आपल्याला बदल घडवायचा आहे हा एक जादूचा मंत्र आहे. जगभरातले राजकारणी तो सतत वापरत असतात. नव्याने किंवा पुन्हा सत्तेत येण्यासाठी तो फार उपयुक्त ठरतो. गृहित असं असतं की, बदल वर्तमानात किंवा भविष्यात होईल. म्हणजे महागाई किंवा बेकारी कमी होईल इत्यादी. पण भाजपने क्रांती चालवली आहे. नरेंद्र मोदींचे सरकार प्रचंड वेगाने भारताचा भूतकाळ बदलत आहे. या वेगाने, येत्या दहा वर्षात गेली किमान पाचशे वर्षे आरपार बदलून जातील. गेल्या पन्नास वर्षात जे शाळा शिकले त्यांना आपलाच हा इतिहास कदाचित नव्याने शिकावा लागेल. एनसीईआरटी ही शाळा-कॉलेजांसाठी पाठ्यपुस्तके तयार करणारी संस्था आहे. सीबीएसई किंवा तत्सम अभ्यासक्रमांमध्ये ती प्रामुख्याने वापरली जातात. अठरा राज्यांमधील पाच कोटी विद्यार्थी त्यांचा अभ्यास करतात. याखेरीज केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी संदर्भ म्हणून हीच पुस्तके वाचली जातात. सारांश त्यांचा परिणाम मोठा आहे. एनसीईआरटीने आजवर मोठी प्रतिष्ठा कमावलेली आहे. ती याकामी लावली जात आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादींच्या पुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात येत आहेत. गेल्या सहा वर्षांमध्ये तीन वेळा असे बदल झाले. ताज्या बदलांमध्ये मुघल साम्राज्याबाबतची माहिती अगदी त्रोटक करून टाकण्यात आली आहे. शिवाय, महात्मा गांधी यांचा खून एका हिंदू माथेफिरूने केला आणि त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली इत्यादी माहिती काढून टाकण्यात आली आहे. हा देश मुख्यतः हिंदूंचा आहे असे भाजपला ठसवायचे आहे. त्यासाठी हिंदूंच्या पराक्रमाची एकसलग गोष्ट उभी करण्याचा हा सर्व प्रयत्न आहे. रामायणात ऋषींच्या यज्ञात अडथळे आणणार्या तथाकथित राक्षसांना राम-लक्ष्मणांसारखे लोक ठार करीत असत. त्याचप्रमाणे हिंदूंची एकसलग गोष्ट तयार करण्याच्या या यज्ञात आडवे येणार्या त्रासदायक तपशीलांना मारून टाकले जात आहे.
इतिहासाचे पाडकाम
अयोध्येतील बाबरी मशीद 1992 मध्ये पाडण्यात आली. हे प्रकरण न्यायालयाकडे सोपवण्यात आले. न्यायमूर्तींनी लोकांच्या श्रध्देला मान दिला. आता तिथे भव्य राममंदिर उभे राहणार आहे. आता त्याच ठिकाणी रामाचा जन्म झाला होता, तेथे एक भव्य मंदिर होते, आक्रमकांनी ते पाडले होते, भाजपने ते पुन्हा उभारले हा घटनाक्रम यापुढे इतिहासाच्या पानांमध्ये कोरला गेला आहे. प्रत्येक वेळी मशिद पाडणे शक्य नसते. तशी गरजही नसते. त्यामुळे सध्या इतिहासाच्या पुस्तकांची पाने पाडली किंवा खरे तर फाडली जात आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात सर्वात प्रथम याची सुरुवात करण्यात आली. मुस्लिम राज्यकर्ते म्हणजे मध्ययुगीन रानटी आक्रमक असल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्यापूर्वीच्या हिंदू राजांचा अत्यंत गौरवशाली इतिहास या आक्रमकांनी नष्ट केला असेही भासवण्यात आले. मनमोहनसिंग सरकारने ही पुस्तके तात्काळ रद्द केली होती. मोदी सरकारच्या काळात मात्र अधिक पद्धतशीर योजना आखण्यात आली. 2017 मध्ये जुन्या पाठ्यपुस्तकांचा आढावा घेऊन अलिकडच्या काही घटना त्यांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत असे सांगितले गेले. त्यानुसार, जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे ऐतिहासिक म्हणून वर्णन करून ते पुस्तकात घेतले गेले. मात्र त्याच वेळी हजारो बारीकसारीक बदल करण्यात आले. प्राचीन काळात ऋषीमुनींकडे प्रचंड ज्ञान होते ही कल्पना पुढे रेटण्याचा मुख्यतः प्रयत्न केला गेला. 2018 मध्ये प्रकाश जावडेकरांनी मुलांच्या पाठीवरचे ओझे आम्हाला कमी करायचे आहे असे जाहीर केले. त्यांना तर पन्नास टक्के अभ्यासक्रम कमी करायचा होता. पण ते शक्य नसल्याचे नंतर लक्षात आले. तरीही या नावाखाली जातिव्यवस्थेचे उल्लेख असलेल्या गोष्टी काढून टाकण्यात आल्या. पुरातन काळात स्त्रियांना व शूद्रांना संस्कृत शिकण्याचा वा वेद पठण करण्याचा अधिकार नव्हता असे उल्लेखही कटाक्षाने काढून टाकण्यात आले होते.
प्लास्टिक सर्जरी
आता त्याचे पुढचे पाऊल उचलण्यात आले आहे. मुघल राजांवर भाजपचा विशेष राग आहे. दिल्लीसह उत्तर भारतावर प्रदीर्घ काळ मुघलांचे राज्य होते. मुळात त्यांचे पूर्वज बाहेरून आलेले होते हे खरे असले तरी अकबर, शहाजहान, औरंगजेब इत्यादी इथेच वावरले आणि इथेच मरण पावले. त्यांनी अनेक चांगल्या वाईट गोष्टी केल्या. यापैकी काही कालखंडात हिंदूंना दुय्यम वागणूक मिळाली हे खरे आहे. मात्र त्याच वेळी राजपुतांसारखे अनेक हिंदू सरदार हे त्या त्या राजांच्या विशेष मर्जीतले होते हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे मुस्लिमांनी हिंदूंवर केलेले आक्रमण अशा रीतीने त्याचे सरसकट वर्णन हे गफलतीचे ठरते. पण भाजपला हे मान्य नाही आणि सोईचे नाही. त्यांना मुस्लिमांच्या कबजातून हिंदू भाजपने इतिहास सोडवला आणि भारताला हिंदूराष्ट्र म्हणून प्रस्थापित केले अशी भविष्यात आपल्या नावाची नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी ही मोडतोड आरंभली आहे. आज याविरुध्द लोक थोडाफार आवाज उठवतील. पण देशातील 95 टक्के जनता या टीकाकारांचे ऐकणार नाही यावर भाजपचा भरवसा आहे. उद्याच्या पिढ्या तर भाजपकृत इतिहास वाचून आणि त्याच रीतीने व्हॉट्सॅप संदेश एकमेकांना पाठवूनच मोठ्या होतील हे त्यांना स्वच्छ दिसते आहे. त्यामुळे टीकाकारांची पर्वा करणे भाजपने थांबवले आहे. भूतकाळावरची ही प्लास्टिक सर्जरी काहीही करून तडीला नेण्याचे त्यांचे मनसुबे दिसतात. मुस्लिम राज्यकर्ते आणि त्यांचे अत्याचार यांची जुनी भुते नाचवून आजवर त्या पक्षाने आपला मतदार वाढवला. आता त्या जागी सोज्वळ आणि साळसूद भुते प्रस्थापित करण्याची शस्त्रक्रिया चालू झाली आहे. शेतकरी वा कष्टकर्यांची आंदोलने, कोरोना टाळेबंदीच्या काळातील हजारो किलोमीटरची पायपीट, शेकडो लोकांचे ऑक्सिजनअभावी मृत्यू, नोटबंदीमुळे लागलेली वाट इत्यादी डोळ्यादेखत घडलेल्या गोष्टी माध्यमांच्या बातम्या आणि वर्तमान संदर्भांमधून वगळून दाखवण्याचे काम भाजपने करून दाखवले आहेच. पण जुन्याची भुते खरेच अशी गाडली जाऊ शकतात?