‘आप’चं चलन

आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी रुपयाच्या नोटांवर महात्मा गांधी यांच्या जोडीने लक्ष्मी आणि गणपती यांची चित्रे छापली जावीत अशी मागणी केली आहे. त्यामुळे भारतीय लोकांना या दोन देवांचा आशीर्वाद मिळेल असा दावा त्यांनी केला आहे. हा सरळसरळ, लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा उठवण्याचा किंवा त्यांना चिथावण्याचा प्रयत्न आहे. त्याचा निषेध करावा तितका थोडा आहे. आगामी गुजरात निवडणुकांमध्ये भाजपसमोर ‘आप’नं यंदा बर्‍यापैकी आव्हान उभं केलं आहे. गुजरातेतील बहुसंख्य मतदार हे धार्मिक प्रवृत्तीचे व हिंदू आहेत. भाजप आणि नरेंद्र मोदी, पूर्वी वेळोवेळी, या मतदारांना भावनिक आवाहन करून आपल्याकडे वळवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांच्याशी टक्कर देण्यासाठी केजरीवाल यांनी भाजपचेच मुद्दे पळवण्याची शक्कल लढवली आहे. यापूर्वीही दिल्ली किंवा इतर निवडणुकांमध्ये त्यांनी हे प्रकार केले होते. हनुमान चालिसाचे पाठ करणे, लोकांना अयोध्येची फुकट सैर घडवणे, रामलीला आयोजित करणे यांचा त्यात समावेश होता. धार्मिक राजकारणामुळे भाजपला यश मिळत असल्याचे पाहून सर्वच पक्ष कमी-अधिक फरकाने असले मार्ग अवलंबत आहेत. काँग्रेस पक्षाचे सोनिया गांधींसह सर्व नेते गाजावाजा करून कुंभ मेळ्यात डुबक्या मारण्यापासून ते ठिकठिकाणच्या मठांमध्ये दर्शनाला जात आहेत. धार्मिक मुद्द्यांच्या आधारे प्रचाराची स्पर्धाच सुरू झाली आहे. केजरीवाल यांची मागणी म्हणजे तिचेच पुढचे धोकादायक वळण आहे. पूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक उघडपणे महात्मा गांधींचा द्वेष करीत तेव्हा नोटेवरून गांधीजींचं चित्र हटेल तो खरा आनंदाचा दिवस अशी चर्चा करीत. आता संघाचं उत्पादन असणारा भाजपच सत्तेमध्ये आल्यानं हा उघड द्वेष थांबला. महात्मा गांधींचं चित्र नव्हे तर त्यांचं खुद्द नावच देश-परदेशातलं एक मोठं चलन असल्याचं भाजप नेत्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आपल्या भाषणांमध्ये बापूजींचं स्मरण करत असतात. असं केलं की नंतर निवडणूक प्रचारामध्ये मुस्लिमांना जोरदार करंट लागेल अशा रीतीने मतदानयंत्रांचं बटन दाबा अशी भाषा करण्याला ते मोकळे होतात. सत्तेत येण्यापूर्वी महात्मा गांधींचं नामोनिशाण मिटवू असं कदाचित त्यांना वाटतही असेल. पण सध्या तरी गांधींजींचा उपयोग लक्षात घेऊन नेहरू परिवारावरच त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यांची ही काहीशी पंचाईत ओळखूनच बहुदा, केजरीवालांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या मागणीला भाजपचे नेते थेट नाही म्हणू शकणार नाहीत. बनिया किंवा व्यापार्‍यांचं प्राबल्य असलेल्या गुजराती समाजाला निवडणुकीपर्यंत गोंजारत राहणे हे करावेच लागणार आहे. त्यामुळे या प्रश्‍नावरून लक्ष वळवण्यासाठी भाजपला आता दुसरी काहीतरी तरकीब काढावी लागेल. यापूर्वी दिल्लीतली प्राथमिक आरोग्य केंद्रे, सरकारी शाळा, फुकट वीज, भरपूर पाणी इत्यादींचा बराच गवगवा करण्यात आला. त्याचा गुजरातेत अनुकूल परिणाम होत असल्याने निवडणूक प्रचारातील रेवडी संस्कृती थांबली पाहिजे असा साक्षात्कार पंतप्रधान मोदींपासून खालच्या सर्व कार्यकर्त्यांना एकाएकी झाला. नंतर केजरीवाल व इतरांनी बेरोजगारीचा प्रश्‍न उपस्थित केल्यावर खुद्द मोदी यांनी हजारो तरुणांना स्वतः नोकरीचं पत्र देत असल्याचा कार्यक्रम केला. याचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. आता लक्ष्मी आणि गणपतीच्या चित्रांचा मुद्दा आल्यावर भाजप बहुदा या मुद्याला बगल देईल किंवा हिंदू-मुस्लिम संघर्षासाठी नवा काहीतरी मुद्दा उकरून काढला जाईल. गणपती किंवा लक्ष्मीचे चित्र छापल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वाढणार आहे किंवा सध्या एक हजार रुपयांमध्ये मिळणार्‍या वस्तू आता केवळ शंभर रुपयात मिळू लागणार आहेत असे काहीही घडणारे नाही. देशातील महागाई व बेकारीही कमी होणारी नाही. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे पावसाने झालेले नुकसानही भरून येणारे नाही. या खर्‍या समस्यांविषयी बोलून त्यावर मार्ग काढण्याऐवजी केजरीवालांसारखे उच्चशिक्षित नेते स्वस्त राजकारण करतात हे दुःखदायक आहे. यातून केवळ दिखाऊ धार्मिक कार्यक्रमांचे वा घोषणांचे प्रस्थ वाढत जाईल. कोणत्याच धर्माच्या देवांना या राजकारणात ओढले जाऊ नये हेच समाजाच्या भल्याचे आहे.

Exit mobile version