स्त्रीशक्ती, चक दे!

बर्‍याच काळाने भारत ऑलम्पिकमध्ये आश्‍वासकपणे कामगिरी करताना दिसत आहे. त्यात सध्या जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या विविध स्पर्धांत महिला खेळाडूंनी केलेली कामगिरी पाहता अवघा देश त्यांना चक दे असे म्हणत अभिवादन करताना दिसत आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्याने सगळे देशवासी त्यांच्या यशासाठी प्रार्थना करत ठिकठिकाणी प्रोत्साहक संदेशांचे प्रदर्शन करीत आहेत. सर्वांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. त्यात विविध पदके मिळवताना व्यक्तिगत विक्रम रचण्यापासून इतिहास निर्माण करण्यापर्यंतची कामगिरी बजावली जात आहे. काही ठिकाणी पदकांच्या पातळीवर निराशा असली तरी आपले व्यक्तिगत विक्रम मोडीत काढण्याची कामगिरीही होत आहे. तसेच, यंदाच्या स्पर्धांत यश मिळाल्यावरही पुढच्या ऑलम्पिकमध्ये अधिक सरस कामगिरी करण्याची प्रोत्साहक आणि प्रेरणादायी आशा व्यक्त केल्या जात आहेत. हे सर्व पाहता यंदाचे ऑलम्पिक भारतीय स्त्रीशक्तीचा नारा बुलंद करणारे ठरणार आहे आणि देशासाठी एकंदर खेळाकडे आणि खास करून महिला खेळाडूंसाठी टर्निंग पॉईंट ठरेल यात शंका नाही. रविवारचा दिवस या सकारात्मक विजयांचा ठरला. पहिली बातमी पी. व्ही. सिंधूची आली. या आधीच्या रिओ दी जेनेरो येथील ऑलिम्पिकमध्ये प्रभावी कामगिरी दाखवून रौप्य पदक जिंकणार्‍या सिंधूने साहजिकच यंदा सुवर्णाकडे लक्ष्य ठेवले होते. तिची सुरुवात दिमाखात झाली आणि ती पुढेही चालू राहिली. मात्र रविवारी तिचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मात्र तिने कांस्यपदक पदरात पाडून घेत प्रेरणादायक इतिहास रचला. रविवारी कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जियाओ हिचा 21-13, 21-15 असा पाडाव करताना दोन व्यक्तिगत ऑलम्पिक पदके मिळवणारी पहिली भारतीय महिला बनण्याचा इतिहास रचला. तिच्या या कांस्य पदकाने याआधी मिराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदकाची कमाई केली होती, त्यात भर पडली आणि स्त्रीशक्ती चकाकून निघाली. याप्रसंगी अजून एका महिलेने यापूर्वी केलेल्या कामगिरीची आठवण करून दिल्यास वावगे ठरणार नाही. ते म्हणजे, 2012 साली लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने कांस्यपदक जिंकले होते. ती दुर्दैवाने टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकली नाही. मात्र तिने अनेक महिला खेळाडूंना प्रेरणा दिली आणि देशाचे नाव पदक मिळवून आंतरराष्ट्रीय पातळीवर नोंदवले होते. त्यापाठोपाठ भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कामगिरी करत देशभरात उत्साहाचे उधाण आणले. भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला 1-0 च्या फरकाने पराभूत केले आणि उपांत्य फेरीत धडक मारली. त्यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताच्या या चक दे इंडिया टीमने आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली. त्यानंतर उपांत्य फेरीत शिरकाव करण्यासाठीची किमया साधताना 41 वर्षांच्या इतिहासाला वळण दिले. या काळातील सर्वाधिक चमकदार कामगिरी प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये दाखवून दिली आहे. तीन वेळा विश्‍वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला पराभूत करण्याचा ऐतिहासिक पराक्रमही त्यांनी आपल्या नावावर नोंदवला असून एकंदर त्यांचा उपांत्यफेरीत झालेला प्रवेश सगळ्यांच्या भुवया उंचावणाराच ठरलेला आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचे उधाण आले आणि महिला हॉकी संघाच्या विजयाचा जल्लोष सोशल मिडियावर सुरू झाला. ट्वीटरवरील सर्वाधिक मोठे ट्रेेंंड या चक दे सामन्याच्या संदर्भातील होते. तसेच अन्य माध्यमांवरही या विजयाचा आनंद निनादत होता. या दरम्यान, भारतीय धावपटू दुती चंद हिच्याकडूनही पदकाच्या अपेक्षा असल्याने तिच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष लागले होते. मात्र या ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 200 मीटर शर्यतीत दुती चंद सातव्या स्थानावर आली आणि तिला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. तथापि, तिचा पराभव झाला तरी ती सातव्या स्थानावर येणे ही आशादायक गोष्ट आहे. आणि या पराजयाचाही आवर्जून उल्लेख करण्याचे कारण म्हणजे तरीही तिने या स्पर्धेत स्वत:साठी नवीन विक्रमाची नोंद केली आणि तिने स्वतःचाच विक्रम मोडीत काढला. ही तिची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी आहेच, शिवाय, आताची भारतीय धावपटूने केलेली ती सर्वोत्तम कामगिरी देखील आहे. रविवारी भारतीय पुरुष हॉकी संघानेही इंग्लंडवर 3-1 असा विजय मिळवत 49 वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली. आता या स्पर्धांत केवळ पदकाच्याच अपेक्षा निर्माण झालेल्या नसून सुवर्णाचीही आशा निर्माण झाली आहे. भारतीय स्त्रीशक्तीची वाटचाल सोनपावलांच्या दिशेने होवो, हीच शुभेच्छा!

Exit mobile version