एअर इंडिया पुन्हा टाटांकडे

टाटा उद्योग समुहाचे प्रतिभावंत प्रमुख जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये सुरू केलेली विमान कंपनी सुमारे 68 वर्षांच्या दीर्घ उड्डाणानंतर त्यांच्या हँगरमध्ये पुन्हा पार्क झाली आहे. सरकारची कंपनी म्हणून ओळखली जाणारी एअर इंडिया एकेकाळी महाराजांसारख्या आदर सत्काराबद्दल प्रसिद्ध होती. परंतु अलिकडे राजकारणी आणि प्रशासकीय यंत्रणेचे कुरण म्हणून कुख्यात झालेली ही कर्जबाजारी कंपनी आहे. ती टाटांनी संपूर्णपणे 18 हजार कोटी रुपयांना विकत घेतली. या विक्रीच्या घोषणेनंतर अनेक मीम आणि विनोद इंटरनेट, व्हॉट्सअपवर फिरू लागले ‘टाटा म्हणजे गुडबाय नव्हे,’ ‘घरवापसी’ इत्यादी. टाटांसाठी हा व्यवहार भावनिक होता. कारण 1953 मध्ये जेव्हा ही कंपनी सरकारने त्यांच्याकडून काढून घेतली व ती सरकारी मालकीची बनवली तेव्हा जेआरडी टाटा खूप दुखावले गेले होते. त्याच्याशी त्यांचे भावनिक नाते होते आणि अनेक वर्षे त्यांनी ते जपले होते. कारण 1932 मध्ये विमान पायलटचे पहिले लायसन्स घेतलेले, तरुण जेआरडी कराचीहून मुंबईला पहिले विमान उड्डाण स्वत: केले आणि भारतातील हवाई वाहतुकीच्या इतिहासाचा प्रारंभ झाला होता. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी दर तिसरा माणूस हा टाटा एअरलाईन्स मधून प्रवास करायचा त्यानंतर त्यांनी आधी टपालापासून सुरू केलेल्या या विमान सेवेचा विस्तार केला आणि त्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले. तेव्हा त्याची लोकप्रियता त्याच्या वक्तशीरपणामुळे होती. 99.4 टक्के वक्तशीरपणा त्यांनी साधला होता. ते प्रवाशांशी बोलत आणि छोट्या छोट्या सूचनांचीही अंमलबजावणी करत. अनेक मेन्यू त्यांनी ठरवले आणि बदलले होते. यातून त्यांचे भावनिक नाते सिद्ध होते. नेहरूंच्या काळात ती सरकारने ताब्यात घेतली तरी संचालकपदी आर होते. तथापि जनता दलचे सरकार आल्यावर त्यांना या विनावेतन पदावरूनही जावे लागले. आणि ती गोष्ट मानहानीकारकच होती. त्यामुळे नेहरूंच्या धोरणावर टीका करणारे त्यांचे व्हिडिओ नेहरूंवर विशेष प्रेम असलेल्या अंधभक्तांकडून विशेषत्वाने पसरवले जात आहेत. असो. आता हाच भावनिक बंध जेआरडींचे उत्तराधिकारी रतन टाटा यांना एअर इंडिया पुन्हा आपल्याकडे घेण्यास प्रवृत्त करत होता. तसे प्रयत्न त्यांनी आधीही वाजपेयी सरकार असताना केले होते. जेआरडीप्रमाणेच रतन टाटा यांनाही विमान वाहतूक आणि विमान उड्डाणात रस आहे. ते अमेरिकेत विद्यार्थी असताना विमान शिकण्यासाठी पैसे मिळविण्याकरिता भांडी धुण्याचेही काम करत. तेरा वर्षांपूर्वी वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी फायटर जेटही उडवले होते. आता भावनिक गोष्ट वेगळी आणि व्यावसायिक निर्णय वेगळे. रतन टाटा हे नफ्या-तोट्याचा विचार न करता मोठे आणि अतार्किक निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. मग ते एकंदर वाहन उद्योग अडचणीत असताना जग्वार लँड रोव्हर सारखी कंपनी खरेदी करणे असो किंवा ब्रिटिश पोलाद कंपनी कोरससाठी अवाजवी बोली लावणे असो. त्यांनी इथेही तसेच केलेले दिसते. हा निर्णय धाडसी आहे. टाटांकडून विमानसेवा सरकारकडे गेली तेव्हाची परिस्थिती आणि अनेक खासगी विमान सेवा कार्यरत असतानाची आताची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळे त्यांना दीर्घकालीन व्यावसायिकदृष्ट्या फायद्यासाठी कोणत्या गोष्टींचा वापर करून घेता येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एअर इंडियाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जगभरात अत्यंत मोक्याच्या तीन हजार ठिकाणी असलेल्या पार्किंगच्या जागा. त्यात युरोप आणि अमेरिकेचे द्वार असलेल्या लंडनसारख्या ठिकाणांचाही समावेश आहे. टाटा समूह सध्या अन्य दोन विमानसेवा संयुक्त भागीदारीत चालवत आहे. त्यात ही तिसरी सामील होत आहे. त्याच्या एकत्रीकरणात त्याचा फायदा होऊ शकतो. सध्याच्या कोव्हिड काळात विमान उद्योग हा सर्वाधिक अडचणीत असलेला उद्योग आहे आणि तो मोठ्या प्रमाणात पैशाची गरज लागणाराही उद्योग आहे. त्याचबरोबर इंधनाच्या वाढत्या दरांचेही आव्हान आहे. अशा परिस्थितीत राजेशाहीची प्रतिमा असलेली एअर इंडिया कंपनी खाणेपिणे आदी कोणतेही लाड न करणार्‍या स्वस्तातील यशस्वी विमानसेवांशी कशी स्पर्धा करेल हे पाहायला पाहिजे. या खरेदीमुळे देशातील त्यांचा हिस्सा तीस टक्क्यावर जाणार आहे. येत्या काळात ते खर्च कसे नियंत्रणात आणू शकतील आणि या खरेदीसाठी उभारण्याची शक्यता असलेल्या पंधरा हजार कोटींचे कर्ज ते कधीपर्यंत फेडू शकतील यावर त्याची यशस्वीता ठरेल.

Exit mobile version