कोरोना दिलासा

देशभरातील विविध घडामोडींमध्ये काहीशी मागे पडलेली कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्याचे कारण अलिकडे झालेला रुग्णसंख्येतील बदल. ही रुग्णसंख्या कमालीची घटली आहे. दुसरी लाट सुरू झाल्यापासूनच्या गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक कमी रुग्णांची नोंद दोन दिवसांपूर्वी झाली. तथापि एक दोन दिवसांत त्यामध्ये किरकोळ वाढ दिसत आहे. त्यामुळे सातत्याने चर्चा झालेल्या या तिसर्‍या लाटेची भीती लोकांच्या मनात आहे. ही अलिकडची वाढ अगदी किरकोळ असून बहुतेक ठिकाणी ही संख्या नियंत्रणात आणि निम्न पातळीवर आहे. त्यामुळे हे गेल्या काही दिवसात दिसून आलेली किरकोळ वाढ लक्ष वेधून घेत असली तरी त्यातून तिसर्‍या लाटेला सुरुवात झालेली नाही, हे नक्की आहे. हे सांगणे आवश्यक आहे कारण तिसर्‍या लाटेची ही सुरुवात झाली नाही ना, अशी भीती अनेकांच्या मनात अनेक दिवसांपासून आहे. त्यामुळेच या बाबतीत या क्षेत्रातील तज्ज्ञ वैज्ञानिकांनी दिलासादायक माहिती दिली आहे, त्याचे वृत्त सगळ्यांनी वाचायला हवे. सर्वप्रथम त्याबाबतीत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी, कधी आणि खरोखरच तिसरी लाट येईलच याबद्दल निश्‍चितपणे सांगण्याससाठी कोणताही ठोस पुरावा नाही, असे म्हटले आहे. कोरोनाच्या साथीचा हा विषाणू सातत्याने विविध लोकांच्या समूहांमध्ये जात असल्याने त्यातून हे रुग्ण निर्माण होत आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, दुसर्‍या लाटेसारखी तिसरी लाट येईल, असे त्यांना व्यक्तिशः पटत नाही. कारण रुग्णसंख्येचा आकडा 35 ते 40 हजारांवर गेले अनेक आठवडे तसाच सपाट आहे. या क्षेत्रातील दुसरी एक तज्ज्ञ संस्था म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड बायोलॉजी. त्याचे संचालक अगरवाल यांनी म्हटले आहे की, तिसरी लाट अद्याप आलेली नाही आणि सध्या किरकोळ दिसते ती दुसर्‍या लाटेचाच भाग असलेली वाढ आहे. त्याचे कारण असे की दुसर्‍या लाटेतीलच विषाणू विविध लोकसमूहांपर्यंत पोहोचत आहेत आणि ते नवे रुग्ण निर्माण करत आहे. त्यामुळे तिसरी लाट आली असे आपण काही म्हणू शकत नाही. त्याबद्दलचे निर्णायक व दिलासादायक मत अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे संचालक रणजीत गुलेरीया यांनी दोन दिवसांपूर्वी दिले. ते म्हणजे, भारतामध्ये कदाचित तिसरी लाट येणारच नाही आणि ती आली तर बहुतेक लोकांच्या दुर्व्यवहारामुळेच येईल. अन्यथा नवीन लाट येण्याचे सध्यातरी काही कारण नाही. आणि जर ती आलीच तरी ती दुसर्‍या लाटेइतकी भीषण नसणार. या क्षेत्रातील एक ज्येष्ठ विषाणूतज्ज्ञ प्रोफेसर गगनदीप कांग यांनी सांगितले की, तिसर्‍या लाटेबद्दल आपण निश्‍चितपणे काही सांगू शकत नाही; तथापि, दुसरी लाट जर डोंगर आहे तर तिसरी लाट टेकडी असेल. या तज्ज्ञांचा हा आत्मविश्‍वास म्हणजे कोरोनाचा धोका खूप प्रमाणात कमी झाला आहे, असे म्हणायला जागा आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण! स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विक्रमी लसीकरण झाले आणि सुमारे 88 लाख डोस देण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत पूर्ण अथवा अंशत: लसीकरण झालेल्यांची संख्या ही सुमारे 56 कोटींच्या घरात गेली आहे. त्याचबरोबर उद्योग क्षेत्राने आणि व्यवसायिकांनी अपापले व्यवसाय सुरळीत करण्याच्या हेतूने आपल्या कर्मचार्‍यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने करून घेतले आहे. त्यामुळे त्यांचे येणे जाणे सुरक्षित बनते आणि त्यातून नवीन रुग्ण निर्माण होण्याच्या धोका नसतोे. त्यांच्याकडून तो इतरांना होण्याची शक्यता खूप कमी झालेली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता तिसर्‍या लाटेची शक्यता खूप कमी आहे. तसेच, अगदी मुंबईसारख्या अत्यंत घनदाट लोकवस्ती असलेल्या शहरात देखील मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या खाली आली आहे. धोका केवळ नवीन व्हेरियंटचा असणार आहे. आणि विषाणूच्या बाजूने असे नवीन रूप धारण करणे आणि जुन्या रुपात पुन्हा एकत्र येणे हे चालत राहणार आहे आणि त्याचे प्रासंगिक साथ इतकेच स्वरूप असेल. त्यामुळे सध्या तरी तिसर्‍या लाटेचा खूप मोठा धोका संभवत नाही, हा दिलासा मिळाला आहे. परंतु त्यासाठी आपण हात धुणे, सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे आणि लसीकरण करून घेणे हेच ठळक मार्ग आपल्याला ती लाट आली तरी वाचवण्यासाठी आवश्यक आहेत, हे विसरता कामा नये.

Exit mobile version