राम आणि मोदींची पदवी

शिक्षणाचा आणि कर्तृत्वाचा संबंध नसतो. सरकार चालवण्यात तर नक्कीच नाही. श्रीकांत जिचकारांकडे अनेक पदव्या होत्या. ते एमडी डॉक्टर होते. एलएलएम व एमबीए होते. 28 पदवी परिक्षांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळवले होते. शिवाय आयएएसही पास होते. पण राजकारणात फार मजल मारू शकले नाहीत. याउलट, वसंतदादा पाटील. ते केवळ चौथी पास होते. पण सरकार कसे चालते हे त्यांना ठाऊक होते. साखर कारखाने, बँका यांची त्यांना इत्यंभूत माहिती होती. चांगले मुख्यमंत्री म्हणून लोक आजही त्यांचे नाव घेतात. आता राजकारण्यांच्या शिक्षणाचा स्तर वाढला आहे. बहुतेकांकडे किमान पदवी असतेच. शिवाय, पदवी मिळवणे हा भारतात काही फारसा कठीण प्रकार नाही. येता-जाता आणि अगदी स्वस्तात कोणालाही किमान बीएची पदवी नक्की मिळवता येते. आपले सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अलिकडपर्यंत पदवीधर नव्हते. मुख्यमंत्री उद्धव यांनी राष्ट्रवादीशी युती केल्यामुळे त्यांना संधी मिळाली. सगळा निधी आणि सगळी कामे अजितदादा आपल्याकडे घेऊ लागले. मंत्री शिंदे यांना मोकळा वेळच वेळ मिळाला. 2020 मध्ये त्यांनी मुक्त विद्यापीठाची परिक्षा दिली. त्यांना 77 टक्के गुण मिळाले. आता तर ते मानद डॉक्टर आहेत. सरकार कसे पाडावे या विषयाचे पीएचडी गाईड म्हणूनही ते काम करू शकतील. असो. त्यामुळे, राजकारणात सध्या सर्वांचे बाप ठरलेले नरेंद्र मोदी हे साधी पदवी मिळू शकणार नाहीत असे कोणीच म्हणणार नाही. अरविंद केजरीवाल यांनाही तशी शंका नसावी. राज्यशास्त्र या विषयात गेली सहा वर्षे दिल्लीत मोदी त्यांना रोज एक नवीन धडा देत आहेतच. म्हणूनच बहुदा चिडून जाऊन त्यांनी मोदींच्या पदवीचा कागद पाहायला मागितला आहे. त्यांना शंका आहे की तो अस्तित्वात नाही.
देशद्रोह कायदाच लावा
भारतात कागदाला महत्व आहेच. उदाहरणार्थ, तुमच्या पन्नास पिढ्या या देशात राहिल्या असतील. पण तरीही सरकार तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा मागू शकते. तसा कायदाच आला आहे. यासाठी आसाममध्ये अनेक लोक बंदिवासात गेले. यातले काही जण माजी राष्ट्रपती फक्रुद्दिन अली अहमद यांचे नातेवाईक होते. दुसरे काही जण एकेकाळी भारतीय सैन्यात होते. लढाया लढले होते. आता पेन्शनही घेत होते. पण त्यांच्याकडे कागद नव्हता. त्यांचे बापजादे मेल्यालासुध्दा अनेक वर्षे झाली होती. त्या मेलेल्यांचे जन्म प्रमाणपत्र सरकारला हवे होते. ते नसेल तर हे जिवंत असलेले बेकायदा नागरिक ठरत होते. सारांश कागदाला किती महत्व आहे हे मोदी सरकारनेच सर्वांना बजावले होते. मात्र तीच गोष्ट केजरीवाल यांनी खुद्द मोदींना लागू करणे हे गैर आहे. काही झाले तरी, मोदी हे विश्‍वगुरू आणि जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत हे विसरता कामा नये. आपण गुजरात आणि दिल्लीमधून बीए आणि एम ए राज्यशास्त्र अशा पदव्या घेतल्या आहेत असे मोदी म्हणतात. निवडणुकीसाठी उमेदवारी भरताना तसे त्यांनी लिहून दिले आहे. केजरीवाल त्याचा पुरावा मागत होते. गुजरातच्या उच्च न्यायालयाला ते आवडले नाही. त्यांनी केजरीवालांना 25 हजारांचा दंड ठोठावला. खरे तर मोदींवर अविश्‍वास दर्शवणे हा देशद्रोहाचा गुन्हा ठरवायला हवा. अजूनही सरकारला तसा अध्यादेश काढून तो पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करता येईल. अन्यथा, केजरीवाल हा मुद्दा वरच्या न्यायालयात नेऊन देशामध्ये गोंधळ माजवण्याचा धोका आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणे हा गंभीर गुन्हा आहे. त्याला राहुल गांधींइतकी किंवा जास्तदेखील शिक्षा होऊ शकते, असे म्हणतात. पण मोदींना राहुल यांच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न करणे हा नवाच दहशतवाद झाला. त्यामुळे केजरीवालांवर दहशतवादविरोधी कायदाही लागू करायला हवा.
श्रध्देचा सवाल!
गटारातून निर्माण होणार्‍या गॅसवर चहा तयार करता येईल असे नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते. गणपती हे पहिल्या प्लास्टिक सर्जरीचे उदाहरण आहे असेही ते म्हणाले होते. जागतिक तापमानवाढ असा काही प्रकार नाहीच असाही दावा एकदा त्यांनी केला होता. आपल्याकडच्या अतिशिकलेल्या लोकांना हे दावे मूर्खपणाचे वाटतात. केजरीवालही त्यांच्यातलेच एक. या स्वतःला शहाणे समजणार्‍यांचा अशा चमत्कारांवर विश्‍वास नसतो. खरे तर मोदींनी आता एक वैज्ञानिक मंडळ स्थापन करायला हवे. मोदींनी काहीही दावा केला तरी त्यामागे वैज्ञानिक सत्य कसे दडले आहे हे शोधून काढणे हे या मंडळाचे काम असायला हवे. गोमूत्रामध्ये आणि गायीच्या शेणामध्ये कसे गुणधर्म आहेत हे शोधून काढण्यासाठी रघुनाथ माशेलकर प्रयत्न करीत आहेत असे मध्यंतरी प्रसिध्द झाले होते. खरे तर माशेलकर यांना तो शोध लावण्यासाठी इतके दिवस का लागावेत हेच एक कोडे आहे. कारण या गुणधर्मांचं आपल्या शास्त्रपुराणांमध्ये आधीच वर्णन केलेले आहे. त्यांनी तेच उतरवून काढले तरी पुरले असते. असो.  दुसरे असे की, प्रत्येक चमत्कारामागचे विज्ञान दरवेळी लगेच कळेल असे नसते. उदाहरणार्थ अदानी हा अवघ्या चार वर्षात अंबानीला देखील मागे टाकून जगातला दुसर्‍या क्रमांकाचा श्रीमंत झाला हा चमत्कार या देशातील लोकांनी पाहिला आहे. तो कसा झाला हे अजून कोणालाही कळलेले नाही. राहुल गांधींसारखे अश्रद्ध लोक देशाबाहेरून अदानीच्या कंपनीत आलेल्या वीस हजार कोटी रुपयांचा हिशेब मागत आहेत. हे म्हणजे केजरीवालांनी मोदींच्या पदवीचा कागद मागण्यापेक्षाही वाईट आहे. अदानीच्या चमत्कारामागचे रहस्य कळले नाही म्हणून त्यामागे विज्ञान नाही असे कोण म्हणेल?  ते असणारच. अयोध्येत बाबरी मशीद होती तिथेच रामाचा जन्म झाला होता ही या देशातील कोट्यवधी लोकांची श्रध्दा होती. न्यायालयाच्या निकालातूनही शेवटी तिला मान्यता देण्यात आली. त्याचनुसार, मोदींकडे कागद असो वा नसो त्यांच्या पदवीवर या देशातील सर्व भक्तांची श्रद्धा आहे. गुजरात न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. विषय संपला.

Exit mobile version