चित्ते परत पाठवा

देशात पूर्वी चित्त्यांची संख्या बरीच होती. अनेक संस्थानिकांनी व राजांनी चित्ते पाळलेले होते. शिकारीसाठी त्यांचा उपयोग होई. आपल्या शाहू महाराजांकडेही असे पाळलेले व शिकवलेले चित्ते होते. पण हेच चित्ते शिकारींना बळी पडले. ब्रिटिश अधिकारी व संस्थानिक मंडळी यांनी बेगुमानपणे केलेल्या शिकारींमुळे वाघ, चित्ते यांची संख्या कमी झाली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीच दिवसात देशात एकही चित्ता शिल्लक राहिला नाही. मधल्या काळात खास प्रकल्प राबवून अभयारण्य निर्माण झाली. त्यातून वाघांची संख्या वाढली. पण चित्त्यांची उणीव कायम होती. गेल्या 75 वर्षात अमुक झाले नाही ते मी केले असे सांगायला पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडते. त्यांनी भारतात चित्ते आणण्याचे ठरवले. नामिबिया या आफ्रिकेतील देशामधून वीस चित्ते आणून मध्य प्रदेशातील कुनो जंगलात सोडण्यात आले. आधी त्यांना इथल्या वातावरणाची सवय करण्यात आली. मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने जंगलात सोडले गेले. पण या चित्त्यांना भारत बहुदा मानवत नाही अशी शंका निर्माण झाली आहे. आतापर्यंत पाच चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. जुलैमध्येच दोन चित्ते मेले. या चित्त्यांना चार बछडे झाले होते. त्यातले तीन पुरेसे पाणी नसल्याने मेले. बाकीच्यांच्या मरणांच्या कारणांचा तपास चालू आहे. पण बहुतेक जण अगदी अशक्त झाले होते. काही जण किडनीच्या विकाराने मेले. अधिकारी मंडळी याबाबत एकदम सरकारी छापाचे उत्तर देतात. चित्ते आणले तेव्हाच त्यातले पन्नास टक्के मरू शकतात हे गृहित होते. आतापर्यंतचा मृत्यूदर पंचवीस टक्केच राहिला आहे. मरणाच्या बाबतीत टक्केवारी कमी असल्याची सफाई देणारी जमात ही फक्त सरकारी बाबूंचीच असू शकते. पर्यावरणतज्ज्ञांनी या प्रकल्पाला आधीपासून विरोध केला होता. चित्ते प्रचंड वेगाने पळतात. एका चित्त्याच्या निरोगी आणि निर्भय वावरासाठी सरासरी सोळाशे चौरस किलोमीटरचा परिसर लागतो. तरच त्यांची संख्याही वाढू शकते. नामिबियात चित्त्यांची संख्या जास्त झाली आहे. तरीही तिथे शंभर चौरस किलोमीटरमध्ये एक चित्ता असे प्रमाण आहे. याउलट कुनो जंगलांचा सर्व परिसर केवल साडेसातशे चौरस किलोमीटर आहे. तिथे वीस चित्त्यांना सोडणे म्हणजे वीस माणसांना हजार चौरस फुटांच्या फ्लॅटमध्ये कोंबण्यासारखेच आहे. या चित्त्यांना पुरेशा प्रमाणात भक्ष्य उपलब्ध होऊ शकत नाही. शिवाय, त्यांना पुरेसा एकटेपणाही मिळत नाही. वाघ किंवा चित्त्यासारख्या प्राण्यांना तो अत्यंत गरजेचा असतो. या चित्त्यांच्या मानेला एक कॉलर आयडी बांधण्यात आला होता. त्यावरून त्यांचा वावर कोठे व कसा आहे याचा मागोवा घेता येतो. पण अतिपाऊस आणि कॉलर आयडीमुळे झालेल्या जखमेद्वारा संसर्ग होऊन यातले दोन चित्ते मेले असा संशय आहे. हे सर्व प्रकार पाहता हा प्रकल्प बंद करणेच इष्ट होईल. मोदींच्या प्रतिष्ठेपायी आणखी चित्त्यांचा बळी देत राहणे योग्य नाही.  

Exit mobile version