मुलींनी जग जिंकले

एकीकडे द्वेषावर आधारलेल्या राजकारणात महिलांचा वापर करून घेतला जात असताना दुसरीकडे तरुण मुली या वातावरणापासून मुक्त राहून जग गाजवत आहेत. एकोणीस वर्षांखालील मुलींच्या संघाने रविवारी इंग्लंडला हरवून क्रिकेटचा विश्‍वचषक आपल्या नावावर केला. भारतीय महिला क्रिकेट संघाला आजतागायत एकदिवसीय वा वीस षटकांच्या सामन्यातील कोणताही जागतिक करंडक जिंकता आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर एकोणीस वर्षांखालील मुलींचे यश उठून दिसणारे आहे. यापूर्वी 2020 मध्ये झालेल्या टी-ट्वेंटी विश्‍वचषकामध्ये आधीच्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्याने भारतीय महिला जोशात होत्या. पण अंतिम सामन्यात त्यांना ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. त्यामुळे आम्हाला विजय मिळवायचाच होता असं काल जिंकलेल्या संघाची कर्णधार शफाली वर्मा हिने सांगितले. या विजयामुळे महिलादेखील पुरुषांइतक्याच सफाईने आणि जोशाने क्रिकेट खेळतात आणि त्यांच्या दर्जात फरक राहिलेला नाही हे अधोरेखित होईल. त्यामुळे महिला क्रिकेटच नव्हे तर इतर प्रकारातील खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल. महिला आयपीएल क्रिकेटच्या पुढील पाच वर्षांच्या मिडिया प्रसारणाचे हक्क गेल्या आठवड्यात तब्बल 951 कोटी रुपयांना विकले गेले. पुरुष आयपीएलच्या हजारो कोटींच्या तुलनेत ते कमी असले तरी ते वाढताहेत हे नक्की. ताज्या विश्‍वकरंडक विजयामुळे क्रीडारसिकांचेही यातील रस वाढेल. आता महिला आयपीएल संघांचे जे लिलाव होणार आहेत त्यातही मोठ्या बोल्या लावल्या जातील अशी अपेक्षा आहे. एकूण चांगल्या क्रिकेटच्या प्रसारासाठी हे वातावरण पोषक आहे. कालच्या एकोणीस वर्षांखालील संघाची कामगिरी ज्यांनी पाहिली आहे त्या क्रीडा समीक्षकांच्या मते तरुण संघातील काही खेळाडूंची तडफ पुरुष संघातील खेळाडूंनाही मागे टाकेल अशी आहे. किंबहुना, आणखी काही वर्षांनी ही तुलना बंदच करावी लागेल असे भाकित ते करतात. अंतिम सामन्यात इंग्लंडची कर्णधार ग्रेस स्क्रिव्हेन्स हिचा तृष्णाने लाँगऑफवर घेतलेला झेल किंवा अर्चनादेवीने कव्हरमध्ये घेतलेले झेल हे अफलातून होते. या संघातील अनेक मुलींची घरची परिस्थिती सामान्य म्हणावी अशी आहे. अर्चनाच्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झालेला असल्याने तिची आई सावित्रीदेवी हिच्यावर घराची जबाबदारी होती. त्यावेळी जेव्हा तिने अर्चनाला मोरादाबादमध्ये मुलींच्या शाळेत टाकले तेव्हा नातेवाईकांनी तिला चुकीच्या रस्त्याला जात असल्याबद्दल दूषणे दिली. तिने मुलीला विकले आहे असाही प्रचार काहींनी केला. त्या स्थितीतून आज अर्चना भारताची एक स्टार खेळाडू या पदापर्यंत पोचली आहे. भारतीय क्रिकेटमधील स्पर्धा प्रचंड जीवघेणी आहे. तिथे स्थान मिळवणं आणि टिकवणं अत्यंत अवघड आहे. विराट कोहली हा एकेकाळी एकोणीस वर्षांखालील संघाचा कर्णधार होता व त्याने तेव्हा विश्‍वचषक जिंकला होता. पण तशीच कामगिरी 2012 मध्ये करणारा उन्मुक्त चांद हा कोणाच्या खिजगणतीतही नाही. तो आता अमेरिकेत राहून क्रिकेट खेळतो. तीच स्थिती भारतातर्फे त्रिशतक झळकवणार्‍या करुण नायरची आहे. पैसा येईल तशी महिला क्रिकेटमधील स्पर्धाही तीव्र होणार आहे. भारतीय संघात सध्या तरी मुंबई-दिल्ली इत्यादी शहरांपासून दूरच्या शहर वा खेड्यांमधल्या मुलीच दिसत आहेत. हे सुचिन्ह आहे. 

Exit mobile version