हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी शनिवारी मतदान झालं. आजवर या राज्यात कोणत्याही पक्षाचं सरकार सहसा दुसर्यांदा निवडून येत नाही असा इतिहास आहे. तो पुसून टाकण्यासाठी यंदा भाजपने सर्व ताकद पणाला लावली. सालाबादप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी झंझावाती सभा घेतल्या आणि भाजपच्या नेत्यांनी मोदींच्याच नावानं मतं मागितली. भाजपचं जे प्रचारगीत करण्यात आलं त्यातही मोदींच्या आवाजातील भाषणाचाच वापर करण्यात आला. एकेकाळी मोदी भाजपचे प्रचारक म्हणून हिमाचल प्रदेशात होते. त्यावेळी आपण या राज्याची रोटी खाल्ली आहे असं खास भावनिक आव्हान त्यांनी करून झालं आहेच. शिवाय डबल इंजिन सरकार पाहिजेच यावर भर देण्यात आला. मात्र विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना पुन्हा मुख्यमंत्री करणार का किंवा ते नसले तर दुसरे कोण याबाबत मौन बाळगण्यात आलं. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचं हे गृहराज्य. त्यामुळे त्यांची सर्व प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र त्यांच्याविषयी स्थानिक भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. याचाच परिणाम म्हणून उमेदवार कोण आहे हे विसरून जा, मला मतदान करताय असं समजा असं आवाहन मोदींना करावं लागलं. राज्यातील प्रश्नांच्या बाबत भाजपची पुरती कोंडी झालेली आहे. त्या आघाडीवर ठोस दाखवण्यासारखं काहीही नाही. परिणामी, मोदी परदेशात वावरताना हिमाचली टोपी कशी घालतात आणि पुढच्या वर्षीच्या डिसेंबरात होणार्या जी-20 देशांच्या बैठकीत हिमाचली वस्तू भेट म्हणून कशा दिल्या जाणार आहेत याच्या कथा रंगवल्या जात आहेत. सांगण्यासारखे काहीही नसले तरी भाजप प्रचार मात्र जोरदार करू शकतो हे पुन्हा दिसून येत आहे. काँग्रेस ही भाजपची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. सरकारी कर्मचार्यांसाठीची जुनी पेन्शन पुन्हा लागू करा आणि युवकांना नोकर्या द्या या दोन मागण्यांभोवती प्रचार फिरता ठेवण्याचा तिचा प्रयत्न होता. त्यात तिला चांगले यश आलं. काँग्रेसने राजस्थानमध्ये जुनी पेन्शन पुन्हा लागू केली आहे. त्याचा दाखला देऊन हिमाचलमध्येही ती लागू होईल असा काँग्रेसचा वायदा आहे. तर भाजपवाले केवळ समिती स्थापन करण्याची भाषा करीत आहेत. राज्यातील बहुसंख्य लोक लष्कराच्या सेवेत आहेत. मात्र अलिकडे भरती कमी झाल्याने ते नाराज आहेत. सफरचंदाची बागायती हा राज्यातला मोठा व्यवसाय आहे. सुमारे सात हजार कोटी रुपयांची उलाढाल त्यात होते. सफरचंदांचे भाव पडल्याने त्यांनाही किमान हमी भाव लागू करावा या मागणीसाठी अलिकडेच प्रचंड मोर्चा निघाला होता. या सर्व असंतोषाचा काँग्रेस कितपत फायदा उठवू शकते हे मतपेटीतून दिसणार आहे. याच दरम्यान गुजरातमधील तिकिटवाटप सुरू झाले असून प्रचाराला वेग आला आहे. नरेंद्र मोदी हे गेल्या दोन महिन्यांपासून राज्याचे दौरे करीत आहेत. गेली सुमारे पंचवीस वर्षे भाजपची सत्ता असूनही बेकारी, खराब रस्ते, इस्पितळांची दुरवस्था या प्रश्नांवर त्या पक्षाला मात करता आलेली नाही. भ्रष्टाचारही निपटता आलेला नाही. मोरबीमध्ये पूल कोसळून 135 लोकांचा बळी गेला. मात्र त्याला जबाबदार असलेला उद्योगपती अजूनही मोकाट आहे. पुलाचे कंत्राट देण्याच्या भ्रष्टाचारावर भाजपवाले गप्प आहेत. जखमींना ज्या इस्पितळांमध्ये ठेवण्यात आले होते त्या सरकारी इस्पितळांची हालत बिहार किंवा उत्तर प्रदेशातील इस्पितळांहून वेगळी नव्हती. मोदी येणार म्हणून तिथं रातोरात रंगरंगोटी करण्यात आली. थोडक्यात, मोदी एरवी ज्या गुजरात मॉडेलचा डंका पिटत असतात ते पोकळ आहे. यामुळेच तिथे आम आदमी पक्षाने भाजपच्या नाकात दम आणला आहे. त्या पक्षाला मतदान किती होईल हा स्वतंत्र मुद्दा आहे. पण त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या मागे मोदींपासून सर्व नेत्यांना धावावे लागते आहे. भाजपने तिकिटवाटपात सुमारे 38 जुन्या आमदारांना तिकिटे नाकारली. विजय रुपानी, नितीन पटेल यांच्यासारख्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनाही सक्तीची निवृत्ती घ्यावी लागली. एकूण, आपलंच राज्य कह्यात ठेवताना मोदी-शाह यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हिमाचल आणि गुजरातेत अंतिम निकाल काहीही आले तरी भाजप आता अभेद्य राहिलेला नाही, हे या प्रचारात स्पष्ट झालंय.