अटक आणि आशीर्वाद

नुकतेच केंद्रीय मंत्रीपद लाभलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या अटकेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार यात शंका नाही. महाड येथे आपल्या जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांच्या कानाखाली वाजवली असती अशा प्रकारचे विधान केल्याने शिवसैनिक आक्रमक झाले. नारायण राणे मूळ शिवसेनेचेच. त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अपेक्षा असणारच. मात्र आता ते भारतीय जनता पक्षात आहेत. या पक्षाच्या आंदोलनाची पद्धत वेगळी. त्याच्याशी ते अद्याप समरस झालेले नाहीत. त्याची त्यांना गरजही नाही. कारण, राज्यात सत्ता गेल्याने सैरभैर झालेल्या आणि हतबलता अनुभवणार्‍या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेवर सातत्याने शिवसेनेच्याच पद्धतीने वार करणारा कुणीतरी नेता हवा होता. तो त्यांना नारायण राणे यांच्या रुपाने सापडला. मात्र नारायण राणे हे एकदम तळागाळातून वरपर्यंत येऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत गेलेले, प्रशासनाचा उत्तम अभ्यास असलेले नेते म्हणून एकेकाळी त्यांना आदराचे स्थान होते. त्यांची राडेबाजीची पार्श्‍वभूमी माहीत असूनही त्यांनी आपली प्रतिमा बदलली होती. अर्थात त्यांनी भूषवलेल्या मुख्यमंत्रीपदाचाही त्यामध्ये समावेश होता. परंतु आता त्यांनी ज्या पक्षात आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलिन केला, त्याच्यात आपण राजापेक्षा राजनिष्ठ बनण्याची हौस त्यांना आता अडचणीत आणत आहे. त्यांचा जीभेवर नियंत्रण नसल्याचा स्वभावदोष याआधीही त्यांना अनेकदा अडचणीत घेऊन गेला आहे. ते शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची आशा असताना अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी पक्षश्रेष्ठींवर केलेली टीका सुसंस्कृत अजिबात नव्हती. त्यामुळे तो त्यांच्या स्वभावातला दोष त्यांना सार्वजनिक जीवनात दूर करता आलेला नाही असे दिसते. एवढ्या ज्येष्ठ पदावर पोचल्यानंतर, मुख्यमंत्रीपदाला उद्देशून बोलताना किंवा स्वतः केंद्रीय मंत्री असल्याचे भान ठेवत अशा प्रकारची भाषा वापरणे गैर असते, याचे आता नारायण राणे यांना भान राहिलेले नाही हे खरे. हा सगळा प्रकार जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने घडलेला आहे. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करता, अशा प्रकारच्या वर्तनाने जनता काय प्रकारचा आशीर्वाद देणार आहे? याचा साधा विचार केला गेला नाही. अर्थात आता जे घडले, त्यामध्ये नारायण राणे यांचा फायदा आहे. कारण ते रस्त्यावर उतरून शिवसेनेच्या विरोधात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना अटक झाली, म्हणजे ते हिरो झाले. केंद्रात ज्या हेतूने त्यांना घेण्यात आले, तो सफल झाला. त्याचा फायदा शिवसेनेला आपली मते एकत्र करण्यासाठी होईल, जी लवकरच येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी हवी आहेत. तसे शिवसैनिकांना ‘तयार’ करण्याच्या हेतूनेही त्यांना एक चांगली संधी मिळालेली आहे. कारण अस्वस्थता, समस्या याने ग्रासलेल्यांना एकत्र आणण्यासाठी त्याचा फायदा होईल. यामध्ये भाजपची कोंडी झालेली आहे. नारायण राणे यांना पाठिंबा दिल्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्यांनी जे केले त्याचे समर्थन करता येत नाही. त्यामुळे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे गोलमोल बोलून वेळ मारून नेली आहे. भाजपला या जन आशीर्वाद यात्रेतून कोणत्या प्रकारचे आशीर्वाद मिळतील हे आता त्यांना कळून चुकले असेल. आता हा सगळा प्रकार अटकेच्या निर्णयाभोवती फिरेल आणि हे सुडाचे राजकारण आहे असे म्हटले जाईल. त्यामुळे, केंद्राकडूनही तशीच प्रतिकारवाई होईल. हा काही अटक करण्यासारखी गोष्ट आहे का, हा प्रश्‍नही ऐरणीवर येईल. म्हणजे इतक्या टोकाला जायला पाहिजे होते का असाही सवाल उठेल. मात्र या सगळ्यातून हे राजकीय पक्ष आपला फायदा घेत आहेत. यातून पुन्हा एकदा सगळे राजकारण आता एका हीन पातळीवर, अगदी मनोरंजनाच्या पातळीवर आले असून त्यातून केवळ सध्या जनता अनेक प्रकारच्या समस्यांशी झुंजत आहे, त्याकडे दुर्लक्ष करण्याचे निमित्त होईल यात शंका नाही. यामध्ये भाववाढ, दरवाढ, उखडलेले रस्ते, लोकांचे जाणारे जीव, अनेक वर्षे रखडलेले प्रकल्प, अनेक ठिकाणी होणारे भ्रष्टाचार या सगळ्यापासून काही काळ जनतेचे लक्ष विचलित करणे एवढेच यातून साध्य होईल. प्रत्येक पक्ष आपापला लाभ उठवेल, जनता मात्र या मनोरंजनाकडे, अटक बरोबर की चूक या चर्चेत अडकेल. कारण, त्याचा पराभव ठरलेलाच आहे.

Exit mobile version