सध्या टोकियो येथे सुरू असलेल्या विविध क्रीडास्पर्धांच्या अंतिम फेर्या सुरू असून त्यात अनेक विभागात भारत ऐतिहासिक कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुळे सगळे वातावरण खेळांच्या बातम्यांनी भरलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा आपल्या आवडीच्या खेळाकडे वळले आहेत. तो म्हणजे आधीच्याच गोष्टींना नवीन नाव देण्याचा खेळ. एका बाजूला गेल्या सत्तर वर्षात काही घडले नाही असे सांगत फिरायचे आणि स्वतः एका काडीचीही निर्मिती न करता जुन्या गोष्टींना नवीन नाव देण्याची तेवढी खेळी करायची, एवढ्यावरती मोदी यांची मदार आहे. आता ऑलिंपिक खेळ सुरू असताना आणि विविध क्षेत्रातील खेळाडू नवीन इतिहास निर्माण करत असताना सगळे लक्ष त्या खेळाकडे आणि खेळाडूंकडे गेल्याने आत्मप्रतिमा प्रेमात मग्न नरेंद्र मोदी यांची झोप उडाली नसती तरच नवल! त्यामुळे पुन्हा एकदा या प्रसिद्धीच्या वाहत्या गंगेत आपलाही चेहरा तजेलदार करून घ्यावा या हेतूने सगळे लक्ष स्वतःकडे वळवण्यासाठी याआधी दिल्या जाणार्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे केल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यासंदर्भात ट्वीट करताना पंतप्रधान मोदी यांनी असे म्हटले आहे की, त्यांना अनेक दिवसांपासून, असंख्य नागरिकांच्या वतीने खेळ रत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्याची विनंती होत होती. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर ठेवून त्यांनी सदर पुरस्काराला ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे नामकरण केले आहे. त्यांचे हे कृत्य ऐकून त्यांच्या विरोधकांच्या मनातही त्यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण नाही झाली तरच आश्चर्य. कारण मोदी कुणाचेही ऐकत नाहीत आणि कुणाच्याही विनंत्या वगैरे त्यांना मान्य होत नाहीत, असे त्यांच्याबद्दल त्यांच्या शत्रूकडून अफवा निर्माण करण्यात आली आहे. पण हा निव्वळ अपप्रचार आहे, हे आता लक्षात येते. मात्र काही जण शंका व्यक्त करीत असले तरी त्यांनी जनतेच्या भावनांचा आदर करून ही विनंती तात्काळ मान्य केलेली असल्यामुळे आता जनता अनेक दिवस मागणी करत असलेल्या अन्य विनंत्या अर्जांकडेही ते तितक्याच सहानभूतीपूर्वक आणि प्राधान्यक्रमाने लक्ष देतील अशी अपेक्षा आहे. उदाहरणार्थ पेट्रोलचे भाव कमी करणे, नफ्यातील सरकारी उद्योग खाजगी उद्योगांच्या घशात न घालणे, लसीकरण प्रमाणपत्रावरून त्यांचे छायाचित्र हटवणे किंवा एकंदरच सगळीकडे त्यांच्या प्रतिमेचा जो अतिरेक झालेला आहे तो थांबवणे, देशात त्यांनी घडवून आणलेला विकास आता लोकांना सहन होत नसल्याने त्यांनी देशहितासाठी सत्तेवरून पायउतार होणे, आदी गोष्टींसाठी जनतेकडून वारंवार विनवण्या केल्या जात असल्यामुळे त्याचाही ते लवकरच स्वीकार करतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. अगदी त्यांनी स्वत:चे नाव स्टेडियमला दिले, तेही ते नक्कीच हटवतील. मोदी कोणताही निर्णय घेत असताना ते फक्त आपल्या अंतरात्म्याचा विचार करतात; आपल्या मनाचा विचार करतात; त्यांना कुठल्याही तज्ज्ञांशी चर्चा करायची गरज वाटत नाही की कोणाचे मत घ्यावेसे वाटत नाही. इतकेच कशाला, त्यांना काय वस्तुस्थिती आहे हे सुद्धा जाणून घ्यायची गरज नसते. त्यांना रस असतो तो निवडणुकीत आणि आपली प्रतिमा उंचावण्यात. ध्यानचंद हे उत्तर प्रदेशचे आणि आता निर्णायक निवडणुका तेथेच आहेत. मेजर ध्यानचंद यांच्या नावे आधीच एक पुरस्कार दिला जातो हे तपासून घेण्याची त्यांना गरज त्यामुळेच भासली नाही. अन्यथा, ध्यानचंद यांच्या नावाने खेळाडूंना जीवनगौरव पुरस्कार दिला जातो व पुरस्कार 2016 साली म्हणजे त्यांच्या कार्यकाळातच सुरू झालेला होता, हेही त्यांच्या नजरेतून सुटले नसते. त्यामुळे आता गंमत अशी झाली आहे की ध्यानचंद यांच्या नावाने दोन पुरस्कार दिले जाणार आहेत. त्यामुळे जो काही गोंधळ झाला त्याची त्यांना फिकीर करायचे कारण नाही. कारण टीकाकार त्यांच्यावर टीका करतच असतात आणि ते कधीही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहात नाहीत. आपला हेतू साध्य झाला आणि ज्या काँग्रेस पक्षाचा ते द्वेष करतात, त्या पक्षाचे एक अत्यंत कर्तृत्ववान अन् द्रष्टे पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव एका पुरस्कारावरून हटले, याचा आनंद त्यापेक्षा कैक पटीने अधिक आहे.
पुन्हा नामांतराचा खेळ

- Categories: संपादकीय, संपादकीय
- Tags: alibagmarathi newsmarathi newspaperraigad
Related Content
दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी - भाग 1
by
Antara Parange
July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
by
Antara Parange
April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
by
Antara Parange
March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
by
Antara Parange
March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
by
Antara Parange
March 8, 2025