राहुल यांची पाली   

राजकारणाचा सध्याचा संवाद समजा हिंदी-इंग्रजीत चालला आहे असे म्हटले तर राहुल हे पाली किंवा अर्धमागधीमध्ये बोलत आहेत असे म्हणायला हवे. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्ष विकास, नोकर्‍या, जातीयवाद, भ्रष्टाचार, निवडणुकांमधलं यश अशा भाषेत बोलत असताना राहुल गांधी गेले चार महिने एखाद्या साधूसंताप्रमाणे प्रेम, भाईचारा अशा गोष्टींविषयी बोलत आहेत. ‘नफरत के बाजार में मै मोहब्बत की दूकान खोलने आया हूँ’ हा त्यांचा नारा होता. तोच घेऊन त्यांनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चार हजार किलोमीटरची पायी यात्रा काढली. सोमवारी काश्मीरमध्ये तिची समाप्ती झाली तेव्हा जंगी कार्यक्रम आणि प्रसिध्दी व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा असणार. पण काश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे त्यावर पाणी फेरले. समारोपाच्या सभेला 23 विरोधी पक्षांना बोलावण्यात आले होते. पण त्यापैकी केवळ आठच पक्ष आले. राहुल यांनी प्रेमाची भाषा केली तरी काँग्रेसविषयी अजूनही इतर पक्षांमध्ये कमालीचा अविश्‍वास आहे याचे हे द्योतक आहे. मात्र राहुल स्वतः एकूणच राजकारणाची परिभाषा बदलू पाहत आहेत असे दिसते. भाजपने देशात हिंदू विरुद्ध मुस्लिम असा द्वेष पेरला आहे. यात भाजपच्या बाजूने जे नसतील ते ते शत्रू मानून त्यांचा निःपात करण्याची भूमिका त्या पक्षाने घेतली आहे. संसदीय राजकारणात जे आमदार, खासदार आपल्या बाजूला येणार नाहीत त्यांच्या मागे इडी, सीबीआयच्या चौकशा लावल्या जात आहेत. थोडक्यात वातावरण अत्यंत दूषित करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष काहीही बोलू गेला तरी त्याला त्याच्या पूर्वीच्या पापांची आठवण करून दिली जात आहे. यातून बाहेर पडण्यासाठी राहुल यांनी ही वेगळी भाषा अंगिकारलेली दिसते. मात्र याबाबत ते गंभीर आहेत हे मान्य करायला हवे. राहुल यांचे वडिल राजीव आणि आजी इंदिरा हे दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. मात्र सोनिया किंवा राहुल यांनी त्याचे कधीही भांडवल केलेले नाही. सोमवारच्या श्रीनगरच्या सभेत राहुल यांनी त्या प्रसंगांची आठवण करून देऊन हा हिंसाचार नष्ट व्हावा असा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. हा संदेश अत्यंत महत्वाचा आहे. राहुल यांनी ऊन्ह, थंडी, वारा, पाऊस यांना तोंड देत केलेल्या यात्रेने या संदेशाच्या मागे नैतिक बळही उभे केले आहे. मात्र या यात्रेनंतरचा त्यांचा प्रवास अधिक खडतर असणार आहे. कारण, तिथे आपल्या पक्षातील गटांना काबूत ठेवणे, इतर पक्षांशी जुळवून घेणे, निवडणुका जिंकण्यासाठी कार्यक्रम आखणे, सत्ता आल्यास चांगले सरकार चालवून दाखवणे हे करावे लागणार आहे. शिवाय हे करताना त्यांचा मुकाबला मोदींशी आहे. त्यांची हिंदी आणि राहुल यांची पाली हा संघर्ष कसा होतो हे येत्या काळात दिसणार आहे.

Exit mobile version