एक पर्व संपले

काही व्यक्तींचे आयुष्यच हेच त्यांचा संदेश असते. तोच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा यज्ञ असतो. कवी दुष्यंत कुमार यांच्या शब्दांत सांगायचे तर मुकम्मल बयान अर्थात परीपूर्ण विधान असते. ज्यांना पुस्तकी मूल्य समजली जातात त्या साधेपणा, सचोटी, सच्चेपणा यातून कसा आदर्श घडवता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख! त्यांनी आमदार म्हणून निवडून येण्याचे केलेले विक्रम असोत किंवा त्यांच्या साधेपणाची शेकडोंच्या मनात असलेली विलक्षण उदाहरणे असोत, आपल्या जगण्यालाच त्यांनी परमकर्तव्याची डूप दिली आणि ती त्यांनी, परिस्थितीगणिक किंवा काळानुसार बदलली नाहीत. मग ते त्यांच्या एसटीतून झालेल्या प्रवासाचे उदाहरण असो अथवा त्यांनी एसटीच्या बस थांब्यासाठी केलेले पत्रव्यवहार असो. आपली भूमी, त्या भूमीवर जगणार्‍या सर्वसामान्यांची सेवा सच्चेपणा, साधेपणा, सचोटी आणि कष्ट या आधारे करता येते, यावर असलेली असीम श्रद्धा त्यांना राज्यभरातच नव्हे तर देशभरात आदरणीय प्रतिमा देऊन गेली. आणि ही त्यांची प्रतिमा आजकालचे नेते करतात तसे इमेज मॅनेजमेंट नव्हते. ती त्यांची शेवटपर्यंत टिकलेली, आत आणि बाहेर एकच असलेली प्रतिमा होती. म्हणून त्यांना ती प्रतिमा जपण्याचे ओझे नव्हते. कारण त्यांचे सगळेच जीवन या मूल्यांच्या आधारे होते. म्हणूनच त्यांना आपण कर्कश आवाजात ओरडून भाषण केल्याने समाज परिवर्तन घडते यावर विश्‍वास नव्हता; केवळ विधानसभेत आपल्या सहप्रतिनिधींवर आणि माध्यमावर प्रभाव टाकण्यासाठी विद्वत्ताप्रचुर भाषण करण्याची गरज त्यांना भासली नाही. याचा अर्थ ते साधेपणाने जगत होते म्हणजे सोपेपणाने जगत होते असे नाही.त्यांनी विधिमंडळातील कामकाज, राज्यातील विविध प्रश्‍न, याच्यावर सखोल अभ्यास केला होता. त्यासाठी त्यांचे अनेक तास खर्ची पडत होते आणि त्यांचे सगळे संदर्भ त्यांच्याकडे असायचे आणि अनेकदा ते मुखोद्गत असायचे. या सगळ्या गुणांमुळेच शेतकरी कामगार पक्षाच्या ते चेहरा बनलेलकारण ज्या मुल्यांवर शेतकरी कामगार पक्ष उभा राहिला, त्याचे जणू प्रतिबिंब गणपतरावांचे आयुष्य होते. येत्या पिढीला दंतकथा वाटेल असे त्यांचे जगणे होते, राहणीमान होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याने एक आधीच संपुष्टात आलेला, साधेपणाच्या आणि कसोटीच्या बळावर लोकांत वावरण्याचा कालखंड त्यांच्यासोबत संपुष्टात आला आहे. मात्र त्यांचे हे धगधगते आदर्शवत आणि प्रेरणादायी जीवन अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. ज्याप्रमाणे ते सातत्याने कधीतरी क्रांतीची ठिणगी पेटेल या विश्‍वासाने काम करत राहिले ती ठिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही. तशी क्रांतीची ठिणगी पेटवणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली असेल.या महान कृषीवल परिवारातर्फे श्रद्धांजली!

Exit mobile version