण्याचे वा नावाला मनाई करण्याचे निर्णय झालेले आहेत. त्यामुळे शिवसेनेबाबतचा निर्णय जगावेगळा किंवा नियमबाह्य नाही. पण याला भाजपने इडीच्या धाकाने ज्या रीतीने शिवसेना पक्ष फोडला त्याची पार्श्‍वभूमी आहे. त्यानंतर ज्या रीतीने एकनाथ शिंदे यांना आपल्या तालावर नाचवून त्यांच्याकरवी आयोगासमोर हा वाद उभा केला ते अनैतिक आहे अशी बहुसंख्य मराठी लोकांची भावना आहे. त्यामुळेच आयोगाच्या निर्णय पक्षपातीपणाचा आहे असा संताप सध्या सोशल मिडियातून व्यक्त होत आहे. एरवी, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो असे म्हटले जाते. इथे भाजप सोकावतो आहे त्याची तर चीड आहेच पण शिवसेनेसारख्या का होईना पण बंडाच्या आवाजांचा जो मृत्यू घडवून आणला जात आहे त्याबद्दलही दुःख आहे. नेहमीपेक्षा वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागण्याची एखाद्या पक्षाबाबतची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी काँग्रेसचे चिन्ह बैलजोडी, गायवासरू आणि हाताचा पंजा असे बदलत गेले आहे. शेतकरी कामगार पक्षालाही मध्यंतरी काही काळ कपबशी हे चिन्ह वापरावे लागले होते. आज जवळपास 80 टक्के साक्षरता असलेल्या काळात नवीन चिन्हाचा प्रचार करणे तितकेसे कठीण राहिलेले नाही. त्यातही शिवसेनेला लगेचच लढवायची निवडणूक मुंबईतील अंधेरीची आहे. त्यामुळे तिला अडचणी कमी येतील. शिंदे गटाला देखील शिवसेनेचे आडनाव लावण्याची मिळालेली परवानगी ही मात्र सेनेला त्रासदायक ठरू शकते. किंबहुना, निवडणूक आयोगाने या निर्णयाद्वारे शिंदे गटाच्या उंटाला शिवसेनेचा अर्धा तंबू देऊनच टाकला आहे असे म्हणावे लागेल. उद्या कदाचित शिंदे गट हाच शिवसेना आहे असा निर्णयही येऊ शकतो. त्याला सेना न्यायालयात आव्हान देऊ शकेल. पण हे सर्व गुर्‍हाळ बराच काळ चालू राहील. हे गृहित धरून उद्धव ठाकरे यांना आता नव्याने पक्षउभारणीची तयारी करावी लागेल. जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर प्रचंड परिश्रमाने स्वतःचा पक्ष उभा केला. विक्रमी विजय मिळवले. या प्रादेशिक नेत्यांप्रमाणे करामत दाखवू शकले तरच उद्धव यांच्या राजकारणाला भवितव्य आहे. भाजपच्या हुकुमशाही राजकारणाच्या विरोधात उभं राहायचं तर त्यासाठी केवळ ठाकरे नावाची पूर्वपुण्याई कामी येणार नाही. कष्टाची तयारी लागेल.

Exit mobile version