‘मराठी बाणा’च तारेल

इंग्रजांच्या काळात मोठमोठे प्रांत होते. मुंबई नावाचा प्रांत कराची ते हुबळी असा पसरलेला होता. भाषेनुसार स्वतंत्र राज्यं असायला हवीत ही कल्पना काँग्रेसचीच. तसा ठराव झाला होता. पण 1947 ला स्वातंत्र्य मिळताना फाळणी झाली. हिंदू विरुद्ध मुस्लिम दंगे झाले. हैदराबाद सामील करायला लढाई करावी लागली. पंडित नेहरू व बाकीचे नेते चिंतेत पडले. भाषेनुसार राज्ये केली तर नवीन वाद आणि भानगडी होतील असं त्यांना वाटलं. निर्णय होईना. मग आंदोलनं सुरू झाली. पोट्टी श्रीरामलु यांचा उपोषण करताना मृत्यू झाला. आंध्र प्रदेश वेगळा करावा लागला. महाराष्ट्रात चळवळ झाली. 1960 मध्ये स्वतंत्र राज्य झालं. ते मराठी भाषेचं होतं. तसंच कष्टकर्‍यांचंही होतं. एक मे कामगारदिनी महाराष्ट्राचा स्थापना होण्याला असा अर्थ होता. मुंबई हा मुख्य भांडणमुद्दा होता. टाटा-बिर्ला किंवा तेव्हाचे गिरणी मालक यांनी नव्हे, तर कामगारांनी मुंबई उभी केली आहे असा आग्रह होता. मालकांना वाटत होतं की, स्वतंत्र राहिली तर मुंबई आपल्या हातात राहील. मराठी लोकांनी ते हाणून पाडलं. गेली 63 वर्षे मुंबई महाराष्ट्रात आहे. पण म्हणून मुंबईवर मराठी लोकांचं खरंच राज्य आहे काय? याचं उत्तर नाही असंच आहे. मुंबईत आता जेमतेम 25 टक्क्यांच्या आतबाहेर मराठी माणसे उरली आहेत. गुजराती, उत्तर भारतीय यांचा वरचष्मा वाढला आहे. हिंदी ही मुंबईची पूर्वापार बोलीभाषा आहे. शेअर बाजार आणि कपडा मार्केट, दवा बाजार, लोखंड बाजार इत्यादी ठोक बाजारांमध्ये गुजरातीच चालते. बड्या कंपन्या वगैरेंमध्ये इंग्रजी होती. आता तिचं प्रमाण वाढलं आहे. पोलीस, महापालिका आणि मंत्रालय या ठिकाणचे कारकून मराठी आहेत. पण सर्व वरिष्ठ अधिकारी बहुतांश हिंदी इत्यादी आहेत. मुंबई ही नावाला महाराष्ट्रात आहे. मुंबईत महाराष्ट्र तितकाच- म्हणजे नावालाच- शिल्लक उरला आहे.
मराठीची पीछेहाट
आणखी बारा वर्षांनी संयुक्त महाराष्ट्राला 75 वर्षे होतील. तेव्हा पंचवीस वर्षांच्या मुलामुलींची जी पिढी असेल ती 2010 ला जन्माला आलेली असेल. इसवी सन दोन हजारमध्ये जन्माला आलेले तेव्हा 35चे असतील. शक्यता अशी असेल की, ही बहुतांश मुले इंग्रजी माध्यमात शिकलेली असतील. आज रायगडचेच उदाहरण घेतले तरी कर्जतपासून ते अगदी पोलादपूरपर्यंतच्या खेड्यापाड्यातल्या शक्य तितक्या पालकांना आपल्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालायचे आहे. इंग्रजीचे शिक्षण घेणे ठीक आहे. पण वाईट असे आहे की, यामुळे बहुतेक मुले मराठीपासून दुरावत आहेत. त्यांच्यातली जी हुशार आहेत ती पुढे जाऊन इंग्रजीत व्यवहार करू लागणार आहेत. जी तितकीशी हुशार नाहीत त्यांची थोडी पंचाईत होईल. पण त्यांना मराठीपेक्षा हिंदी सोईची पडेल. लेखनवाचनाचा सराव नसल्याने त्यांची मराठी भाषाही कच्ची राहील. ना धड इंग्रजी, ना मराठी अशी त्यांची अवस्था होईल. छोट्या मोठ्या उद्योग व व्यवसायांमुळे हिंदी भाषक लोक आजच खेड्यापाड्यात पोचले आहेत. मराठवाडा, विदर्भात तर हिंदी ही कधीच फार परकी नव्हती. आपल्या कोकणातही ते लोण पोचले आहे. आंब्याच्या धंद्यात नेपाळी लोकांचा मोठा वावर आहे. यांच्याशी सर्व संवाद हिंदीतूनच करावा लागतो. पुणे ही एकेकाळी सांस्कृतिक राजधानी होती. तिथेही हिंदीचा प्रभाव वाढतोय. दुकानदार, रिक्षावाले यांच्याशी हिंदीत बोलावं लागतंय. मराठी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील संख्या कमी होतेय. काही शाळांमध्ये इंग्रजी हेच माध्यम करावे लागले आहे. एकूणच सार्वजनिक स्तरावर बोलल्या जाणार्‍या मराठीची दुरवस्था होतेय. मराठी वृत्तवाहिन्या किंवा काही वृत्तपत्रे यांच्या भाषेवरून त्याचा अंदाज बांधता येतो. आणखी दहा वर्षांनी नवी पिढी येईल. तोवर ही स्थिती अधिकच वाईट होण्याची भीती आहे. आज खरं तर महाराष्ट्राच्या स्थापनेचा वाढदिवस. म्हणजेच मंगल दिवस. त्यामुळे वाईट सूर लावणे योग्य नाही. पण वस्तुस्थिती नजरेआड करून कसे चालेल?
चिकित्सकपणाची परंपरा
या वाईट स्थितीला एक चांगली किनार आहे. मराठी माणसामध्ये असलेली चिकित्सक वृत्ती. अनेकदा त्यातून तो सतत टीकाकाराच्या भूमिकेत राहतो. पण त्याचा एक चांगला परिणामही आहे. तो खुद्द मराठी समाजाचंही कठोर विश्‍लेषण करू शकतो. मराठीची, महाराष्ट्राची प्रगती खुंटते आहे हे त्याला इतर कोणी सांगण्याची गरज नाही. मराठी समाजात हे मंथन सतत चालू असते. आजही आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणारेही याच समाजातून पुढे येतील. आज देश ज्यांचे नाव घेतो ते शिवाजीमहाराज, महात्मा फुले, आंबेडकर याच भूमीतून उत्पन्न झाले. या महापुरुषांचं वैशिष्ट्यं असं की, त्यांनी मराठी समाजाचीच कठोर चिकित्सा केली व त्यातूनच मार्ग काढला. सावरकरांचे तत्वज्ञान न पटणारे आहे. पण त्यांचेही ते वैशिष्ट्य होते. त्यांनी स्वतःच्याच समाजाचे दोष निर्ममपणे दाखवले. आज गायीच्या मुद्द्यावरून उत्तर हिंदुस्थानात काही टोळ्या हैदोस घालत आहेत. त्यांना कडक असं उत्तर सावरकरांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी देऊन ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, गाय हा उपयुक्त पशू आहे असं बंगाल किंवा पंजाबातल्या कोणाही महापुरुषाने म्हटल्याचे दाखले नाहीत. सारांश आत्मपरीक्षणाची मराठी परंपरा मोठी आहे. या सर्वांचे आद्य म्हणजे तुकाराम. निंदकाचे घर असावे शेजारी, असे ते म्हणाले खरे. पण ते तर स्वतःच उत्तम निंदक होते. का, का म्हणून, कशावरून असे मराठी माणसाचे आवडते प्रश्‍न आहेत. हे प्रश्‍न आहेत तोवर महाराष्ट्राला भीती नाही असं म्हणायला हवं. मराठीची सध्या पीछेहाट झाल्यासारखी वाटते आहे. पण दुसरीकडे मराठी पुस्तकांचा, त्यातही गंभीर पुस्तकांचा प्रसार वाढतो आहे. ही पुस्तके वाचणारे संख्येने फार नसतील. पण यांच्यातूनच पुढचे चांगले चिकित्सक आणि मराठी भाषेसह महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे तरुण निपजतील. भाषेला अभिजातपणाचा सरकारी दर्जा मिळो की न मिळो, मराठी लोकांचा अभिजात लढाऊपणा कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.

Exit mobile version