क्रिकेट हा जेमतेम सात-आठ देशांमध्ये खेळला जातो. तरीही या संघांच्या सामन्यांची जी जत्रा भरवली जाते तिला आपण विश्वचषक म्हणतो. पण जगातल्या बहुसंख्य देशांमध्ये आणि सर्व खंडांमध्ये खेळला जाणारा खेळ हा फुटबॉलच आहे. त्यामुळे त्या खेळाच्या महाकुंभाचे विश्वचषक हे नाव बर्यापैकी सार्थ ठरते. हा विश्वचषक कतारमध्ये रविवारी दिमाखात संपन्न झाला. स्पर्धेतले अनेक निकाल धक्कादायक होते. तिचा अंतिम सामनाही या निकालांनाच साजेसा झाला. आरंभीची सुमारे ऐंशी मिनिटे सामना एकतर्फी वाटला तरी शेवटी तो प्रचंड चुरशीचा झाला. क्षणाक्षणाला विजयाचे पारडे वरखाली होत होते. अगदी अखेरच्या मिनिटापर्यंत फ्रान्स किंवा अर्जेंटिना कोणीही जिंकू शकेल अशी स्थिती होती. अखेर पेनल्टी शूटआउटमध्ये त्याचा फैसला झाला. लिओनेल मेस्सीचा हा अखेरचा सामना त्याच्या जगभरच्या चाहत्यांसाठी चिरस्मरणीय ठरला. विशेष म्हणजे मेस्सीच्या अर्जेंटिनाला या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाने पराभवाचा धक्का दिला होता. पण मेस्सी आणि त्याच्या संघाने नंतर मात्र चाहत्यांची निराशा केली नाही. मेस्सीची शैली ही अनेकांना भारतीय हॉकीपटू ध्यानचंद यांची आठवण करून देते. जणू काही बॉलडान्सच करीत आहेत अशा रीतीने बॉलला खेळवत आणि वेगाने धावत मुसंडी मारण्यातील मेस्सीचे कौशल्य अद्भुत म्हणावे असे आहे. आता त्याने निवृत्ती घेतल्याने ते केवळ जुन्या व्हिडिओमध्येच पाहून समाधान मानावे लागेल. अंतिम सामन्यापर्यंत फ्रान्सने प्रतिस्पर्धी संघांवर चांगले वर्चस्व गाजवले होते. रोनाल्डोच्या पोर्तुगाल हरवणार्या मोरोक्कोला देखील त्यांनी सहज हरवले होते. मात्र अंतिम सामन्यात त्यांचे खेळाडू निष्प्रभ ठरले. एमबापेचा सणसणीत अपवाद वगळता अन्य कोणालाही छाप पाडता आली नाही. पेनल्टी शूटआउटमध्येही ते दिसून आले. एमबापेने 97 सेकंदांमध्ये दोन गोल करून ज्या रीतीने संघाची पिछाडी भरून काढली तो प्रकार थरारक होता. मात्र इतर सहकार्यांची साथ त्याला लाभली नाही. फुटबॉल हा खर्या अर्थाने सांघिक खेळ आहे हे त्यावेळी पुन्हा एकवार दिसून आले. मेस्सी होता म्हणून अर्जेंटिना जिंकला असं झालं नाही. तर तो संघ उत्तम खेळला म्हणून विश्वविजेता ठरला. अरब देशांमध्ये प्रथमच झालेल्या या स्पर्धेने आयोजनात आणि प्रत्यक्ष मैदानात अनेक जुने समज मोडून काढले आणि अनेक विक्रम प्रस्थापित केले. अडीचशे अब्ज डॉलरच्या वर खर्च करून कतारने एकट्याच्या बळावर हा विश्वचषक घडवून आणला. त्यासाठी मैदानेच नव्हे तर रेल्वेलाईनही नव्याने टाकण्यात आल्या. उष्ण हवेचा त्रास होऊ नये म्हणून अजस्त्र वातानुकूलन यंत्रे वापरण्यात आली. स्पर्धेत जपान आणि दक्षिण कोरियाच्या संघांनी दिग्गज युरोपीय संघांना हरवले. मोरोक्कोसारखा अरब-आफ्रिकी देश उपांत्य फेरीपर्यंत धडक मारता झाला. जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, बेल्जियम हे दादा युरोपीय देश पहिल्या फेर्यांमध्येच बाद होत गेले. इटलीचा तर मुळात समावेशही नव्हता. ब्राझीलसारखा एकेकाळचा बलाढ्य संघही फार मजल मारू शकला नाही. फुटबॉलचं केंद्र आता युरोपकडून आशियाई व आफ्रिकी देशांकडे सरकत आहे याची प्रचिती या स्पर्धेतून आली. युरोपच्या संघांमध्ये आणि नामांकित क्लब्जमध्येही मूळचे इजिप्त, अल्जेरिया, घाना इत्यादी देशांमधले खेळाडू मोठ्या प्रमाणात खेळत आहेतच. फ्रान्सच्या एमबापेची आई अल्जिरिया आणि वडील कॅमेरूनचे आहेत. त्या संघातले बहुसंख्य खेळाडू हे कृष्णवर्णीय होते हे प्रेक्षकांना कालचा सामना पाहताना लक्षात आले असेलच. भविष्यकाळात याच देशांचे संघ युरोपच्या दादागिरीला टक्कर देतील यात शंका नाही. हे लोण भारतातही येण्याचा क्षण आता दूर नाही. भारतासारखा एकशे चाळीस कोटीचा देश या खेळात सामील होऊ लागला तर त्याची आर्थिक गणितेही बदलून जातील. आयपीएलच्या अतिरेकामुळे देशातील क्रिकेटचं आकर्षण हळूहळू कमी होत आहे. येत्या पाच-दहा वर्षात ते फुटबॉलकडे वळेल यात शंका नाही. रिलायन्ससारख्या कंपन्यांनी त्यासाठीची प्रेक्षकपेरणी या स्पर्धेच्या निमित्ताने केली आहेच. असो. इंग्लंडने क्रिकेटचा ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांचा विश्वचषक अलिकडेच जिंकला. तरीही त्या देशात फुटबॉल हाच सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. भारतातही हेच होणार आहे.