अभिमानस्पद

एकीकडे राजकारणाचा चिखल झालेला असताना, एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोपबाजी चालू असताना आणि घोटाळेबाजांना सर्वोच्च नेते संरक्षण देत असतानाही या देशात आशा वाटावी अशाहीअनेक गोष्टी घडत असतात. तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे असे आरती प्रभूंनी आपल्या कवितेत म्हटले होते. तसेच आश्‍चर्य वाटावे अशी ही स्थिती असते. सच्च्या ध्येयाने आणि नव्या संशोधनाच्या उर्मीने भारलेले लोक आजूबाजूच्या स्थितीची पर्वा न करता आपले काम चालू ठेवत असतात. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने रविवारी केलेली कामगिरी ही याचेच द्योतक आहे. उपग्रह अंतराळात नेऊन सोडल्यावर सुखरूप माघारी परतणारे व पुन्हा पुन्हा वापरता येईल असे  यान किंवा वाहन तयार करण्यात इस्त्रोला आता यश आले आहे. अमेरिकेच्या नासासारख्या अगदी मोजक्या संस्थांकडे याबाबतचे तंत्रज्ञान आहे. आता हे तंत्रज्ञान इस्त्रोतील वैज्ञानिकांनीही आत्मसात केले असून त्याआधारे केलेल्या वाहनाची यशस्वी चाचणी रविवारी घेण्यात आली. अंतराळामध्ये संशोधनासाठी छोटे-मोठे उपग्रह पाठवण्यात इस्त्रो आता जगात अव्वल आहे. अगदी युरोपीय व अमेरिकी कंपन्या वा सरकारेदेखील इस्त्रोकडे ही कामगिरी अनेकदा विश्‍वासाने सोपवताना दिसतात. दिवाळीत जशी रॉकेटची वात पेटवली ते वर उडते तेच तंत्रज्ञान या उपग्रह प्रक्षेपणात वापरले जात असते. कारण, गुरुत्वाकर्षणावर मात करून आकाशाच्या दिशेने कोणतीही गोष्ट फेकण्यासाठी बल लावावे लागत असते. महत्वाचा फरक असा की दिवाळीतील रॉकेट कोणत्या दिशेने जाईल हे सांगता येत नसते. याउलट उपग्रह प्रक्षेपण हे ठराविक दिशेने व अवकाशात ठराविक ठिकाणी जाणे अपेक्षित असते. त्यात एका अंशाचीही चूक होऊन चालत नाही. दुसरे म्हणजे अग्निबाणाच्या साह्याने यान आणि उपग्रह हे अवकाशात फेकले जातात. मात्र गुरुत्वाकर्षण पार करून वरच्या अंतराळात जाताना प्रचंड घर्षण होते व उर्जाही लागते. हे यान पुन्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत परतणार असेल तर तिथेही पुन्हा हीच प्रक्रिया होते. त्यात लागणारी उर्जा व त्यासाठीचे तंत्रज्ञान यांचे समीकरण बसवणे आजवर आपल्या संशोधकांना शक्य झाले नव्हते. अगदी नासा किंवा रशियन संस्थांनाही ते सहजासहजी जमले नव्हते. त्यासाठीच्या प्रयोगादरम्यान शेकडो याने हवेत जळून गेली होती. आता भारतानेही हे तंत्र अवगत केले आहे. कोणत्याही उपग्रह प्रक्षेपणामध्ये ऐंशी टक्के खर्च हा त्याच्या यानावरच होत असतो. आता पुन्हा पुन्हा इंधन भरून वापरता येणारे यान उपलब्ध असल्याने इस्त्रोच्या या खर्चात मोठी बचत होणार आहे. आज मोबाईल आणि इंटरनेट तंत्रज्ञानात दळणवळण उपग्रह कळीची भूमिका अदा करतात. या व्यवसायात आपली इस्त्रो ही संस्था जगात अग्रणी मानली जाणं ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. रविवारच्या चाचणीसाठीचे यान चिनूक या हेलिकॉप्टरमधून पृथ्वीपासून साडेचार किलोमीटर उंचावरच्या अवकाशात यान सोडण्यात आले व तेच यान नंतर विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट वेगाने येईल याची तजवीज करावी लागली. हे फार मोठे यश आहे.

Exit mobile version