दारे उघडली

कोरोनाचा सर्वांत मोठा फटका बसलेल्या महाराष्ट्रात सर्वाधिक कठोर निर्बंध लागू झाले होते. मात्र आता परिस्थिती निवळत आलेली असताना, अत्यंत सावधगिरीने आणि भीषण परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बंद ठेवण्यात आलेल्या राज्यातील शाळा, प्रार्थनास्थळे तसेच नाट्य व चित्रपटगृह येत्या महिन्यापासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा अर्थ आता नियम पाळून परिस्थिती पूर्वपदावर आल्याची भावना येत असलेल्या दसरा दिवाळीपासून अनुभवायला मिळणार आहे. त्यात शाळेला दिलेला अग्रक्रम ही अत्यंत आनंदाची बाब आहे. याआधी घेण्यात आलेला शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षकांसह शालेय कर्मचारी वर्गाचे लसीकरण पूर्ण न झाल्याने त्वरीत मागे घेण्यात आला होता. तेव्हापासून सुरू असलेला मुलांना पुन्हा शाळेत जायला कधी मिळणार, याबाबतच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची या निर्णयाला अखेर मंजुरी दिल्याने तसेच सर्व शिक्षक वर्गाचे लसीकरण पूर्ण झाल्याच्या पाश्‍वर्र्भूमीवर हा निर्णय पुन्हा बदलला जाणार नाही अशी अपेक्षा आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा करताना शाळेत जाण्यासाठी मुलांना कोणकोणत्या नियमांचे पालन करावे लागेल, हेही स्पष्ट केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग चार ऑक्टोबरपासून सुरू होतील. त्यासोबतच, शहरी भागात मात्र आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होतील. यासाठी टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने जारी केलेली नियमावली सर्व शाळा आणि विद्यार्थ्यांना लागू असेलच, शिवाय ती पालकांनाही लागू असणार आहे. राज्यातील कोरोनाविषयक सद्यस्थिती सकारात्मक कल दर्शवत आहे. दररोज कोरोनातून बरे होणार्‍यांची संख्या वाढताना दिसत आहे. अर्थात अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत आणि मृत्यू होणार्‍यांच्या संख्येतही भर पडत आहे. मात्र दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत कधी दिसते. कधी ती वाढलेली दिसली तरी राज्यातील रुग्णांचा रिकव्हरी रेट 97.23 टक्के आहे. त्या संदर्भातच राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे सात ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून भक्तांना ही सवलत मिळत असल्याने राज्य सरकारने चांगले औचित्य साधत, विरोधक आंदोलन करीत असलेला मुद्दा निकाली काढला आणि मोठा असंतोष टाळला असे म्हणता येईल. दुसर्‍या लाटेचा मुकाबला करून झाला. आता संभाव्य तिसर्‍या लाटेशी लढण्याची तयारीही झाली आहे. मात्र सर्व प्रकारची काळजी घेऊनच निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. रुग्णसंख्या घटत असली तरी अधिक सावधगिरी बाळगत पुढे जावे लागेल, असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या यासंदर्भातील कठोर भूमिकेवर अनेकदा टीका झाली परंतु त्यांनी परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत कोणतीही सवलत न देता टीकेचा सामना केला. आता अनुकूल टप्प्यात आल्याने आतापर्यंत बंद असलेली सगळी दारे हळुहळू उघडली जात आहेत. त्यातील अजून एक महत्त्वाचे दार म्हणजे राज्यभरातील चित्रपटगृहे व नाट्यगृहांचे. त्याचीही दारे 22 ऑक्टोबरपासून खुली करण्यास परवानगी दिली गेली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना राज्य सरकारने हॉटेल, दुकाने आदींसाठी असलेले निर्बंध बर्‍याच प्रमाणात शिथिल केले तरी नाट्यगृहे आणि चित्रपटगृह सुरु करण्यास परवानगी दिलेली नव्हती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या कलाकारांचे तसेच कर्मचार्‍यांवर कठीण परिस्थिती आली होती. आता त्यासाठी सुरक्षा पालनासाठी सविस्तर कार्य नियमावली पद्धती तयार करण्याचे काम सुरू असून ती येत्या आठवड्यात जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात मोठा धोका आहे शाळेत जाणार्‍या मुलांना. एका बाजूने त्यांची शाळा बंद असल्याने त्यांचे केवळ पुढचे शिक्षण रखडले नव्हते तर जे आतापर्यंत शिकले त्याचे विस्मरण होण्याचाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे प्रत्यक्षात दीड वर्षे शाळेतून लांब राहिले तरी त्यांचे तीन वर्षांहून अधिक काळचे नुकसान होत होते. मात्र त्याचबरोबर आता कोरोना संसर्गाचा धोका आहे. दाटीवाटीत भरणार्‍या वर्गात एखादे मूल पॉझिटीव्ह झाले तर वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. धार्मिक स्थळी, नाट्य, चित्रपटगृहात जाणारे प्रौढ असतात. ते काळजी घेऊ शकतात. त्यामुळे मुलांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी शाळा प्रशासनावर आलेली आहे.

Exit mobile version