नव्या संकटाशी सामना

मुसळधार पावसाने निर्माण केलेले संकट अनेक जिल्ह्यांना पूरग्रस्त करून गेले. आता पाण्याच्या वेढ्यातून, दगडमातीच्या खचातून बाहेर येत असताना आपत्तीग्रस्तांच्या मनावर आतापर्यंत झालेल्या प्रचंड नुकसानीचे ओझे आहे आणि याच परिस्थितीतून निर्माण होणार्‍या संभाव्य नवीन संकटाचे आव्हानही आहे. या कात्रीत हे सगळे संकटग्रस्त जिल्हे सापडलेले आहेत. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक मनुष्यांनी ही रायगड जिल्ह्यात झालेली आहे. येथे 95 पेक्षा अधिक लोकांनी प्राण गमावले. त्या खालोखाल सातार्‍यात 45 मृत्यू झाले आणि रत्नागिरीत ही संख्या 35 आहे. पाऊस आणि पुराशी संबंधित दुर्घटनेत आतापर्यंत राज्यात 207 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर अकरा जण अद्याप बेपत्ता आहेत. मदत आणि पुनर्वसनाच्या कामात राष्ट्रीय आपत्ती नियंत्रण दलाची 18 पथके रायगडसह कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. चिपळूण, महाड, पोलादपूर तसेच सांगली कोल्हापूर येथे 22 जुलैपासून कोसळलेल्या अमर्याद पावसाने निर्माण केलेल्या या पुरात छताच्या पलीकडे गेलेले पाणी आता खाली उतरले आहे. मात्र त्याने सगळीकडे चिखल, गाळ आणि कचरा याचे साम्राज्य निर्माण झाले असून, त्यातून होणार्‍या संभाव्य रोगराई टाळण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. आता त्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना हाती घेतल्या गेल्या आहेत. मोठ्या महापालिकांच्या मदतीने आरोग्य नियंत्रण कक्ष उभे केलेले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास पाचशे गावांत रोगराई पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी एक हजाराहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हा सगळा भाग अवघ्या चार दिवसांत स्वच्छ करण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. सांगलीतील प्रशासकीय प्रमुखांनी आपण चार दिवसांत सगळी सांगली संपूर्णत: स्वच्छ करण्याचे आव्हान स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. त्यांना याचा अनुभव आहे. दोन वर्षापूर्वी सांगलीत पुराने उच्छाद मांडला होता तेव्हादेखील सांगलीत आजच्याप्रमाणेच चिखल, कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. परंतु अन्य महापालिकांच्या सहाय्याने आणि आरोग्य तसेच अन्य कर्मचार्‍यांच्या मदतीने अवघ्या तीन दिवसांत त्यांनी पुरेशी स्वच्छता निर्माण केली होती. आता दोन पातळीवर आरोग्य विभाग कर्मचार्‍यांना लढावे लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे साचलेल्या घाण, चिखलातून निर्माण होणार्‍या लॅप्टो आदी प्रकारच्या आजारापासून लोकांना वाचवणे. त्यासाठी औषधांची, धुराची फवारणी करणे अत्यावश्यक असते. पिण्याचे पाणी सुरक्षित करण्याचे आव्हान असते. त्यासाठी सातत्याने नमुने तपासावे लागतात. त्याचे काम तातडीने आणि वेगाने व्हायला पाहिजे. ते हाती घेण्यात आलेले आहे ही चांगली गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर हे भीषण पूरग्रस्त बनलेले जिल्हे कोरोनाच्या चढ्या संख्येच्या बाबतीतही चिंताजनक गटात मोडणारे आहेत. त्यामुळे आताच्या आकस्मिक परिस्थितीमुळे त्याचाही फैलाव होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आणि त्यात लसीकरणासाठीचा आग्रह, दबाव तसेच व्यवस्था कायम कार्यान्वित ठेवावी लागणार. हे खूप मोठे आव्हान आहे. त्याच्या पुढचे आव्हान हे सगळीकडची वीज पूर्ववत करणे आहे. वीजमंत्र्यांनी सगळीकडे सौरदिवे लावण्याचे जाहीर केले आहे. ते येतील तेव्हा येतील. परंतु आता व्यवहार सुरळीत होण्यासाठी, जनजीवन पूर्ववत होण्यासाठी वीजपुरवठा प्रस्थापित होणे महत्त्वाचे असते. ते झाल्यानंतर हे जिल्हे त्यापुढच्या आव्हानाकडे वळू शकतील. हे बुडालेले प्रदेश मोठ्या प्रमाणात शेतीपिकावर अवलंबून असलेले आहेत. त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याची भरपाई लवकरात लवकर आणि भरीव पद्धतीने करावी लागेल. गेल्या वर्षाच्या नुकसानीबाबत जवळपास साडेतीन हजार कोटींची मागणी असताना केंद्राकडून सातशे कोटी रुपये मिळाले आहेत. राज्याकडून काही नवीन घोषणा होण्याची अपेक्षा आहे. ती एकदोन दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाल्यानंतर होईल असा अंदाज आहे. मात्र त्याआधी लोकांना आपले आरोग्य सांभाळत, त्याचा भार पुन्हा प्रशासनावर येणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांनी सहकार्ययुक्त प्रतिसाद देणे आवश्यक आहे. कारण प्रशासनावरचा ताण प्रचंड वाढलेला आहे. त्यात पुन्हा दुर्गम भागात हरवलेले रस्ते, मार्गावरील तुटलेले पूल, चिखलगाळातून चालत जाण्याचे संकट ही आव्हाने आहेत. रोटी, कपडा, मकानसोबत आरोग्यसुविधा हेदेखील मोठे आव्हान आहे.

Exit mobile version