धडपडीचे कारण

लक्ष्मण जगताप हे एकेकाळी अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचा पिंपरी चिंचवडमधील विस्तार त्यांच्यामुळे शक्य झाला. नंतर त्यांचे बिनसले. 2009 ला त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. 2014 नंतर ते भाजपमध्ये जाऊन आमदार झाले. मुक्ता टिळक यांचे सासरे जयंतराव टिळक. हिंदू महासभेला त्यांची सहानुभूती होती. पण ते होते काँग्रेसमध्ये. राज्यसभेचे खासदार आणि नंतर महाराष्ट्रात विधानपरिषदेचे सभापती म्हणून त्यांची कारकीर्द काँग्रेसवाले म्हणूनच झाली. मात्र त्यांचे नातू आणि सूनबाई म्हणजे मुक्ताताई, भाजपमध्ये गेल्या. जगताप आणि टिळक यांच्या निधनामुळे आता चिंचवड आणि कसबा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. ती बिनविरोध व्हावी अशी मागणी भाजपने केली होती. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी ती मानली नाही. आमदाराच्या मृत्यूनंतरच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, राजकारण आणू नये असे भावनिक आवाहन करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यापूर्वी अंधेरी पोटनिवडणुकीच्या वेळी त्याची विशेष चर्चा झाली. पण त्यावेळी भाजपने शिवसेनेच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी शक्य ती सर्व आयुधे वापरली. दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नीला शिवसेना उमेदवारी देणार होती. त्यांना महापालिकेच्या नोकरीतून मुक्त करण्यास वेळ लावला गेला. नंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराची चौकशी असल्याचे भासवले गेले. त्याहीनंतर शिवसेनेला निवडणूक चिन्ह वापरता येऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गेली. त्यातून सेनेचे चिन्ह गोठवले गेले. इतके सर्व झाल्यानंतर जेव्हा निवडणूक आपल्याला जड जाणार असल्याचे स्पष्ट झाले तेव्हा मग भाजपने त्यातून माघार घेतली. शिवाय एखाद्याच्या मृत्यूनंतर ती निवडणूक बिनविरोध करावी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे असा उपदेश केला गेला. आमदारकीची निवडणूक म्हणजे खासगी दुकानदारी पेढी किंवा विमा पॉलिसी नव्हे की ती मरणानंतर त्याच घरातल्याच्या नावावर व्हावी. पण आपल्याकडे महाराष्ट्राची परंपरा किंवा राजकीय संस्कृती या नावाखाली सध्या काय वाटेल ते खपवले जात असते. एरवी जे लोक विधानसभेत देखील शिव्या देतात, एकमेकांच्या अंगावर धावून जातात, सार्वजनिक सभांमध्ये गलिच्छ भाषा वापरतात तेच लोक सोईस्कर असेल तेव्हा राजकीय संस्कृती वगैरे बाता करतात हे महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांपासून पाहिले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी भाजपबाबत नाराजी आहे. विशेषतः कसब्यात टिळकांच्या घरात उमेदवारी न दिली गेल्याने पुण्यातला ब्राह्मण समाज नाराज आहे. संख्येने कमी असला तरी त्याच्या नाराजीची चर्चा मोठी होणार आहे. संघ आणि भाजपला ते परवडणारे नाही. त्यामुळे येथे बिनविरोध निवडणुकीचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न करून झाला. जनतेत आपल्याबाबत असंतोष आहे हे भाजपला उमगलेले आहे. 2024 च्या निवडणुकांपूर्वी तो उघड होऊ नये यासाठी ही धडपड आहे. या स्थितीत टिच्चून निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीला संधी आहे.

Exit mobile version