अरेरे.. महाराष्ट्रा…


केंद्रात गेली सुमारे आठ वर्षे भाजपचे सरकार आहे. 2019 मध्ये मोदी यांच्या पाठिंब्यात प्रचंड वाढ झाली. भाजपला जागा मिळाल्या. मधला उद्धव ठाकरे सरकारचा अपवाद वगळता महाराष्ट्रातही भाजपचंच राज्य आहे. पण या काळात हिंदूंची स्थिती खूपच वाईट झाली असावी. त्यांच्या बचावासाठी सध्या राज्यभरात हिंदू जनसंघर्ष मोर्चे काढले जात आहेत. यामध्ये भाजपचे किंवा शिंदे गटाचे मंत्री सहभागी होत आहेत. मुंबईत मंगलप्रभात लोढांनी अशा मोर्चाचं नेतृत्व केलं. जळगावात गुलाबराव पाटील यांचं भाषण झालं. लव्ह जिहाद आणि धर्मांतरांविरुध्द कायदे करण्यात यावेत या मोर्चातल्या मुख्य मागण्या आहेत. याखेरीज गोहत्याबंदीचीही मागणी करण्यात येते. वास्तविक महाराष्ट्रात गोहत्येला खूप पूर्वीपासून बंदी आहेच. पण तरीही वातावरण तापवण्यासाठी बहुदा तिचा उपयोग होत असावा. लव्ह जिहाद आणि धर्मांतर यांच्याबाबतही हेच आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी आहे. त्यात सुमारे दहा ते अकरा टक्के मुस्लिम आहेत. हे अकरा टक्के लोक धर्मांतरे करून नव्वद टक्के लोकांना अल्पमतात आणतील असा दावा करणार्‍यांच्या बुद्धीची तारीफच करायला हवी. तीच बाब लव्ह जिहादची. मुळात बहुसंख्य भागांमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांच्यात एक अदृश्य भिंत असतेच. अलिकडच्या विद्वेषी वातावरणामुळे त्यात आणखी भर पडली आहे. जातींच्या बाहेर लग्न करायलाही अजून समाज पुरेसा तयार नाही. अशा पार्श्‍वभूमीवर या दोन धर्मांमध्ये लग्नसंबंध जुळून येणं हे किती कठीण असेल याची कोणालाही कल्पना करता येण्यासारखी आहे. संबंधित तरुण-तरुणांमध्ये आत्यंतिक प्रेम असल्याखेरीज सध्याच्या वातावरणात कोणीही हे संबंध विवाहापर्यंत नेणार नाही. त्यामुळे जाहीरपणे असे विवाह जिथे होत असतील तिथे जाऊन सरकारने त्यांचे कौतुक करायला हवे. सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांचा उपयोग होऊ शकतो. टीव्ही मालिकांमध्ये काम करणार्‍या तुनिशा शर्माचे आत्महत्या प्रकरण सध्या गाजते आहे. तिच्या मुस्लिम मित्राने या लव्ह जिहाद मोहिमेमुळे घाबरुन तुनिशाशी संबंध तोडले असावेत अशी शक्यता वर्तविली जाते आहे. हे संबंध तोडल्यामुळे तुनिशाने आत्महत्या केली असा ठपका ठेवून आज त्याला अटक झाली आहे. उलट्या बाजूने समजा या दोहोंनी विवाह केला असता तरीही बहुधा तो लव्ह जिहादचा प्रकार ठरवून त्याचा छळ झाला असता. विद्वेषाचा हा कहर आहे. त्यामुळे अशा मोर्चांमध्ये भाद घेणार्‍या मंत्र्यांसकट सर्व आयोजकांना समाजात दुही माजवण्याबद्दल अटक करायला हवी. प्रत्यक्षात त्यांना माध्यमांमधून प्रतिष्ठा दिली जाते. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील रोजच्या व्यवहारातील संबंधांना जमीन जिहाद, सरकारी नोकरी जिहाद अशी नावे देणे हा त्याच्या पुढचा टप्पा आहे. फाळणीच्या काळातही हे असे कधी झाले नव्हते. पुरोगामी म्हणवणार्‍या राज्याच्या र्‍हासाचे हे भयंकर उदाहरण आहे. अरेरे, महाराष्ट्रा… तुझी ही काय दुर्दशा झाली!!

Exit mobile version